उमरगा (जिल्हा धाराशिव) येथे पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू

संतप्त नागरिकांचे मृतदेहासह पोलीस ठाण्यात आंदोलन

रक्षक नव्हे भक्षक पोलीस !

धाराशिव – जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे पोलिसांच्या मारहाणीत ७० वर्षीय दत्तू मोरे या वृद्ध शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने गावकरी संतप्त झाले. या घटनेच्या निषेधार्थ तलमोड गावातील गावकर्‍यांनी २५ एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून मृतदेहासह ठिय्या आंदोलन चालू केले होते.

१. उमरगा तालुक्यातील तलमोड जवळील कराळी येथे मागील रविवारी चारचाकी गाडीच्या पुढील चाकाचा टायर फुटून गॅसचा स्फोट झाल्याने ३ जणांचा जळून मृत्यू झाला होता. या वेळी तलमोड येथील काही युवकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून अग्नीशमनदलाची गाडी आडवी केली होती. (अशी कृती करून शासकीय मालमत्तेची हानी करण्याऐवजी जनतेने वैध मार्गाने आवाज उठवणे अपेक्षित आहे ! – संपादक)

२. या प्रकरणी पोलिसांनी २५ ते ३० जणांवर गुन्हे नोंद केले होते. या घटनेचा तपास करणार्‍या पोलीस पथकाने २४ एप्रिलच्या रात्री दगडफेक करणार्‍या काही संशयितांना पकडले, तसेच या वेळी दत्तू मोरे यांनाही मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी काही ग्रामस्थांच्या घराचे दरवाजे तोडल्याचे समजते. (अशी प्रकरणे पोलिसांनी संयमाने न हाताळल्यामुळे नागरिकांचा हकनाक मृत्यू होतो. नागरिकांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जात नाही, हेच यावरून लक्षात येते ! नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जनतेने केल्यास चूक ते काय ? – संपादक)

३. कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर जाणूनबुजून कारवाई होणार नाही. सखोल चौकशी करूनच आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख आर्. राजा यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF