गोव्याच्या मंत्र्यांना ‘नोकरी का मिळत नाही?’, असा प्रश्‍न विचारणार्‍या तरुणाला अटक आणि सुटका

  • भाजपच्या राज्यातील मोगलाई ! भारतीय राज्यघटनेने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याची ही गळचेपीच आहे. निवडणूक आयोगाने याची नोंद घेऊन कारवाई केली पाहिजे !
  • कायदाद्रोही पोलीस ! पोलिसांनी कोणत्या आधारावर या तरुणाला अटक केली ? उद्या प्रत्येकालाच राज्यकर्त्यांना प्रश्‍न विचारला म्हणून अटक केली जाणार आहे का ? ही लोकशाही आहे का ?

पणजी – गेल्या १० वर्षांपासून आम्ही तुमचे समर्थक आहोत. तुम्ही आम्हाला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र तरीही आम्ही बेरोजगार आहोत. नोकर्‍या आहेत कुठे ?, आम्हाला अजूनही नोकरी का मिळत नाही?, असा प्रश्‍न गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांना दर्शन गावकर नावाच्या तरुणाने वाळपई येथे प्रचाराच्या बैठकीच्या वेळी विचारला. त्याच्या या प्रश्‍नामुळे बैठकीतील वातावरण तापले. त्यामुळे पोलिसांनी दर्शन याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

१. पत्रकारांनी राणे यांना या घटनेविषयी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, तर त्यांच्या समर्थकांनी सांगितले की, दर्शन याने बैठकीचे वातावरण बिघडवण्यासाठीच हा प्रश्‍न विचारला होता. हे विरोधी पक्षांचे षड्यंत्र होते. बैठकीत प्रश्‍न विचारण्याची एक पद्धत असते; मात्र दर्शन आरडाओरडा करत अयोग्य पद्धतीने प्रश्‍न विचारत होता. (कोण कशा पद्धतीने प्रश्‍न विचारतो आहे, याकडे पहाण्यापेक्षा त्याने विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर का दिले नाही ?, याचे उत्तर राणे यांचे समर्थक आणि स्वतः राणे यांनी दिले पाहिजे ! जनतेकडे मते मागण्याच्या वेळी जनतेचा त्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने उद्रेक होत असेल, तर त्याचा विचार सत्ताधार्‍यांनी करायला हवा अन्यथा उद्या हीच जनता त्यांना धडा शिकवल्याविना रहाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)

२. काँग्रेसने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते ट्रेजानो डिमेलो यांनी केला आहे. (काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मणी असल्याने त्यांनी एकमेकांवर आरोप केले, तरी जनता दोघांनाही ओळखून आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF