गळ टोचून घेणार्‍या भाविकांवर गुन्हा नोंद करून पोलीस आणि देवस्थान न्यास यांना सहआरोपी करा ! – संभाजीनगर खंडपिठाचा आदेश

शेंद्रा (जिल्हा संभाजीनगर) येथील मांगीरबाबा यात्रेत भक्तांनी पाठीत गळ टोचून घेण्याचे प्रकरण

हिंदु धर्माप्रमाणे इतर पंथांतही विविध प्रथा आहेत. त्याविषयी कोणीही ‘ब्र’ काढत नाही. केवळ हिंदु धर्मातील प्रथांना लक्ष्य करून त्या नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले आहे का ?, अशी शंका आल्यास नवल वाटू नये !

मांगीरबाबा यात्रा

संभाजीनगर – शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेतील भक्तांच्या पाठीत गळ टोचण्याच्या स्थळावर पोलीस निरीक्षक दर्जाच्या १ अथवा अधिक अधिकार्‍यांची नेमणूक करावी. पुढील २ दिवसांत यात्रेत गळ टोचून घेणार्‍या भक्तांवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवावा, तसेच गळ टोचून घेतांना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे गृहीत धरून पोलीस आणि देवस्थान न्यास (ट्रस्ट) यांना सहआरोपी करावे, असा आदेश संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे आणि न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू. सांबरे यांनी २४ एप्रिल या दिवशी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात खंडपिठात अहवाल सादर करावा. याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्यांनीही ‘यात्रेच्या वेळी गळ टोचण्याचे कृत्य होते का ?’ याकडे लक्ष द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे, असे याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले. या याचिकेवर २६ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.

१. लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी अधिवक्ता अंगद कानडे यांच्याद्वारे याचिका प्रविष्ट केली आहे. शेंद्रा येथे प्रतिवर्षी लाखो भाविक मांगीरबाबाला बोललेले नवस फेडण्यासाठी कोंबडा आणि बकरी यांचा बळी देतात.

२. या वेळी भाविक स्वत:च्या पाठीत लोखंडी गळ (हूक) टोचून घेतात. या अनिष्ट प्रथेमुळे आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे अनेक भक्तांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्रथेविरुद्ध लाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपत भिसे यांनी ‘बेमुदत उपोषण’ही केले होते. (इतर पंथांतील जनतेला त्रासदायक ठरणार्‍या प्रथांविरुद्ध लाल सेना अशा प्रकारे ‘बेमुदत उपोषण’ करणार का ? – संपादक)

३. प्रथा बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मांगीरबाबा देवस्थान विश्‍वस्त यांच्याकडेही मागणी केली होती; मात्र त्यानंतरही गतवर्षी सहस्रो भाविकांनी अंगात लोखंडी गळ टोचून घेऊन नवस फेडले होते. (भाविकांच्या श्रद्धेमुळे त्यांना अनुभूती येतात. यामागील शास्त्र जाणून न घेता एखादी प्रथा बंद पाडू पहाणार्‍यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच लक्षात येते ! – संपादक) 

४. याचिकेच्या सुनावणीच्या वेळी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अन् अघोरी प्रथा’, तसेच ‘जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३’ च्या अनुसूची ३ प्रमाणे स्वत:च्या अंगाला इजा करणे अनधिकृत असून ही अनिष्ट प्रथा लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF