परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त भावसोहळ्याची सिद्धता करतांना श्री. विनायक शानभाग यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

साधकांना अवतारत्वाची अनुभूती देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. जन्मोत्सवानिमित्त होणार्‍या भावसोहळ्यात सूत्रसंचालन सेवेसंबंधी नियोजनाचे सत्संग आणि सेवेविषयी चिंतन करतांना शेषनागाचे अस्तित्व जाणवणे

१ अ. भावसोहळ्याच्या नियोजनाच्या सत्संगांच्या वेळी शेषनागाचे अस्तित्व जाणवून त्याचा हुंकार आणि त्याच्या श्‍वासाचा आवाज ऐकू येणे : ‘७.५.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त होणार्‍या भावसोहळ्यात मला सूत्रसंचालन करण्याची सेवा मिळाली होती. त्याविषयी मला सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सतत मार्गदर्शन करत होत्या. जन्मोत्सवाच्या आधीपासून नियोजनाच्या सत्संगांत सहभागी झाल्यावर त्या ठिकाणी ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांच्या जवळ शेषनाग सूक्ष्मातून येऊन बसला आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवत होते. मला अनेक वेळा शेषनागाचा हुंकार आणि त्याच्या श्‍वासाचा आवाज ऐकू येत होता.

श्री. विनायक शानभाग

१ आ. जन्मोत्सवाच्या आदल्या रात्री ११ वाजता मी एका खोलीत सूत्रसंचालन सेवेविषयी चिंतन करत होतो. तेव्हा ‘शेषनाग त्या खोलीत आला आहे’, असेे मला जाणवले आणि मी शेषनागाला स्थुलातून साष्टांग नमस्कार घातला अन् त्याच्या चरणी प्रार्थना केली.

१ इ. भावसोहळ्याच्या काळात रामनाथी आश्रमात चालतांना ‘क्षीरसागरात चालत आहे’, असे सलग ३ – ४ दिवस वाटणे अन् सागराच्या पाण्याचा मंजुळ नादही ऐकू येणे : जन्मोत्सवाच्या आदल्या दिवसापासून आणि जन्मोत्सवाच्या नंतरही रामनाथी आश्रमात चालत असतांना मला ‘मी क्षीरसागरात चालत आहे’, असे वाटत होते. त्या वेळी मला सागराच्या पाण्याचा मंजुळ नाद ऐकू येत होता. अशी अनुभूती मला जीवनात पहिल्यांदाच आली. यासाठी मी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ‘जयंत’ या नावाचा विष्णुसहस्रनामावलीत ७९८ व्या क्रमांकाला उल्लेख असल्याचे आढळणे आणि त्या क्रमांकाचे अंकशास्त्रीय विश्‍लेषण समजणे

२ अ. महर्षींनी जीवनाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले असल्याने विष्णुसहस्रनामावलीत त्यांचे नाव शोधण्याचा विचार मनात येणे आणि त्यानुसार विष्णुसहस्रनामावलीत ७९८ वे नाव ‘ॐ जयंताय नमः ।’ असे लिहिलेले आढळणे : जन्मोत्सवाच्या ४ दिवस आधी मी सूत्रसंचालन सेवेची सिद्धता करत असतांना देवकृपेने माझ्या मनात विचार आला, ‘महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी विष्णुसहस्रनाम म्हणत त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पुष्पार्चना करायला सांगितले आहे. त्याचप्रमाणे महर्षींनी जीवनाडीपट्टीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे नाव विष्णुसहस्रनामात असेलही.’ त्यानंतर मी ‘विष्णुसहस्रनामावलीत ‘जयंत’ हे नाव आहे का ?’, याचा सहज शोध घेतला. तेव्हा मला गुरुकृपेने विष्णुसहस्रनामावलीत ७९८ वे नाव ‘ॐ जयंताय नमः ।’, असे लिहिलेले आढळले.

२ आ. विष्णुसहस्रनामावलीतील ‘७९८’ या क्रमांकाचे अंकशास्त्रीय विश्‍लेषण

१. विष्णुसहस्रनामावलीतील ‘७९८’ या क्रमांकातील प्रत्येक अंकाची बेरीज (७ + ९ + ८ =) ‘२४’ एवढी होते. २४ या अंकांतील दोन अंकांची बेरीज (२ + ४ =) ६ एवढी होते. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्म इंग्रजी कालगणनेनुसार ‘६.५.१९४२’ या दिवशी झाला आहे.

२. दोन दिवसांनी मी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ज्योतिष विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांना याविषयी सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘७९८ या अंकामध्ये ‘७’ हा अंक अध्यात्माशी संबंधित आहे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मतिथी ‘सप्तमी’ आहे. ‘९’ हा अंक पूर्णांक असून श्रीरामाची जन्मतिथी ‘नवमी’ आहे, तर श्रीकृष्णाची जन्मतिथी ‘अष्टमी’ आहे.

३. नंतर देवाने मला सुचवले, ‘विष्णुसहस्रनामावलीतील ‘७९८’ या क्रमांकातील ७ म्हणजे श्रीजयंतावतार (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले), ९ म्हणजे श्रीरामावतार, ८ म्हणजे श्रीकृष्णावतार आहे’. यात ‘श्रीजयंतावतार’ हा श्रीविष्णूचा अंशावतार असल्याने ‘७’ हा अंक श्रीविष्णूचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि श्रीविष्णूचा पूर्णावतार श्रीकृष्ण यांच्या अनुक्रमे ‘९’ आणि ‘८’ या अंकांच्या आधी आहे.’

३. देवर्षि नारदांचे कार्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चालू केलेले ‘दैनिक सनातन प्रभात’ यांतून होत असलेले कार्य यांतील साम्य !

३ अ. देवर्षि नारद असे एकमेव आहेत, जे श्रीमन्नारायणाची कीर्ती सांगत तीनही लोकांत प्रवास करून श्रीविष्णूच्या लीला आणि विष्णुभक्तांची भक्तीगाथा यांचा प्रसार करतात.

३ आ. ‘नियतकालिक सनातन प्रभात’ विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि विष्णुभक्त असलेले सनातनचे साधक यांची कीर्ती आता सांगत असणे आणि यापुढेही सांगणार असणे : ८.५.२०१८ आणि १३.५.२०१८ या दिवशी ‘नियतकालिक सनातन प्रभात’च्या माध्यमातून सनातनचे सर्व साधक अन् पृथ्वीवरील भक्त यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाचे वृत्त, तसेच गुरूंची कीर्ती सांगणारे महर्षि आणि सनातनच्या सद्गुरु यांचे चैतन्यमय विचार वाचायला मिळाले अन् जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाची नयन-मनोहर छायाचित्रेही पहायला मिळाली.

अशा प्रकारे कलियुगात गेली २० वर्षे ‘नियतकालिक सनातन प्रभात’ हे देवर्षि नारदांप्रमाणेच श्रीविष्णूच्या लीला आणि विष्णुभक्तांची भक्तीगाथा सांगण्याचे कार्य करत आहे अन् या पुढेही करणार आहे.

४. कृतज्ञता

‘नियतकालिक सनातन प्रभात’ करत असलेल्या या कार्यासाठी त्याच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. ‘नियतकालिक सनातन प्रभात’चे जनक तथा संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ‘सनातन प्रभात’संबंधी सेवा करणारे सर्व साधक यांच्या चरणी माझे साष्टांग नमन !’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०१८)

सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF