विकार-निर्मूलनासाठी नामजप

भावी भीषण आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी विविध उपाय सांगणारे ग्रंथ आधीच प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा थोडक्यात परिचय !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध करत असून आतापर्यंत या मालिकेतील २१ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. हे ग्रंथ नेहमीसाठीही उपयुक्त आहेत. या सर्व ग्रंथांची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी प्रस्तुत सदरात ग्रंथांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; कारण ते भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !

विकार-निर्मूलनासाठी नामजप

(महत्त्व आणि नामजपाच्या प्रकारांमागील शास्त्र)

(भावी महायुद्धकाळात कुटुंब आणि समाज यांच्या रक्षणासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !)

ग्रंथाचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवलेे आणि पू. संदीप गजानन आळशी

ग्रंथाचे मनोगत

सर्वसाधारणतः हिंदूंना उपासना म्हणून देवतेचा नामजप करण्याविषयी ठाऊक असते; पण विकारांच्या निर्मूलनासाठीही देवतेचा नामजप उपयुक्त असतो, याविषयी ठाऊक नसते. अमेरिकेसारख्या पाश्‍चात्त्य देशांमध्ये आेंकाराच्या जपाविषयी सखोल संशोधन होते आणि पाश्‍चात्त्य लोक आेंकाराचा जप करून विकारांतून बरेही होतात. हिंदुस्थानात मात्र आम्ही हिंदू आमच्याच धर्मात सांगितलेल्या नामजपांच्या लाभांपासून अनभिज्ञ आहोत. हा केवढा दैवदुर्विलास ! ‘नामजप-उपाय’ या ग्रंथमालिकेच्या माध्यमातून हिंदूंना त्यांच्या धर्माचे आणि देवतांचे माहात्म्यही कळेल.

मनुष्याच्या बहुतेक शारीरिक अन् मानसिक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. ‘नामजप’ हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे. आध्यात्मिक कारणांपैकी ‘प्रारब्ध (नशीब)’ हे एक महत्त्वाचे कारण आहे. नामजपामुळे रुग्णाचे मंद प्रारब्ध नष्ट होण्यास साहाय्य होते, मध्यम प्रारब्ध न्यून होते, तर तीव्र प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी त्याच्या मनाची सिद्धता होते.

प्रत्येक देवतेची विशिष्ट कंपने असतात. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने शरिरात निर्माण होतात, त्यांच्यामुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते, म्हणजेच विकार-निर्मूलन होण्यास साहाय्य होते. नामजपामुळे केवळ विकार बरे होतात असे नाही, तर विकारांमुळे निर्माण होणार्‍या वेदना आणि दुःख सहन करण्याचे मनोबल आणि शक्तीही मिळते.

‘नामजप’ ही सर्वांसाठी सुलभ अशी उपायपद्धत आहे. नामजपाला देशकाल, शौच-अशौच, मंत्रजपाप्रमाणे योग्य उच्चार यांसारखी बंधने नाहीत. नामजपात योगयागादी साधनांत असते तशी कठीणताही नाही. भावी संकटकाळात एखाद्या वेळी औषधी वनस्पती मिळू शकणार नाहीत; पण नामजपाचे उपाय मात्र त्रिकाळ कोठेही करता येतील.

ग्रंथमालिकेच्या या खंडात नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्रही सांगितले आहे. शास्त्र कळल्यामुळे नामजपांविषयी श्रद्धा निर्माण व्हायला साहाय्य होते. सध्याच्या कलियुगातील मानवाचा अध्यात्मशास्त्रापेक्षा विज्ञानावर अधिक विश्‍वास असतो. नामजप उपायपद्धतीच्या संदर्भात वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे केलेले संशोधनात्मक प्रयोगही ग्रंथात दिले आहेत. त्या प्रयोगांचे विवेचन वाचून विज्ञानवाद्यांचीही नामजपावर श्रद्धा बसायला साहाय्य होईल.

भावी काळात स्थापन होणार्‍या ईश्‍वरी राज्यात (हिंदु राष्ट्रात) नामजपाच्या उपायपद्धतीचा परिचय शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात करून दिला जाईल. त्यामुळे भावी पिढीला विकारांमुळे भोगावे लागणारे दुःख न्यून करण्याचा एक सोपा मार्ग लहान वयातच ठाऊक होईल.

‘नामजपाचे उपाय करून जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत’, ही श्री गुरुचरणी आणि विश्‍वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना ! – संकलक

सनातनची ग्रंथसंपदा ‘ऑनलाइन’ खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !

विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !

संपर्क : ९३२२३१५३१७


Multi Language |Offline reading | PDF