आतंकवादाच्या विरोधात कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे काँग्रेसकडून भाजपवर आरोप ! – निर्मला सीतारमण, केंद्रीय संरक्षणमंत्री

भाजप करत असलेली आतंकवादाच्या विरोधातील कारवाई पुरेशी नाही, हे तो जाणत नाही का ?

मुंबई, २६ एप्रिल (वार्ता.) – २६/११ च्या मुंबईवरील आक्रमणानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने आतंकवादाच्या विरोधात ठोस कारवाई केली असती, तर पुलवामासारखी घटना घडली नसती. आतंकवादाच्या विरोधात कारवाई करायलाही राजकीय इच्छाशक्ती लागते. काँग्रेसमध्ये ही इच्छाशक्ती नाही. त्यामुळे काँग्रेस भाजपवर आरोप करत आहे, अशी टीका केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी २५ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या येथे आल्या असतांना त्यांनी भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी केरळ येथील भाजपचे खासदार मुरलीधरन, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांसह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी निर्मला सीतारमण म्हणाल्या,

१. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलत असतांना त्याविषयी विरोधक प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. आतंकवादाच्या विरोधात कारवाई केल्यावर पुरावे मागत आहेत. त्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे, हे सर्व दुख:दायक आहे.

२. वर्ष १९७१ च्या युद्धात दिवंगत अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असतांना त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या सूत्रावर तत्कालीन काँग्रेस सरकारला खंबीर पाठिंबा दिला होता. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचे सूत्र येते, तेव्हा विरोधकांनी शासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहायला हवे; मात्र आताचे विरोधी पक्ष एकही आरोप करण्याची संधी सोडत नाहीत.

३. आम्ही केवळ पुलवामावर बोलत नाही, तर विकासावरही बोलत आहोत; मात्र देशावर आक्रमण करणार्‍यांना धडा शिकवण्याची मागणी जनतेकडूनच केली जात आहे आणि त्यावर बोलणे आम्हाला महत्त्वाचे वाटते.

४. आपस्फा कायद्याविना जम्मू काश्मीरमध्ये काम करणे कठीण आहे. आपस्फा काढण्यासाठी त्या भागात काम करावे लागेल. कोणताही पालट करण्याविना आपस्फा हटवणे योग्य रहाणार नाही.

५. साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी जो प्रसंग घडला, तो त्यांनी एक स्त्री म्हणून मांडला.  त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी क्षमा मागितली आहे.


Multi Language |Offline reading | PDF