हिंदूंचे धार्मिक प्रतीक असलेले ‘स्वस्तिक’ सकारात्मक, तर नाझींचे ‘स्वस्तिक’ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करते ! – संशोधनातून निष्कर्ष

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ग्रॅनडा, स्पेन येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित शोधप्रबंध सादर

शोधप्रबंध सादर करतांना सौ. ड्रगाना किस्लौस्की

स्पेन – मूळ ‘हिंदु स्वस्तिक’ आणि ‘नाझी स्वस्तिक’ यांतील भेद स्पष्ट करणारे पुष्कळ लिखाण विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे; परंतु आज आपण भौतिक आणि ऐतिहासिक भेदांच्या पलीकडे जाऊन या दोन्ही स्वस्तिकांतील सूक्ष्म स्तरावरील भेदांचा अभ्यास करायला हवा. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राने वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या साहाय्याने याविषयी संशोधन केले. यातून ‘नाझी स्वस्तिक धारण करणार्‍यावर प्रचंड नकारात्मक परिणाम, तर हिंदूंचे प्राचीन धार्मिक प्रतीक असलेले स्वस्तिक धारण करणार्‍यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो’, असा निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडला. स्पेन येथील ग्रॅनडा विद्यापिठाने आयोजित केलेली ‘समाजामधील धर्म आणि अध्यात्म’ या संदर्भातील ९ वी आंतरराष्ट्रीय परिषद २५ आणि २६ एप्रिल २०१९ या दिवशी पार पडली. या परिषदेमध्ये ‘हिंदु आणि नाझी स्वस्तिक यांमागील आध्यात्मिक सत्य’ हा शोधप्रबंध २५ एप्रिल या दिवशी सौ. किस्लौस्की यांनी सादर केला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर सौ. ड्रगाना किस्लौस्की आणि श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत.

हिंदु स्वस्तिक
नाझी स्वस्तिक

सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी विविध प्रतिकांच्या, विशेषतः हिंदु आणि नाझी स्वस्तिक यांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या विविध प्रयोगांची विस्ताराने माहिती दिली. यात विशेषत्वाने त्यांनी भूतपूर्व अणूवैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी विकसित केलेल्या ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यू.टी.एस्.) या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाची माहिती दिली. या उपकरणाद्वारे कोणत्याही सजीव किंवा निर्जिव वस्तूमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, तसेच त्या वस्तूभोवती असलेली एकूण प्रभावळ मोजता येते. या संशोधनातून मूळ हिंदु धार्मिक प्रतीक असलेल्या स्वस्तिकात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, तर नाझी स्वस्तिकात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले.

सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी ‘नाझी ज्या पद्धतीने स्वतःच्या दंडावर बांधायचे, त्या पद्धतीने ‘नाझी स्वस्तिक’ बांधल्यावर आणि त्यानंतर मूळ ‘हिंदु स्वस्तिक’ दंडावर बांधल्यावर काय परिणाम होतो’, याचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या प्रयोगाचीही माहिती दिली. या प्रयोगात सहभागी दोघांपैकी पहिल्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याने प्रयोगापूर्वीही त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दुसर्‍या व्यक्तीमधून चाचणीपूर्वी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. पहिल्या व्यक्तीच्या दंडावर ‘नाझी स्वस्तिक’ बांधल्यावर त्याच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुपटीने वाढून ५.७३ मीटर झाली, तर दुसर्‍या व्यक्तीमध्ये ५ मीटर लांबीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निर्माण होऊन त्याच्यामधील सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली.

वरील चाचणीनंतर दोघांच्या दंडांवरील ‘नाझी स्वस्तिक’ काढल्यानंतर या दोन्ही व्यक्ती प्रयोगापूर्वीच्या मूळ स्थितीला येईपर्यंत थांबण्यात आले. मूळ स्थिती आल्यावर त्यांच्या दंडावर ‘हिंदु स्वस्तिक’ बांधण्यात आले. त्यानंतर २० मिनिटांनी केलेल्या चाचणीत पहिल्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णतः नष्ट झालेली आढळली. एवढेच नाही, तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, जिची प्रभावळ १ मीटर होती. दुसर्‍या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मूळ ३.१४ मीटरपासून ६.२३ मीटर झाली, म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली. ‘वरील दोन्ही प्रतिके कशी शक्तीशाली आहेत ?’ हे या प्रयोगातून दिसून आले. ‘नाझी स्वस्तिका’चा ते धारण करणार्‍यावर प्रचंड नकारात्मक परिणाम झाला, तर प्राचीन भारतीय ‘हिंदु स्वस्तिका’चा पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला, असे दिसून आले.

शेवटी शोधनिबंधाचे सार मांडतांना सौ. ड्रगाना किस्लौस्की म्हणाल्या, ‘‘प्रत्येक प्रतिकातून सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ही सूक्ष्म स्पंदने सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धर्माच्या प्रतिकांमधून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत. अशा प्रतिकांमध्ये काहीही पालट केल्यास त्यातील स्पंदने पालटतात. परिणामी या स्पंदनांचा त्यांच्या भक्तांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कलाकारांनी किंवा धार्मिक नेत्यांनी कोणत्याही धार्मिक प्रतिकामध्ये काही पालट करण्याआधी हे महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यायला हवे; कारण त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होतात.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now