श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवून आणणारी जिहादी संघटना ‘नॅशनल तौहीद जमात’ तमिळनाडूतही सक्रीय

भारताने या संघटनेवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, तसेच भारतात पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत; म्हणून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी संघटनांवरही आताच बंदी घातली पाहिजे !

नवी देहली – श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमागे ‘नॅशनल तौहीद जमात’ ही जिहादी संघटना असल्याचे श्रीलंका सरकारने घोषित केले आहे. या संंघटनेची शाखा तमिळनाडूमध्येही सक्रीय आहे. त्यामुळे भारतातील यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

१. ‘नॅशनल तौहीद जमात’ श्रीलंकेच्या पूर्व भागात सक्रीय आहे. शरीयत कायदा लागू करणे आणि महिलांसाठी बुरख्याची सक्ती, अशी या संघटनेची भूमिका आहे. या संघटनेने यापूर्वी बौद्ध धर्मियांच्या विरोधातही कारवाया केल्या होत्या.

२. अभ्यासकांच्या मते, ‘या स्फोटांचे स्वरूप पहाता परकीय शक्तींच्या साहाय्याविना स्फोट घडवणे अशक्य आहे.’

३. श्रीलंकेत झालेले बॉम्बस्फोट आणि वर्ष २०१६ मध्ये बांगलादेशामधील ढाका येथे बेकरीत झालेले आत्मघाती बॉम्बस्फोट यांत साम्य असल्याचे सांगितले जाते. बांगलादेशामधील बॉम्बस्फोटही स्थानिक तरुणांनीच घडवले होते; मात्र त्या तरुणांना इस्लामिक स्टेटने प्रशिक्षण दिले होते.

४. वर्ष २०१४ मध्ये या संघटनेची स्थापना झाली. श्रीलंकेतील ‘पीस लव्हिंग मुस्लिम्स इन श्रीलंका’ या संघटनेने या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी चालू केली होती. त्यासाठी श्रीलंका सरकारसह संयुक्त राष्ट्रांकडे यासाठी मागणी केली होती; मात्र अजूनही तिच्यावर बंदी घालण्यात आली नाही. त्याचाच परिणाम आज दिसून येत आहे.

५. नॅशनल तौहीद जमातचा उद्देश श्रीलंकेत इस्लामचा विस्तार करणे, हा आहे. इस्लामच्या प्रचार आणि प्रसार यांसाठी काहीही करण्यासाठी ही संघटना सिद्ध आहे. ती वहाबी विचारसरणीनुसार कार्य करत आहे.

६. या संघटनेचा चिटणीस अब्दुल रैजिक याने सार्वजनिक भाषणामध्ये बौद्ध धर्म आणि धर्मीय यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. हिंसाचार घडवल्यावरून त्याला अटक करण्यात आली होती.

७. श्रीलंकेच्या तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी या संघटनेच्या कारवायांच्या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. या संघटनेचे इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचे गुप्तचरांनी सांगितले होते.


Multi Language |Offline reading | PDF