साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

  • हे ११ वर्षांनंतर अमित शहा का बोलत आहेत ? इतकी वर्षे ते का बोलले नाहीत ?
  • जेव्हा साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना अटक करण्यात आली, तेव्हा भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभा राहिला नाही ?
  • साध्वी प्रज्ञासिंह यांना छळणार्‍यांपैकी एक असणारे परमबीर सिंह यांना महाराष्ट्रातील भाजप सरकारने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस महासंचालक का बनवले आहे ? त्यांची चौकशी करून त्यांच्यावर इतक्या वर्षांत कारवाई का केली नाही, याची उत्तरेही अमित शहा यांनी दिली पाहिजेत !

 

कोलकाता – साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात ‘हिंदु आतंकवादा’च्या नावाखाली खोटे गुन्हे नोंदवण्यात आले होते. याद्वारे भारतीय संस्कृतीला जगभरात अपकीर्त करण्यात आले. न्यायालयात त्यांचा विरोधातील खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे समर्थन केले. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शहा पुढे म्हणाले की, स्वामी असीमानंद आणि इतर लोक यांच्या विरोधात खोटे खटले प्रविष्ट करून त्यांना आरोपी बनवण्यात आले. समझौता एक्सप्रेसमध्ये स्फोट करणारे लोक कुठे आहेत ? ज्या लोकांना पकडण्यात आले होते, त्यांना का सोडण्यात आले ?, असे प्रश्‍नही त्यांनी विचारले.

असे सांगणे हेही भाजपच्या पंतप्रधानांना लज्जास्पद ! मालेगाव प्रकरण तात्काळ निकालात काढण्यासाठी भाजप सरकारने काय प्रयत्न केले ?

‘अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवार (राहुल गांधी आणि सोनिया गांधी) जामिनावर आहेत; पण त्याविषयी चर्चा होत नाही; पण भोपाळमधील उमेदवार (साध्वी प्रज्ञासिंह) जामिनावर बाहेर असतील, तर त्यावरून वाद निर्माण केला जातो’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञासिंह यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीचे समर्थन केले. ते इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’च्या मुलाखतीत बोलत होते.’


Multi Language |Offline reading | PDF