साधनेच्या आरंभीच्या काळात अनेक युवा साधकांचा आधारस्तंभ असलेले कै. शशिकांत राणे !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे माजी समूह संपादक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शशिकांत राणे यांचे २४ एप्रिल या दिवशी वर्षश्राद्ध झालेे. त्यानिमित्ताने…

कै. शशिकांत राणे

१. ठाणे येथील आरंभीच्या काळातील अनुभव !

१ अ. साधकांची आई-वडिलांच्या मायेने काळजी घेणे : ‘वर्ष १९९५ मध्ये मी साधनेत आल्यावर माझा राणेकाका आणि काकू यांच्याशी संपर्क झाला. त्या वेळी ते दोघेही नोकरी करून साधना करत होते. त्यांचे घर केंद्रातील सर्व साधकांसाठी नेहमी खुले असायचे. त्यांच्या घरी साधकांना कधीही परकेपणा जाणवला नाही. ‘त्यांचे घर हे त्यांचे दोघांचे नसून सर्वांचेच आहे’, असे वाटायचे. ‘ते दोघे वयाने मोठे आहेत’, असे त्यांनी साधकांना कधीच जाणवू दिले नाही. ते दोघेही स्वतःकडे न्यूनता घेऊन आम्हा लहान वयाच्या साधकांचाही प्रसंगी समादेश (सल्ला) घेत. साधकांनाही त्या दोघांचा आधार वाटत असे. घरी कितीही साधक आले, तरी काकू त्यांना काहीतरी खायला देत. साधक नोकरीवरून किंवा महाविद्यालयातून सेवा करायला आले असल्यास काकू लगेच त्यांच्या महाप्रसादाचीही सोय करत.

१ आ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात म्हणण्यासाठी ‘ज्योतसे ज्योत जगाओ ।’ या आरतीचा सराव करून घेतांना ‘हा नाद आतून अनुभवायला हवा’, असे सांगून राणेकाकांनी ‘सोऽहम् नाद जगाओ’ ही ओळ स्वतः म्हणून दाखवणे : वर्ष १९९७ मध्ये ठाण्यातील एका गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात म्हणण्यासाठी राणेकाका माझा आणि एका साधिकेचा ‘ज्योतसे ज्योत जगाओ ।’ या आरतीचा सराव करून घेत होते. तेव्हा ‘सोऽहम् नाद जगाओ ।’ ही ओळ म्हणतांना काकांनी आम्हाला थांबवून सांगितले, ‘‘हा नाद आतून अनुभवायला हवा.’’ मग त्यांनी ती ओळ म्हणून दाखवली. तेव्हा काकांनी ‘भजन म्हणतांना ते स्वतः अनुभवत आहोत’, अशा पद्धतीने म्हणायला हवे’, याची आम्हाला जाणीव करून दिली. तोपर्यंत मी या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता. काका आरती म्हणत असतांना माझे मन एकाग्र व्हायचे. ‘कधी तू येशील रे, स्वानंदा । मजला करी घेण्या रे ।’ हे त्यांचे आवडते भजन ते अगदी सहजतेने आणि भावपूर्णतेने म्हणायचे. काकांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला हे भजन आठवले.

१ इ. वाढदिवसाच्या दिवशी साधकांना अनोखी भेट देऊन प्रतिदिन गुरूंसाठी त्याग करण्याची सवय लावणे : वर्ष १९९८ मध्ये काकांच्या वाढदिवसाच्या दिवशी काका-काकूंनी केंद्रातील साधकांना मातीचे एक छोटे मडके दिले आणि सांगितले, ‘‘आपण प्रतिदिन यात आपल्याकडील १ किंवा २ रुपयांचे नाणे टाकूया आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती रक्कम अर्पण करूया.’’ अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक साधक कुटुंबाला धनाचा त्याग करण्याची सवय लावली. या निमित्ताने प्रत्येक साधकाला प्रतिदिन गुरूंचे स्मरण होऊ लागले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीप्रमाणे केवळ गुरुपौर्णिमेला धनाचा त्याग न होता प्रतिदिन धनाचा त्याग होऊ लागला.

२. पूर्णवेळ साधना करण्यासाठी राणेकाका आणि काकू यांनी गोवा येथे जाणे

२ अ. काका-काकू पूर्णवेळ साधना करण्यासाठी गोव्याला जात असतांना साधकांची ‘एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू’, अशी स्थिती होणे : २६.१.१९९९ या दिवशी काकांचा दिनांकानुसार वाढदिवस होता. त्या दिवशी काका-काकू पूर्णवेळ साधना करण्यासाठी गोवा येथे जाण्यास निघालेे. मी त्या काळात मुंबई सेवाकेंद्रात सेवेला जात असे. मी काका-काकूंना निरोप देण्याकरता महाविद्यालयातून आले होते. तो क्षण मला अजूनही आठवतो. तेव्हा सर्व साधकांना ‘काका-काकू पूर्णवेळ साधक झाले’, याचा आनंदही होत होता आणि ‘आपला आधार चालला’; म्हणून वाईटही वाटत होते. साधनेच्या आरंभीच्या काळात आम्हा तरुण साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटत असे. त्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आनंदाचा आणि प्रोत्साहन देणारा होता.

२ आ. पूर्णवेळ साधना करणार्‍या युवा साधकांना घरची उणीव भासू न देणे : वर्ष १९९९-२००० मध्ये दोनापावला येथे दैनिक सनातन प्रभात चालू झाले. तेव्हा अनेक युवा साधक पूर्णवेळ साधना करत होते. त्या सर्वांना घरची उणीव भासू नये; म्हणून काका कधीतरी सर्वांना बाहेर नेऊन खाऊ घालत. तेव्हा काका ‘किती साधक आहेत ?’, याचा कधीच विचार करत नसत.

‘राणेकाका आणि काकू यांच्याप्रमाणे आम्हालाही तन, मन अन् धन यांचा त्याग करता येऊ दे’, अशी ईश्‍वराच्या चरणी प्रार्थना !’

– कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF