गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यास आमच्याकडून हलगर्जीपणा ! – श्रीलंकेच्या पंतप्रधानांची स्वीकृती

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असा हलगर्जीपणा केल्यावर काय होते, हे भारतानेही अनुभवले आहे !

कोलंबो – भारताने आम्हाला ‘देशात बॉम्बस्फोट होणार’, अशी गोपनीय माहिती पुरवली होती; मात्र त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आमच्याकडून हलगर्जीपणा झाला. ही गोपनीय माहिती खालच्या स्तराच्या यंत्रणांपर्यंत पोचलीच नाही, अशी स्वीकृती श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी दिली आहे.

विक्रमसिंघे पुढे म्हणाले की, या आक्रमणात श्रीलंकेचे नागरिकही सहभागी आहेत. त्यांना विदेशातून साहाय्य मिळाले आहे. त्यामुळे आम्ही विदेशी यंत्रणांचे साहाय्य मागितले आहे. त्यातून आम्ही बॉम्बस्फोट घडवणार्‍यांपर्यंत पोचू शकतो. आमची भारतासमवेत गोपनीय माहितीची देवाणघेवाण करण्याची यंत्रणा चांगली आहे. भारतीय यंत्रणा नेहमीच आम्हाला साहाय्य करतात. त्याची आम्हाला आवश्यकता आहे. आम्हाला अमेरिका आणि इंग्लंड यांच्याकडूनही साहाय्य मिळाले आहे. आमचे प्राधान्य आतंकवाद्यांना पकडणे आहे. त्यांना पकडेपर्यंत कोणीही सुरक्षित नाही.

श्रीलंकेत बुरख्यावर बंदीची शक्यता

श्रीलंकेप्रमाणे आता भारतानेही पुढे एखादे आक्रमण होण्यापूर्वीच बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांमागे एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. यामुळेच श्रीलंकेत बुरखा घालण्यावर बंदी येण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकारकडून हालचाली चालू झाल्या आहेत. सरकार मशिदींच्या प्रमुखांशी या संदर्भात चर्चा करत आहे. त्यानंतर ही बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांनी याविषयी राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांच्याशी चर्चा केली आहे. वर्ष १९९० पर्यंत श्रीलंकेमध्ये मुसलमान महिला कधीही बुरखा किंवा हिजाब घालत नव्हत्या. आखाती युद्धानंतर तेथे बुरखा घालण्याचे प्रमाण वाढले. चाड, कॅमेरून, गाबोन, मोरक्को, ऑस्ट्रिया, बल्गेरिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम आणि चीनमधील शिनजियांग प्रांत येथे बुरखा घालण्यावर बंदी आहे.

बॉम्बस्फोटांच्या १७ दिवस आधी आणि २ घंट्यांपूर्वीही भारताने श्रीलंकेला गोपनीय माहिती दिली होती !

भारतीय गुप्तचर यंत्रणा भारतीय शासनकर्त्यांना आणि श्रीलंकेलाही महत्त्वाची गोपनीय माहिती देते; मात्र जसे भारतात त्याचा काहीच परिणाम होत नाही, तसाच श्रीलंकेतही झाला नाही, हेच लक्षात येते ! भारतातही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करणारी सक्षम यंत्रणा अस्तित्वात येणे आवश्यक आहे !

कोलंबो – श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या १७ दिवस आधी आणि २ घंट्यांपूर्वीही भारतीय गुप्तचर विभागाने श्रीलंकेच्या गुप्तचर विभागाला याविषयी गोपनीय माहिती देऊन सतर्क केले होते आणि सतर्क रहाण्यास सांगितले होते, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

१. श्रीलंका सरकारच्या एका सूत्राने सांगितले की, ४ एप्रिल, २० एप्रिल आणि २१ एप्रिल या दिवशी भारताकडून याविषयी माहिती देण्यात आली होती.

२. कोईम्बतूर येथील इस्लामिक स्टेटच्या काही आतंकवाद्यांचे अन्वेषण करतांना ‘नॅशनल तौहीद जमात’चा नेता मौलवी झाहरान बिन हाशिम याचे व्हिडिओ एन्आयएला मिळाले होते. त्यावरून ४ एप्रिलला भारताने श्रीलंकेला पहिली माहिती दिली होती. यात ‘कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला लक्ष्य केले जाऊ शकते’, असे भारताने म्हटले होते.

३. स्फोटांच्या आदल्या दिवशी दिलेल्या माहितीमध्ये भारताने कुठल्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते, ते नमूद केले होते. त्यानंतर स्फोटांच्या २ घंट्यांपूर्वी माहिती देण्यात आली होती.

इस्टर संडे या दिवशी श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांची इस्लामिक स्टेटने दिली माहिती

श्रीलंकेत ७ आत्मघाती आतंकवाद्यांकडून बॉम्बस्फोट

कोलंबो – इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटांचे दायित्व इस्लामिक स्टेटने घेतले. ते ७ आत्मघाती आतंकवाद्यांनी घडवून आणल्याचे या संघटनेने सांगितले आहे.  अबू उबायदा, अबू अल मुख्तार, अबू खलील, अबू हमजा, अबू अल बारा, अबू महंमद आणि अबू अब्दुल्लाह अशी त्यांची नावे आहेत. यांतील प्रत्येकाने कुठे बॉम्बस्फोट घडवले याची माहितीही इस्लामिक स्टेटने दिली आहे. या बॉम्बस्फोटांमध्ये १ सहस्र लोक ठार किंवा घायाळ झाले आहेत, असाही दावा तिने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF