सभापती मायकल लोबो, मंत्री आजगावकर आणि मंत्री पाऊसकर यांना न्यायालयाची नोटीस

सभापतींनी मगोपच्या २ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचे प्रकरण

पणजी,२२ एप्रिल (वार्ता.) – गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी २७ मार्चला उत्तररात्री मगोपतून फुटून निराळा गट करून भाजपात प्रवेश केला. या वेळी विधानसभेचे हंगामी सभापती मायकल लोबो यांनी मगोपच्या या २ सदस्यांना भाजपात प्रवेश करण्यास मान्यता दिली होती. हंगामी सभापती मायकल लोबो यांच्या या निर्णयाला याचिकादार सदानंद वायंगणकर यांनी आव्हान दिले आहे,तसेच उपमुख्यमंत्री आजगावकर आणि मंत्री पाऊसकर यांना अपात्र ठवण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने २२ एप्रिल या दिवशी गोवा विधानसभेचे हंगामी सभापती,उपमुख्यमंत्री आजगावकर आणि मंत्री पाऊसकर यांना नोटीस पाठवली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिल या दिवशी होणार आहे.

याचिकादाराने याचिकेत म्हटले आहे की,१९ मार्च या दिवशी ज्या पद्धतीने विद्यमान भाजपप्रणीत सरकार अस्तित्वात आले, तेव्हापासून भाजप आणि शासनातील तत्कालीन घटक पक्ष मगोप यांच्यामध्ये मतभेद असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.मगोप या वेळी सरकारचा पाठिंबा काढून घेणार होती आणि यामुळे विद्यमान सरकार अस्थिर होणार होते.हे टाळण्यासाठी भाजपने मगोपचे २ आमदार रात्री २ वाजता फोडले.हंगामी सभापती लोबो हे त्या वेळी त्या ठिकाणी संबंधित कागदपत्रे स्वीकारण्यासाठी केवळ उपस्थित नव्हते,तर त्यांनी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यास घटनात्मक अधिकार नसतांनाही मान्यता दिली.या वेळी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांचीही उपस्थिती होती.या घटनेच्या दुसर्‍या दिवशी मगोपच्या कार्यकारी समितीने एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते आणि या बैठकीत मगोपच्या एका सदस्याचे निलंबन केले जाणार होते अन् यामुळेच मध्यरात्रीनंतर भाजपने हे नाट्य रचले.


Multi Language |Offline reading | PDF