परात्पर गुरुदेवांनी सुचवल्यावर त्यांच्यासमवेतचे क्षणमोती गोळा करण्याचा प्रयत्न करणारी कु. गीता चौधरी !

साधकांची साधनेतील वाटचाल आनंदी बनवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. गुरुदेवांनीच लिखाण करण्यास सुचवणे !

१ अ. प.पू. डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहिण्याचा प्रयत्न करूनही न्यूनगंडामुळे सूत्रे संग्रहित करायला न जमणे : ‘आतापर्यंत मी बर्‍याचदा परात्पर गुरु डॉक्टरांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि गमती-जमती लिहिण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या अल्प बुद्धीला त्यांच्याविषयीची सूत्रे संग्रहित करणे काही केल्या जमतच नव्हते. कधी स्वतःविषयी न्यूनगंड असायचा की, मी हे कधीतरी करू शकेन का ? ‘माझ्यात काहीच भाव नाही, तर हे लिहून इतरांना देतांना त्यांना लाभ झाला नाही तर काय ? मी तर गुरूंच्या सेवेचा काहीच लाभ करून घेतला नाही किंवा मी उगाचच वेळ देऊन स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यासाठी हे करत नाही ना ?’, असे कितीतरी विचार लिखाण करण्यापासून मला थांबवत होते.

कु. गीता चौधरी

१ आ. प.पू. गुरुदेवांनी लिखाण करण्यास सांगणे, त्यानंतरही त्यासाठी मनाचा संघर्ष होणे आणि शेवटी प्रार्थना करून लिहिण्याचे ठरवणे : ‘मला गुरुदेवांनीच घडवले आहे. त्यामुळे जमेल तसे कृतज्ञता म्हणून तरी मी तोडके-मोडके लिहिले पाहिजे. मी त्यातून काही शिकले नाही, तरी समष्टीला काहीतरी लाभ होईल’, हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे एक दिवस स्वागतकक्षात गुरुदेवांचा दूरभाष आला असता मी हा विचार त्यांना सांगितला. त्या वेळी तेही म्हणाले, ‘‘हो. मधल्या पिढीने काहीच लिहून दिले नाही ना ! तू लिखाण कर.’’ मी ‘हो’ म्हणाले. त्यानंतरही लिखाण करण्यासाठी मनाचा बराच संघर्ष झाला. ‘कुठून आरंभ करायचा ? काय लिहायचे ?’, हे काहीच सुचत नव्हते. शेवटी त्यांनाच प्रार्थना करून लिखाण करायला आरंभ केला आहे.

१ इ. जुन्या दैनंदिनी (डायर्‍या) चाळल्यावर काही सूत्रे आपोआप आठवणे : साधनेत येण्यापूर्वी मी दैनंदिनी (डायरी) लिहायचे. त्यात केवळ दिवसभराच्या घडामोडी असायच्या. साधनेसाठी आश्रमात आल्यावरही मी ती लिहायचे. त्यात प.पू. डॉक्टरांशी झालेले संवाद, त्यांनी सांगितलेल्या चुका, शिकवलेली सूत्रे, दृष्टीकोन इत्यादी लिहीत होते. मधल्या या काळात जुन्या दैनंदिनी जरा चाळल्यावर त्यांतील काही सूत्रे मला आपोआप आठवायला लागली.

१ ई. एकदा सूत्रे लिहायचे ठरवून ‘स्वतःत भाव नाही’, याचे वाईट वाटून लिखाण न करणे आणि दुसर्‍या दिवशी एका साधिकेने ‘प.पू. डॉक्टर तुझी आठवण काढत होते’, असे सांगितल्यावर भावजागृती होऊन आधीचे बरेच प्रसंग आठवणे : १.४.२०१६ या दिवशी पुन्हा ‘माझ्यात काहीच भाव नाही. आताच्या गोपी कु. तृप्ती गावडे, कु. दीपाली मतकर, कु. स्वाती गायकवाड यांच्याप्रमाणे गुरुदेवांची भावपूर्ण सेवा मी कधीच केली नाही. देवाने संधी दिली; पण मी तिचा लाभ करून घेण्यास अल्प पडले’, याचे वाईट वाटत होते. त्यामुळे ठरवल्याप्रमाणे रात्री टंकलेखनाला न जाता मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले. तेथेही हेच विचार येऊन मला रडू येऊ लागले. नंतर मी झोपायला गेले. दुसर्‍याच  दिवशी सकाळी आता प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील सेवा करणारी साधिका म्हणाली, ‘‘प.पू. डॉक्टर तुझी आठवण काढत होते.’’ मी ‘कशाच्या संदर्भात ?’, असे विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘संदर्भ काहीही नव्हता; पण ते म्हणाले की, पूर्वी स्वागतकक्षातील गीताही खोलीतील सेवा करायची. तीही तुमच्याप्रमाणेच झोकून देऊन सेवा करायची.’’ हे ऐकून काही वेळ मी स्तब्धच झाले. प.पू. डॉक्टर सर्वज्ञ आहेत. माझ्या मनातील न्यूनगंड न्यून करण्यासाठीच जणू त्यांनी या संभाषणातून मला प्रेरणा आणि शक्ती दिली. दिवसभरात प.पू. डॉक्टरांचे आताचे संभाषण आणि त्यांच्या सेवेत असतांनाचे क्षणमोती आठवून एकीकडे आनंद अन् एकीकडे भाव जाणवत होता. माझ्यासमोर इतके क्षणमोती पडले (प्रसंग आठवले) की, माझ्या छोट्याशा आेंजळीत ते मावेचनात ! एक उचलतांना दुसरा पडेल याची भीती वाटत होती. जे थोडे मिळवता आले, ते सांभाळून ठेवण्याचा (लिहिण्याचा) प्रयत्न करते. परम पूज्य, क्षमा करा. ते क्षणमोती गोळा करण्याचीही माझी क्षमता नाही. तुम्हीच ती माझ्याकडून वाढवून घ्या.

२. सुटीत आश्रमात येणे, सेवा करतांना भरपूर आनंद मिळणे आणि पूर्णवेळ साधिका होण्याचा निर्णय घेणे

आरंभी केवळ ३ मास (महिनेे) मी सत्संग आणि सेवा केली होती. त्यानंतर १२ वीची परीक्षा असल्यामुळे मी जास्त काही करत नव्हते. परीक्षा झाल्यावर साधारण वर्ष १९९८ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागले. त्या वेळी ‘पूर्णवेळ’ याचा अर्थही मला ठाऊक नव्हता. प.पू. गुरुदेव, त्यांची कृपा, यांविषयीही जास्त काही ठाऊक नव्हते. प्रत्यक्षात माझी बहीण कु. अंजली चौधरी (आताची सौ. मुक्ती तांबे) हिला सुटीत भेटण्यासाठी मी आश्रमात आले होते. त्या वेळी मी १७ वर्षांची होते. त्यानंतर मलाही पूर्णवेळ साधिका होण्याविषयी विचारण्यात आले. त्या २ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत सेवा करतांना मला भरपूर आनंद मिळत होता. ‘आता पुढे महाविद्यालयात जायला नको, इथेच सेवा करूया’, असे विचार येत असल्याने मी ‘हो’ म्हणाले. माझ्या आईलाही आनंद झाला. त्यानंतर मात्र ‘आश्रमजीवनाची कशी सवय झाली आणि मी कधी पूर्णवेळ साधिका झाले ?’, हे माझ्या लक्षातच आले नाही.

३. साधिकेने आश्रमात रहाण्याविषयी घरच्या सर्वांनाच कुतूहल असणे अन् आश्रमात सलग चार मास (महिने) राहून नंतर गणेश चतुर्थीसाठी घरी जाणे

याआधी आईला सोडून मी कुठेच राहिलेली नसल्यामुळे आणि इतरांमध्ये लगेच मिसळण्याचा माझा स्वभाव नसल्यामुळे ‘मी कशी राहीन ?’, याचे आरंभी घरच्या सर्वांनाच कुतूहल होते. मी प्रथमच आश्रमात सलग चार मास (महिने) राहून नंतर गणेश चतुर्थीसाठी घरी गेले. या चार मासांत (महिन्यांत) मी आईला क्वचितच संपर्क केला असेन. आश्रमात येण्याअगोदर ‘इतरांप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावे’, असे मलाही तीव्रतेने वाटायचे; पण आश्रमात आल्यावर ‘आता ते नको’, असा निर्णय आपोआपच झाला. इतरांनीही त्यासंदर्भात विचारल्यावर मी ‘नाही’, असे सांगितले.’

– कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (एप्रिल २०१६)


Multi Language |Offline reading | PDF