संगीत साधनेविषयी मार्गदर्शन करून त्याची अनुभूती घेण्यास शिकवणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

संगीत सदर
ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

‘देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराजांशी (परात्पर गुरु पांडेबाबांशी) सेवेनिमित्त माझा अनेक वेळा संपर्क आला. त्यांनी मला संगीत साधनेच्या संदर्भातील पुष्कळ महत्त्वाची सूत्रे सांगितली. साधनेच्या प्रवासात मला त्या सूत्रांचा पुष्कळ लाभ झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या कृपेने त्यांनीच माझ्याकडून त्या सूत्रांप्रमाणे कृती करवून घेतली. ‘त्यांनी सांगितलेल्या त्या सूत्रांचा सर्वांना लाभ व्हावा’, यासाठी हा लेख लिहित आहे. त्यांच्या कृपेने मला अनेक अनुभूती आल्या आणि त्यांच्या सहवासात पुष्कळ शिकायला मिळाले, यांसाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले अन् परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या चरणी कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करते. 

(पूर्वार्ध)

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु पांडे महाराज

१. परात्पर गुरु पांडे महाराजांनी आश्रमातील साधकांना संगीत शिकवण्यास सांगणे, काही कारणास्तव ते शक्य न होणे, त्यानंतर काही कालावधीने संगीताच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाल्यावर महाराजांचा द्रष्टेपणा लक्षात येणे

एकदा परात्पर गुरु पांडेबाबांनी मला विचारले, ‘‘तू कशात शिक्षण घेतले आहेस ?’’ त्यांना माझे ‘संगीत’ या विषयात शिक्षण झाले असल्याचे सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. काही दिवसांनी परात्पर गुरु पांडेबाबा मला म्हणाले, ‘‘तू संगीत शिकली आहेस, तर आपल्या आश्रमातील जे साधक संगीत शिकण्यास इच्छुक आहेत, त्यांना संगीत शिकवायला प्रारंभ कर.’’ त्या कालावधीत संगीत या विषयातील संशोधन चालू झालेले नव्हते आणि माझ्याही अन्य तातडीच्या सेवा चालू होत्या. मी परात्पर गुरु पांडेबाबांना त्याविषयी सांगितले. त्यांनाही माझ्या सेवेचा आवाका लक्षात आला; परंतु तरीही त्यांच्या बोलण्यातून ‘साधकांना संगीताचे शिक्षण मिळावे’, ही तळमळ प्रकर्षाने जाणवत होती.

त्यानंतर एका वर्षाने रामनाथी येथील आश्रमात संगीतातील संशोधन चालू झाले आणि मलाही संगीताच्या माध्यमातून साधना करण्याची संधी मिळाली. हे मी परात्पर गुरु पांडेबाबांना सांगितल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. देवाने त्यांच्या माध्यमातून माझ्या संगीत-सेवेविषयी आधीच सूचित केले होते. यावरून परात्पर गुरु पांडेबाबांचा द्रष्टेपणाही माझ्या लक्षात आला.

सौ. अनघा जोशी

२. परात्पर गुरु पांडे महाराजांनी संगीत-साधनेसाठी प्रेरणा देणे

ते मला वेळोवेळी संगीत साधनेसाठी प्रेरणा द्यायचे. ‘गाण्याचा सराव करतांना काय करायला हवे ?’, याविषयीची सूत्रे ते मला आवर्जून सांगायचे. त्या वेळी प्रत्यक्ष देव मला त्यांच्या माध्यमातून संगीताची सूत्रे सांगत होता. याविषयी कृतज्ञता वाटते. प्रत्येक वेळी प.पू. देवबाबांकडून आश्रमात परत आल्यावर ‘प.पू. देवबाबांनी काय सांगितले ?’, याविषयी ते जिज्ञासेने जाणून घ्यायचे.

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांची अनुभवलेली प्रीती !

३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची स्तुती गाण्याची संधी मिळणे आणि त्यानंतर देवद आश्रमात आल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अत्यानंदाने अन् प्रेमाने संवाद साधणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मी रामनाथी आश्रमात गेले होते. त्या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांची स्तुती गाण्याची संधी मला मिळाली होती. त्यानंतर मी देवद आश्रमात परत आल्यावर परात्पर गुरु पांडेबाबांनी माझ्याशी अत्यानंदाने आणि प्रेमाने संवाद साधला. अमृत महोत्सव सोहळ्याच्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टरांची स्तुती गायल्याचा जणू त्यांनाच पुष्कळ आनंद झाला होता. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरूंनी तुझ्यात चैतन्यशक्ती संक्रमित केली आहे.’’ ‘देव साधकांसाठी किती करत आहे आणि स्थुलातूनही किती प्रेम देत आहे !’, याची जाणीव होऊन परात्पर गुरु पांडेबाबांच्या या वाक्याने मला कृतज्ञतेने पुष्कळ रडू आले.

३ आ. साधिकांची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे कळल्यावर आवर्जून भ्रमणभाष करून त्यांना भरभरून अभिनंदनाचे आशीर्वाद देणे : परात्पर गुरु पांडेबाबांना आमची (मी आणि माझी ताई कु. तेजल पात्रीकर यांची) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे कळल्यावर अभिनंदनाचे आशीर्वाद द्यायला ते अधीर झाले होते. त्या दिवशी काही कारणास्तव आम्ही त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलू शकलो नाही; परंतु दुसर्‍या दिवशी भ्रमणभाषवर मात्र परात्पर गुरु पांडेबाबा आमच्या कुटुंबातील प्रत्येकाशी आठवणीने बोलले. त्यांनी आम्हाला भरभरून अभिनंदनाचे आशीर्वाद दिले. जणू ते याची वाटच पहात होते.’

(उत्तरार्ध)

४. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी करवून घेतलेले प्रयोग आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती

४ अ.  ‘सप्त स्वर हे सप्त चक्रांशी निगडित असतात’, हे ओळखण्याविषयी परात्पर गुरु पांडे महाराजांनी सांगणे आणि ज्या चक्राशी संबंधित स्वर म्हटले, त्या चक्रावर विशिष्ट स्पंदने जाणवणे : ‘एका सेवेनिमित्त मी परात्पर गुरु पांडेबाबांकडे गेले होते. त्यांनी मला सप्त स्वर आणि सप्त चक्रे यांचा एकमेकांशी असलेला संबंध यांविषयीचे विश्‍लेषण सांगितले. ‘सप्त स्वर म्हणजे आपली सात चक्रे आहेत. त्यांतील सहस्राराच्या ठिकाणी सर्व स्वरांचा मिलाप होतो’, असे सांगून त्यांनी प्रथम ‘सा’ (सप्त स्वरांमधील पहिला स्वर ‘षड्ज’) म्हटला आणि ‘त्याने मूलाधारचक्रावर कशी स्पंदने येतात ?’, याविषयी सांगितले. त्यानंतर पुढचा-पुढचा एकेक स्वर म्हणून त्या स्वरांशी संबंधित चक्रांची नावे सांगितली. त्यानंतर त्यांनी मलाही काही स्वर आळवायला आणि जाणवणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यास सांगितले. ज्या चक्राशी संबंधित स्वर म्हटले, त्या चक्रावर मला विशिष्ट स्पंदने जाणवत होती, उदा. ‘रे’ म्हटल्यावर स्वाधिष्ठान चक्रावर आणि ‘ग’ म्हटल्यावर मणिपूरचक्रावर स्पंदने जाणवली. यातून ‘परात्पर गुरु पांडेबाबांनी सप्त स्वर सप्त चक्रांवर कसे कार्य करतात ?’, हे शिकवले. सप्त चक्रांपैकी दोन चक्रांचे बीजमंत्रही त्यांनी म्हणून दाखवले. प.पू. देवबाबांनीही आम्हाला हेच सांगितले आहे. अशा प्रकारे त्यांनी सप्त स्वरांविषयी सांगून माझा संगीत साधनेचा खरा प्रारंभ केला.

४ आ. ‘ॐ’काराशी संबंधित प्रयोग करवून घेणे, मन निर्विचार होणे, त्यानंतर संगीताच्या सरावापूर्वी ‘ॐ’कार म्हणणे नियमित चालू करणे आणि एकाग्रता वाढण्यासाठी त्याचा लाभ होणे : ‘संगीताची उत्पत्ती ‘ॐ’कारातूनच झाली आहे’, असे सांगून परात्पर गुरु पांडेबाबांनी माझ्याकडून ‘ॐ’काराशी संबंधित एक प्रयोग २ – ३ वेळा करवून घेतला. यात नाभीपासून ‘ॐ’कार म्हणण्यास आरंभ करून नासिकेतून ‘म’चा उच्चार करून सहस्राराच्या ठिकाणी न्यायचा असतो. प्रयोगानंतर मन एकाग्र होऊन निर्विचार झाले आणि माझ्या आज्ञाचक्राच्या वरच्या भागात प्रकाश जाणवला. हे मी त्यांना सांगितल्यावर ‘हाच ‘ॐ’काराचा परिणाम आहे’, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी संगीताच्या सरावापूर्वी ‘ॐ’कार म्हणणे नियमित चालू केले. एकाग्रता वाढण्यासाठी मला त्याचा लाभ झाला.

४ इ. ‘प्रज्ञा जागृत झाल्यानंतर म्हटलेले संगीत हेच ‘खरे संगीत’ असून ते ईश्‍वरापर्यंत घेऊन जाते’, असे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगणे : परात्पर गुरु पांडेबाबा मला म्हणाले, ‘‘आज आपण बाह्य परिस्थिती बघतो. तेव्हा लक्षात येते की, सगळे केवळ मुखाने संगीताचे शिक्षण घेतात; परंतु आपल्याला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाणारे खरे संगीत कोणीच शिकवत नाही. संगीत म्हणजे केवळ मुखाने ‘सा, रे, ग, म…’ एवढेच म्हणायचे नसून ‘स्व’ला आत्म्याशी जोडायचे असते. तेच संगीत होय. खरे संगीत शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी व्यक्तीची प्रज्ञा जागृत असावी लागते. ती साधनेनेच जागृत होते. प्रज्ञा जागृत झाल्यानंतर शिकलेले आणि म्हटलेले संगीत हे ‘खरे संगीत’ होय. तेच आपल्याला ईश्‍वरापर्यंत घेऊन जाते.’’

नंतर गाण्याचा सराव करतांना ‘मी ईश्‍वराप्रतीच्या आर्तभावाने गात आहे का ?’, असे माझे परीक्षण होऊ लागले. परात्पर गुरु पांडेबाबांनी सांगितल्याप्रमाणे गातांना तसा भाव ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे भावजागृती होऊ लागली.

४ ई. ‘संगीतातील वाद्ये आपल्या अंतरात असून त्यांची अनुभूती साधनेनेच येऊ शकते’, असे परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्यावर सेवा करतांना तानपुर्‍याचा नाद ऐकू येणे : ‘संगीतातील तानपुरा, बासरी, तबला ही वाद्ये बाह्य संगीतासाठी आहेत. ती आपल्या अंतरात आहेत. त्यांची अनुभूती आपण साधनेनेच घेऊ शकतो’, असे परात्पर गुरु पांडेबाबांनी मला सांगितल्यावर काही दिवसांनी सेवा करतांना मला तानपुर्‍याचा नाद ऐकू येत होता. प्रत्यक्षात मी तानपुरा वाजवत नव्हते. त्या नादाने माझे मन एकाग्र झाले. ‘ही अनुभूती म्हणजे परात्पर गुरु पांडेबाबांच्या संकल्पाचा परिणाम आहे’, हे लक्षात आले. यातून देवाने ‘स्थुलातील वाद्यांपेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, हे दाखवून दिले.

५. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या रूपात देवाने महर्षीच दिले होते’, असे जाणवणे : कला, प्रसार, दैनिक, बांधकाम, स्वयंपाक, यांपैकी प्रत्येक विषयाचे अगाध आणि अगम्य ज्ञान परात्पर गुरु पांडेबाबांजवळ होते. त्यामुळे ‘जणूकाही त्यांच्या रूपात एक महर्षीच देवाने आम्हाला दिले होते’, असे मला जाणवले.

६. प.पू. देवबाबा सांगत असलेली सूत्रे त्यापूर्वीच परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेली असणे : मार्च २०१७ पासून आम्ही किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबांकडे संगीत शिकण्यासाठी जात आहोत. ‘जी सूत्रे प.पू. देवबाबा आम्हाला सांगतात, त्या आधीच ती सूत्रे परात्पर गुरु पांडेबाबांनी मला सांगितली आहेत’, असे माझ्या लक्षात आले. परात्पर गुरु पांडेबाबांना हे सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘मग, मी होतो ना तिथे !’’ ‘गुरुतत्त्व कसे कार्य करते !’, याची देव प्रचीती देत होता.

७. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी प.पू. देवबाबांनी काढलेले गौरवोद्गार ! : आम्ही प.पू. देवबाबांना परात्पर गुरु पांडेबाबांचा नमस्कार सांगितल्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘वो तो एक महान संत है ।’’

परात्पर गुरुमाऊली आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कृपेमुळे मला महान संतांची सेवा करण्याची संधी मिळाली, तसेच त्यांच्याकडून संगीताविषयी अनमोल ज्ञानही मिळाले. परात्पर गुरु पांडेबाबांनी माझा संगीत साधनेचा पाया रचून घेतला. मला खरे संगीत शिकवले, यांसाठी परात्पर गुरुमाऊली आणि परात्पर गुरु पांडेबाबा यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.३.२०१९)

परात्पर गुरु पांडे महाराजांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन

१. संगीत साधना करण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत होणे आवश्यक आहे !

परात्पर गुरु पांडेबाबांनी मला सांगितले, ‘‘संगीत ही ईश्‍वरप्राप्तीकडे नेणारी कला आहे आणि त्यासाठी त्या माध्यमातून साधना करणार्‍या व्यक्तीची कुंडलिनी प्रथम जागृत होणे आवश्यक आहे. तसे झाले, तरच त्याला संगीत साधना करता येते. ती जागृत झाली की, पुढची साधना आपोआप होते.’’

२. भगवान श्रीकृष्णाच्या बासरीप्रमाणे आपले संगीत चैतन्यमय असायला हवे !

भगवान श्रीकृष्ण जेव्हा बासरी वाजवायचा, तेव्हा गायी आणि पशू-पक्षी त्याच्याकडे आकृष्ट व्हायचे, तसेच लता, वृक्ष इत्यादी सर्व आनंदी व्हायचे. आपल्या संगीतातही तेवढे सामर्थ्य यायला हवे. यासाठी आपले संगीत चैतन्याच्या स्तरावरचे असले पाहिजे.

३. परिस्थिती पालटण्याचे सामर्थ्य गायनात आहे !

पूर्वी युद्धापूर्वी शंखनाद केला जायचा किंवा रणवाद्ये वाजवली जायची. त्यामुळे मानवामध्ये स्फूर्ती यायची. वातावरणही स्फूर्तीदायी व्हायचे. ‘कार्यक्रमाच्या वेळी सनई वाजवणे, भजनाच्या वेळी मृदंगाची साथ देणे’, या क्रियांच्या वेळी त्या भजनांतील किंवा मृदंगातील नादातून निर्माण झालेल्या स्पंदनांचा वातावरणावर परिणाम होतो. रज-तमयुक्त परिस्थिती पालटण्याचे सामर्थ्य स्वरांमध्ये आहे, तसेच गायनात आहे. यातून आपल्याला संगीताचे सामर्थ्य लक्षात येते.

४. प्रकृतीत संगीत भरलेले आहे !

प्रकृतीतही संगीत भरलेले आहे. भ्रमर ‘घूं ऽऽऽ’ करतो. तो प्रकृतीतील एक प्रकारचा नादच आहे. नादाने थकवा निघून जातो. नाद श्रमपरिहार करणारा आहे. पूर्वी उत्तेजन आणि श्रमपरिहार यांसाठी गायन ऐकले जायचे.’’ अशा प्रकारे परात्पर गुरु बाबांनी ‘प्रकृतीतील संगीत कसे आहे ?’, हे शिकवले. हेच प.पू. देवबाबांनीही आम्हाला सांगितले होते.

५. नृत्य किंवा गायन या कला साकारतांना स्वतःचे देहभान विसरले पाहिजे !

‘हात-पाय केवळ विशिष्ट पद्धतीने हलवणे’, याला नृत्य म्हणता येणार नाही. भरतमुनींनी ध्यानात जे नृत्य केले, ते खरे नृत्य होय. नृत्य करतांना ते देहभान विसरले होते, तसेच आपलेही नृत्य किंवा गायन असायला हवेे. या कला साकारतांना स्वतःचे देहभान विसरले पाहिजे, म्हणजेच ‘स्व’ला विसरले, तरच खरे संगीत बाहेर येते.

६. ‘रासक्रीडा’ हासुद्धा भावनृत्याचा प्रकार आहे. श्रीकृष्णाच्या आनंदात गोपींनी रास खेळला, त्याच प्रकारे भगवंताच्या अनुसंधानात नृत्य केले, तर ते खरे नृत्य होईल.

७. ‘प्रत्येक कृतीतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ !

आपले ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ म्हणजे काय आहे ? केवळ चार भिंतींत काही जणांनी बसून शिकायची शिकवणी नसून ते विश्‍वव्यापी आहे. ‘प्रत्येक कृतीतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’. यातून प्रत्येक व्यक्तीचा आत्मोद्धारच केला जाणार आहे. हे विश्‍वव्यापक विद्यालय आहे.’’

– सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


Multi Language |Offline reading | PDF