निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघांत मतदान

  • सर्वाधिक मतदान कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात

  • आता २३ मेची प्रतीक्षा !

कोल्हापूर – पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, नगर, मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या १४ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. सर्वाधिक मतदान कोल्हापूर येथे झाले.

सांगली ५७ टक्के, कोल्हापूर ६५ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ५८ टक्के सरासरी मतदान झाल्याचा अंदाज !

सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

कोल्हापूर, २३ एप्रिल (वार्ता.) – किरकोळ अपवाद वगळता सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मतदान शांततेत मतदान पार पडले. कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीने मतदान झाले, तर सातारा जिल्ह्यात अत्यंत संथगतीने मतदान झाले. दुपारी ५ पर्यंत कोल्हापूर येथे सर्वाधिक ६५ टक्के मतदान झाले होते. या सर्वांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून २३ मे या दिवशी मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   दुपारी १ वाजेपर्यंत अत्यंत संथगतीने मतदान चालू होते. दुपारी तीननंतर मतदानाला गती आल्याचे दिसून आले.

१. कोल्हापूर – धामणी खोर्‍यातील काही गावांनी पाण्याच्या सूत्रावरून मतदानावर बहिष्कार घोषित केला होता. तथापि पन्हाळा तालुक्यातील कोदवडे, आकुर्डे, सुळे, पनोत्रे, राधानगरी तालुक्यातील माणबेट आणि चौक या गावांतील गावकर्‍यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला.

२. सांगलीत एका मतदान केंद्रावर बटण न दाबता भाजपच्या उमेदवारालाच मतदान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. त्यामुळे त्रिकोणी बागेजवळील पहिले यंत्र ‘सील’ करून तेथे नवीन यंत्र बसवण्यात आले. या भागातील दोन सहस्र लोकांची नावे सूचीत नसल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

३. सांगलीत अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या. सकाळी काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याने काही ठिकाणी मतदान विलंबाने चालू झाले; मात्र प्रशासनाने थोड्याच काळात पर्यायी व्यवस्था केल्याने मतदान चालू झाले.

४. सांगलीत काही ठिकाणी जिवंत व्यक्तीऐवजी मृत व्यक्तीचे छायाचित्र असणे, नाव चुकीचे असणे, एका भागातील नावे दुसरीकडेच आढळणे यांसह अनेक त्रुटी आढळून आल्या. यामुळे विशेष करून वयोवृद्धांना मनस्तापास सामोरे जावे लागले.

५. बेळगावमध्ये दुपारी ३ पर्यंत सरासरी ३५ टक्के मतदान झाल्याचे वृत्त होते.

६. सोलापूर – करमाळा तालुक्यात रिद्देवाडी ग्रामस्थांनी रस्ता न केल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार घातला. केवळ दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या ४२ वर्षांपासून बनवण्यात आलेला नाही.

७. कदमवाडी (कोल्हापूर) परिसरात ‘पेटीएम्’वरून पैसे वाटप करतांना पोलिसांनी दोन महिलांना कह्यात घेतले. याचे अधिक अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

८. हातकणंगले मतदारसंघात भवानीनगर येथे एका मतदाराने मतदान करतांना स्वत:चे चित्रीकरण करून ते सामाजिक संकेस्थळावर प्रसारीत केले. मतदान केंद्रावर भ्रमणभाष नेण्यास बंदी केलेली असतांना केवळ इर्षेपोटी हा प्रकार केल्याचे समजते.

क्षणचित्रे

१. सांगली – गेल्या लोकसभेला, विधानसभेला, इतकेच काय तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेले असूनही अनेकांची नावे या वेळी मतदारसूचीत नव्हती, असा आरोप अनेक नागरिकांनी केला.

२. ईश्‍वरपूर (सांगली) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भ्रमणभाष ‘हॅक’ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. भ्रमणभाष हॅक करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचे समोर आले. या प्रकरणी जयंत पाटील यांनी अज्ञाताच्या विरोधात ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

३. कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेती व्यवसाय विद्या मंदिर परिसरात सकाळी नऊ वाजता १०० मीटरच्या आत थांबण्याच्या कारणावरून काही लोकप्रतिधींना पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कह्यात घेतले. ही घटना समजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे तेथे आले आणि त्यांनी डॉ. अमृतकर यांच्याशी वाद घातला. भाजप पोलिसांचा वापर करून दडपशाही करत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी या वेळी केला. यानंतर डॉ. अमृतकर यांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करणार असल्याचे सांगितले.

पुण्यात ४४ टक्के, तर बारामतीमध्ये ५२ टक्के मतदान

पुणे – पुणे मतदारसंघातून ३१, तर बारामती मतदारसंघातून १८ उमेदवार निवडणूक लढवत असले, तरी पुण्यात मुख्य लढत भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यामध्ये, तर बारामतीमध्ये मुख्य लढत भाजपच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आहे. पुण्यात ४४ टक्के, तर बारामतीला ५२ टक्के मतदान झाले.

क्षणचित्रे

  • विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५६ क्रमांकाच्या शाळेत इव्हीएम् यंत्र बंद पडल्याने काही वेळ मतदान थांबवण्यात आले आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे मावळमध्ये उमेदवार म्हणून उभे असले, तरी त्यांचे स्वतःचे नाव बारामती येथे असल्याने त्यांना स्वतःला तेथे मत देता येणार नाही.
  • यंदाही काही जणांची नावे मतदारसूचीतून गायब झाली होती. त्यामुळे मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. (प्रशासकीय अनागोंदी कारभार ! – संपादक)

बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन ! – अजित पवार

बारामती (जिल्हा पुणे) – बारामती भाजपने जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन आणि भाजप हरला, तर भाजपने निवृत्ती घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केले. मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बारामतीचा गड सुप्रिया सुळे १०० टक्के राखणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे, असेही त्यांनी सांगितले.

नगर – येथे ईव्हीएम् विरुद्ध अनेक वर्षांपासून लढा देणारे जालिंदर चोभे यांनी मतदानाच्या वेळी यंत्रच फोडण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी ते बाबुर्डी बेंद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असतांना खिशातून काहीतरी टणक लोखंडी वस्तू काढून ती जोरात यंत्रावर आदळली. एकदम आवाज झाल्याने तेथील कर्मचार्‍यांनी धाव घेऊन त्यांना पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. चोभे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम् विरोधात लढा चालू आहे. यासंबंधी यापूर्वी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. निवडणूक आयोगाला त्यांनी वारंवार निवेदनेही दिलेली आहेत.

नगर विभागात एकूण ३९६ मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने ती पालटावी लागली. त्यामुळे काही वेळ मतदान थांबवावे लागले होते. (एवढ्या मोठ्या संख्येत मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला म्हणजे यंत्रांची मतदानापूर्वी पडताळणी केली नव्हती का ? असे दायित्वशून्य प्रशासन जनहित कधीतरी साधू शकेल का ? – संपादक)

एरंडोल (जळगाव) येथे दीड घंटा विलंबाने मतदान चालू

जळगाव – कासोदा तालुका एरंडोल येथे बूथ क्रमांक १७६ वरील मतदानयंत्रात बिघाड झाल्याने दीड घंट्यानंतर मतदान चालू झाले. त्यामुळे मतदानासाठी दीड घंटा वेळ वाढवून देण्यात यावी, अशी मागणी कासोदा येथील सरपंचांनी मतदान अधिकार्‍यांकडे केली आहे.

रावेर (जळगाव) येथे तापमान ४२ अंश असूनही ५६ टक्क्यांच्यावर मतदान झाले. जळगाव येथे ४४ अंशावर पारा असतांना ५२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. रावेर येथे भाजप येण्याची चिन्हे असल्याने केवळ मताधिक्य कुठल्या विधानसभा मतदारसंघातून असेल ते पहायचे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. जळगावमध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींमध्ये मारामारी झाली होती.

रायगड जिल्ह्यात ६४.४७ टक्के मतदान

रायगड जिल्ह्यात युतीचे उमेदवार खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यात लढत होणार आहे. रायगड येथे ६४.४७ टक्के मतदान झाले. रायगड येथे १५ लक्ष ३२ सहस्र ७८१ मतदारांपैकी ९ लक्ष ८८ सहस्र १९२ मतदारांनी मतदान केले.

पुणे – कसबा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर भाजपचा राजरोसपणे प्रचार करणार्‍या निवडणूक अधिकार्‍याला काँग्रेसच्याच पदाधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. प्रभाग क्रमांक १८८ मधील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे तेथे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्या निवडणूक अधिकार्‍याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून त्याला पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF