परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अव्यक्त भाव असणारे कै. शशिकांत राणे !

श्री. उमेश नाईक

१. राणेकाकांना आश्रमातील वयाने लहान असलेल्या साधिकांच्या साधनेतील प्रयत्नांचे कौतुक वाटणे

‘कधीतरी मी राणेकाकांसह फोंड्याला जात असे. त्या वेळी मला काकांशी जवळून बोलण्याची संधी मिळायची. काकांना अनावश्यक बोलायला मुळीच आवडत नसे. आम्ही साधनेविषयी बोलत असतांना ते भारावून जात. आश्रमातील लहान वयाच्या साधिका करत असलेले साधनेचे प्रयत्न ऐकून त्यांना त्यांचे अतिशय कौतुक वाटत असे. ‘त्यांचे साधनेतील प्रयत्न अद्भूत आहेत’, असा उल्लेख त्यांच्या बोलण्यात आवर्जून असायचा.

२. स्वतःच्या आनंदात लहान-थोर सर्वांना सामावून घेणे

‘राणेकाकांच्या निधनाच्या दोन मासांपूर्वी परात्पर गुरुमाऊलींनी ‘राणेकाकांच्या तोंडवळ्यावर आता पालट दिसतो’, असे उद्गार काढले होते. त्यानंतर एक दिवस राणेकाकांना परात्पर गुरुमाऊलींच्या सत्संगासाठी बोलावले होते. त्यांनी माझ्याजवळ येऊन ही गोड बातमी हळू आवाजात स्मितहास्य करत सांगितली. अशाच प्रकारे ते त्यांच्या जीवनातील कुठलीही घटना किंवा प्रसंग विभागातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना सांगून आनंद देत; मात्र असे करतांना ‘विभागातील शांतता भंग पावणार नाही’, याचीही काळजी घेत.

३. परात्पर गुरुदेवांविषयी बोलतांना कंठ दाटून येणे

बैठकीत राणेकाका  परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला शब्द जणू ‘रामबाण’ असल्याप्रमाणे स्वीकारत आणि त्यावर सखोल चर्चा करत. ‘गुरुदेव कसे सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान आहेत’, अशा संदर्भात आलेल्या अनुभूतीविषयी सांगतांना त्यांच्या आवाजात कंप निर्माण होऊन ते दाटलेल्या स्वरात सांगत. अशा वेळी गुरुदेवांप्रती भाव जागृत होऊन त्यांना भरून आल्याचे मी अनुभवले आहे. गुरुदेवांवर त्यांची अपार श्रद्धा होती. जीवनातील अनुभवांविषयी अनौपचारिकपणे बोलण्यासाठीच ते फोंड्याला जाण्याचे नियोजन करत. त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला अव्यक्त भाव मला जाणवायचा. याचेच फळ म्हणून गुरुदेवांनी राणेकाकांची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका केली.’

– श्री. उमेश नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक  


Multi Language |Offline reading | PDF