‘फेसबूक’वर साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी अश्‍लील आणि आक्षेपार्ह लिखाण करणार्‍याच्या विरोधात यवतमाळ येथे गुन्हा नोंद

मुंबई – ‘फेसबूक’ या सामाजिक प्रसारमाध्यमावरून (सोशल मीडियावरून) साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी अश्‍लील आणि आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी शुभम माने पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या लिखाणाच्या विरोधात नांदेड येथील श्री. संतोष देवकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

शुभम माने पाटील यांच्या ‘फेसबूक’वर ‘प्रज्ञा ठाकूर हिला साध्वी समजणे म्हणजे वेश्येला पतिव्रता बोलण्यासारखे – देशद्रोही साध्वी’, तसेच ‘भारतात काय घडेल याचा नेम नाही. इथे हिजड्यांचा शाप नको; म्हणून लोक न मागता दहाची नोट सरकवतात. आता तर …(हा शब्द अश्‍लील असल्याने तो प्रसिद्ध केलेला नाही. – संपादक) ही शाप देऊ लागल्या’, असे अत्यंत अश्‍लील आणि आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे.

याविषयी श्री. संतोष देवकर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे, ‘साध्वी प्रज्ञासिंह या हिंदु धर्माच्या साध्वी असून आमच्यासाठी त्या आदरणीय आणि श्रद्धास्थानी आहेत. शुभम माने पाटील यांनी ‘फेसबूक अकाऊंट’वरून अशा प्रकारे जाणीवपूर्वक लिखाण करून त्यांचा अपमान केला आहे. यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’

श्री. संतोष देवकर हे ‘हिंदू आघाडी’ या संघटनेचे मराठवाडा संघटक, तसेच ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी आहेत. ते गोसेवेचे कार्य करतात.


Multi Language |Offline reading | PDF