राजकीय स्तरावर ढवळीकर कुटुंबियांवर वैयक्तिक आणि हीन पातळीवर होत असलेल्या टीकेचा ढवळीकर कुटुंबियांच्या वतीने निषेध !

फोंडा येथे पत्रकार परिषद

फोंडा , २२ एप्रिल (वार्ता.) – लोकसभेची निवडणूक आणि शिरोडा मतदारसंघाची पोटनिवडणूक यांना अनुसरून काही राजकीय व्यक्ती ढवळीकर कुटुंबियांवर वैयक्तिक स्तरावर हीन पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पोटनिवडणुकीचा प्रचार हीन स्तरावर पोचला आहे. वास्तविक निवडणूक आणि ढवळीकर कुटुंबीय यांचा परस्परांशी संबंध नाही. निवडणुकीत राजकीय व्यक्ती ढवळीकर कुटुंबियांना अनुसरून किंवा कुटुंबियांतील सदस्यांना अनुसरून शिवीगाळ करत आहेत किंवा त्यांना अनुसरून अपशब्द वापरत आहेत. या घटनांचा आम्ही निषेध करतो, असे ढवळीकर कुटुंबियांच्या वतीने २२ एप्रिल या दिवशी सायंकाळी उशिरा येथे घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

या पत्रकार परिषदेला मगोपचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांच्या पत्नी सौ. ज्योती  ढवळीकर, श्री. सुदिन ढवळीकर यांची कन्या सौ. राजसी देसाई, शिरोडा मतदारसंघातील मगोपचे उमेदवार श्री. दीपक ढवळीकर यांची बहीण सौ. सविता देसाई, सौ. लता दीपक ढवळीकर, डॉ. संदीप माधवराव ढवळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ढवळीकर कुटुंबीय पत्रकार परिषदेत म्हणाले, मगो पक्ष हा माधवराव ढवळीकर यांचा पक्ष आहे, अशी टीका केली जात आहे. विरोध करतांनाही भाषा एकदम खालच्या स्तराची वापरली जात आहे. श्री. दीपक ढवळीकर यांचा अवमान करणारी पत्रके वितरित केली  जात आहेत. ढवळीकर यांच्या विरोधात करण्यात येत असलेल्या प्रचाराला कोणीही बळी पडू नये. श्री. दीपक आणि श्री. सुदिन ढवळीकर मंत्रीपदावर असतांना त्यांना मंत्रीमंडळ बैठकीत एका मंत्र्याने अपशब्द वापरले; मात्र याचा त्या वेळी मंत्रीमंडळातील एकाही सदस्याने साधा निषेधही केला नाही.

डॉ. संदीप ढवळीकर म्हणाले, मगोपचे माजी नेते श्री. लवू मामलेदार सध्या श्री. सुदिन ढवळीकर यांच्यावर खोटा आरोप करत आहेत. वास्तविक श्री. सुदिन ढवळीकर आणि श्री. लवू मामलेदार यांचे लहानपणापासून मैत्रीचे संबंध होते. श्री. लवू मामलेदार यांनी त्यांना जिवे मारण्याचा डाव होता, असा खोटा आरोप नुकताच केला आहे. श्री. लवू मामलेदार यांनी असे खोटे आरोप करण्याऐवजी थेट आमच्याशी बोलण्यास सिद्ध व्हावे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now