सरन्यायाधिशांवरील आरोप षड्यंत्र आहे का ?, याची निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या समितीकडून चौकशी होणार

हिंदूंच्या संतांवर अशा प्रकारचे आरोप झाल्यावर त्यांना पोलिसी कारवाई करून थेट कारागृहात टाकण्यात आले, त्यांना जामीनही नाकारण्यात आले; मात्र न्यायाधिशांवरील आरोप षड्यंत्र आहे का ?, याची चौकशी करण्यात येते, हे जनतेला पडलेले कोडेच आहे !

नवी देहली – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाचा आरोप एक षड्यंत्र आहे का? याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची नियुक्ती केली आहे. तसेच सीबीआयचे संचालक आणि आयबीचे संचालक त्यांना तपासकार्यामध्ये सहकार्य करतील, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे सरन्यायाधीश गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची ‘इन हाऊस’ चौकशी चालू आहे. ही चौकशी करणार्‍या न्यायाधिशांच्या समितीमधील न्या. एन्.व्ही. रमण्णा यांनी यातून माघार घेतली आहे. त्यांना यातून वगळावे, अशी मागणी आरोप करणार्‍या महिलेने केली होती.

१. सरन्यायाधिशांविरोधात करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एका कारस्थानाचा भाग असल्याचा दावा अधिवक्ता उत्सव सिंह बैंस यांनी केला होता. त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर ही कागदपत्रे तसेच सीसीटीव्ही फूटेज न्यायालयाने कह्यात घेऊन सील केले होते. आता याची चौकशी करण्यात येणार आहे.

२. सुनावणीच्या वेळी न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी म्हटले की, काही लोकांना हा देश आणि न्यायालय पैशाच्या बळावर चालवायचे आहे. हे न्यायालय राजकीय शक्ती आणि पैसा यांच्या बळावर चालवता येणार नाही. त्यामुळे न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करू नका. आगीशी खेळू नका. आता गप्प न बसण्याची वेळ आली आहे. जेव्हा बड्या लोकांच्या संदर्भातील एखादा खटला येतो आणि त्यावर सुनावणी चालू होते, तेव्हा आम्हाला पत्रे पाठवली जातात. आम्ही न्यायालय चालवू शकतो, असे या शक्तीशाली लोकांना वाटते. गेल्या ३-४ वर्षांत सर्वोच्च न्यायालयात जे चालले आहे, ज्या प्रकारे आरोप करण्यात येत आहे, ते पहाता ही संस्थाच संपुष्टात येईल. ‘बेंच फिक्सिंग’ होत आहे, असे आम्ही नेहमीच ऐकत आहोत. हे आरोप थांबले पाहिजेत. न्यायाधीश म्हणून आम्हाला खूपच चिंता वाटत आहे.


Multi Language |Offline reading | PDF