गोव्यात लोकसभा निवडणुकीला अनुसरून निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेविषयी लक्षात आलेली काही सूत्रे !

निवडणुकीत गोव्यात ११ कोटीचे साहित्य कह्यात घेतले;परंतु याचा कोणत्या उमेदवाराशी संबंध होता याचे अन्वेषण करण्यास निवडणूक आयोगाला अपयश

पणजी -गोव्यात २३ एप्रिल या दिवशी लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी निवडणूक झाली.यंदा लोकसभा निवडणुकीत वर्ष २०१४च्या लोकसभेच्या तुलनेत २.१४ टक्के अल्प मतदान झाले.या घटलेल्या मतदानाला अनेक घटक कारणीभूत आहेत.मुख्य निवडणूक अधिकार्‍याने मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी व्यापक स्तरावर,तसेच विविध माध्यमांतून प्रयत्न केले असले,तरीही त्यामधील काही त्रुटी राजकीय निरीक्षकांनी उघडकीस आणल्या आहेत.या त्रुटी पुढे मांडत आहोत.

निवडणूक आयोगाने प्रचाराच्या काळात रोख रक्कम,अमली पदार्थ,मद्य आणि इतर जीवनोपयोगी वस्तू मिळून एकूण ११ कोटी ६५ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेतले.निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये,यासाठी शासनातील पोलीस खाते,आयकर खाते,अबकारी खाते आदी अनेक खाती कार्यरत होती.कोणत्याही प्रकारे मतदारांना आमीष दाखवले जाऊ नये याची दक्षता घेण्यासाठी ही खाती कार्यरत होती.यामुळे एकूण ११ कोटी ६५ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात घेता आले;परंतु आजतागायत हे साहित्य कोणत्या उमेदवाराशी संबंधित होते याचे निवडणूक आयोग अन्वेषण करू शकलेला नाही.यापुढे संबंधित खात्यांनी कह्यात घेण्यात आलेल्या साहित्याचा एखाद्या उमेदवारांशी संबंध असल्याचे उघडकीस आणले आणि आचारसंहितेचा काळ संपलेला असेल,तेव्हा मुख्य निवडणूक अधिकार्‍याला संबंधित उमेदवार किंवा पक्ष यांच्यावर कारवाई करण्याचा कोणताच अधिकार रहाणार नाही.

२ मतदान ओळखपत्रे असल्याच्या तक्रारीचे अन्वेषण अपूर्ण

निवडणुकीचा प्रचार चालू असतांना एका मंत्र्याने त्यांच्या मतदारसंघात इतर राज्यांतून गोव्यात आलेल्या मजुरांकडे त्यांच्या गावाकडचे आणि गोव्याचे,अशी दोन्ही मतदार ओळखपत्रे असल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.निवडणूक आयोगाने या तक्रारीचे उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना अन्वेषण करण्याचा आदेश दिला.उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाचे प्राथमिक अन्वेषण केल्यानंतर या प्रकरणाचे सविस्तर अन्वेषण करण्यासाठी निवडणूक आयोगाने द्विसदस्यीय समिती नेमली.निवडणुकीचा दिवस उजाडेपर्यंत या समितीला अन्वेषण पूर्ण करून दोषी शोधून काढण्यास अपयश आले.(ही आहे निवडणूक आयोगाची (अ)कार्यक्षमता !-संपादक)

सी व्हिजिल-सिंगम चलचित्र निवडणुकीच्या प्रचार संपण्याच्या २ दिवस पूर्वी प्रसारित

निवडणूक आयोगाने निवडणुकीला अनुसरून जागरूक नागरिकांना तक्रार करण्यासाठी सी व्हिजिल हे अ‍ॅप बनवले आहे.मतदारांना मतदान करण्यास उद्युक्त करण्यासाठी सिंगम या चित्रपटातील काही दृश्यांच्या आधारे गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकार्‍याने एक प्रोमोशनल चलचित्र सिद्ध केले होते.हे चलचित्र निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या २ दिवस आधी प्रकाशित करण्यात आले.हे चलचित्र त्याहून पूर्वी प्रकाशित झाले असते,तर त्याचा अधिक लाभ झाला असता.


Multi Language |Offline reading | PDF