प.पू. आबा उपाध्ये यांच्या शुभहस्ते कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या गौरवास्पद कार्याची माहिती देणार्‍या ‘स्मृतीगंध’ स्मरणिकेचे प्रकाशन

गोरेगाव येथे कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा !

कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्याविषयीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. उदयकुमार उपाध्ये आणि प.पू. आबा उपाध्ये

 

मुंबई, २२ एप्रिल (वार्ता.) – गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी गोरेगाव येथे कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी स्थापन केलेली शाळा ‘महाराष्ट्र विद्यालय’ या नावाने नावारूपाला आली आहे. या शाळेत २१ एप्रिल या दिवशी कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या वेळी कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचे पती प.पू. आबा उपाध्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांच्या शुभहस्ते कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या गौरवास्पद कार्याची स्मृती जागृत करणार्‍या ‘स्मृतीगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. संजीव करमरकर यांनी प्रस्तावना केली. या वेळी प्रवचनकार आणि कीर्तनकार श्री. श्रीराम पुरोहित यांनी व्याख्यानाद्वारे कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या शैक्षणिक कार्याचे श्रेष्ठत्व सांगितले. महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विलास धस, उपाध्ये कुटुंबीय यांसह शाळेचे माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन कशा प्रकारे शैक्षणिक कार्य उभे केले, याची माहिती देणारा ‘व्हिडिओ’ या वेळी दाखवण्यात आला. उपस्थित सर्वांनी कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला. उपस्थितांना ‘स्मृतीगंध’ ही स्मरणिका भेट देण्यात आली. शेवटी प.पू. आबा यांच्या मानसकन्या श्रीमती मंगलागौरी काणे यांनी पसायदान म्हटले. या वेळी नातेवाईक तसेच हितचिंतक उपस्थित होते.

सोहळ्याला उपस्थित कुटुंबीय

१. प.पू. आबा उपाध्ये यांचा मोठा मुलगा श्री. उदयकुमार उपाध्ये आणि नातू चैतन्य

२. प.पू. आबा उपाध्ये यांची मुलगी सौ. विद्या आणि जावई श्री. विनायक शेवडे, नातू श्री. अमित अन् नातसून सौ. मयुरी, नात सौ. अपर्णा आणि नातजावई श्री. अजित बेडेकर

३. प.पू. आबा उपाध्ये यांची मुलगी श्रीमती संध्या कोठावळे, नातू श्री. नीलेश अन् नातसून सौ. कीर्ती, पणती कु. रिद्धी आणि सिद्धी, नातसून सौ. अमृता कोठावळे आणि पणती कु. केतकी

४. प.पू. आबा उपाध्ये यांची मुलगी सौ. राजश्री आणि जावई श्री. श्रीरंग फणसळकर, नात सौ. आरती आणि नातजावई श्री. आनंद कोठावळे, पणतू कु. आर्यन, नात सौ. श्रुती जोशी

५. प.पू. आबा उपाध्ये यांची धाकटी मुलगी सौ. तेजश्री पत्की

सौ. मंगलावहिनी यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष पहायला मिळणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – उद्योगमंत्री सुभाष देसाई

सौ. मंगलावहिनी यांनी शून्यातून शैक्षणिक कार्य निर्माण केले. या कार्यात साहाय्य करण्याची संधी मिळाली, त्याविषयी मला आनंद वाटतो. आयुष्यामध्ये अनेकजण काहीना काही सुचवत असतात; मात्र काही व्यक्तींचे शब्द असे असतात की, त्यांच्या शब्दांना नाही म्हणता येत नाही. असेच सौ. मंगलावहिनी यांचे शब्द तोलामोलाचे होते. त्यामुळे या शैक्षणिक कार्याला हातभार लावणे हे स्वाभाविकच होते. त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचा वटवृक्ष पहायला मिळणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

शैक्षणिक क्षेत्रात आदर्श असणारी शाळा सौ. उपाध्येबाईंनी निर्माण केली ! – प्रवचनकार आणि कीर्तनकार श्रीराम पुरोहित

शिक्षक या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. यातील ‘शि’ म्हणजे ‘शिकवत असतांना जो स्वत:ही शिकतो’. सौ. उपाध्येबाईंनी स्वत: रात्रशाळेत प्रथम क्रमांक मिळवून कर्तृत्व दाखवले. ‘क्ष’ चा अर्थ ‘जो क्षणाचीही उसंत घेत नाही असा’ आणि ‘क’ चा अर्थ कर्तृत्वाचे मळे फुलवणारा ! याप्रमाणे जो असतो, तोच खरा शिक्षक असतो. उपाध्येबाई यांचे कार्य पाहून ही व्याख्या सार्थ ठरते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते; मात्र येथे सौ. उपाध्येबाई यांच्या पाठीशी त्यांचे पती आबा उपाध्ये हे खंबीरपणे उभे राहिले. आज सर्वत्र शैक्षणिक क्षेत्राची अधोगती पहायला मिळत आहे. मला या विषयावर बोलण्याची संधी मिळेल, तेथे महाराष्ट्र विद्यालयात दिल्या जाणार्‍या शैक्षणिक दर्जाचा आदर्श सांगेन. ‘मन, मनगट आणि विचार बळकट करू शकेल, ते शिक्षण असते’ असे स्वामी विवेकानंद यांनी, तर पू. गोळवलकरगुरुजी यांनी शिक्षणाची व्याख्या ‘मानवाच्या अंतर्गत क्षमतांचे प्रकटीकरण’, अशी केली आहे. माहिती मेंदूत कोंबणे म्हणजे शिक्षण नव्हे. स्वामी विवेकानंद आणि पू. गोळवलकरगुरुजी यांच्याप्रमाणे सौ. उपाध्येबाई यांनी विद्यार्थ्यांना घडवले. ज्याप्रमाणे आर्य चाणक्य यांनी मगध साम्राज्य उभे केले, त्याप्रमाणे सौ. उपाध्येबाई यांनी शैक्षणिक कार्य केले.

प.पू. आबा उपाध्ये यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीची आस्थेने विचारपूस करणे !

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीची प.पू. आबा उपाध्ये यांनी आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांशी ओळख करून देतांना सनातनच्या आश्रमातून आले असल्याचे सांगून वृत्तासाठी जी माहिती लागेल, ती देण्यास सांगितली.

प.पू. आबा यांची मुलगी सौ. राजश्री फणसळकर यांनी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनाही दूरभाषवरून कार्यक्रमाची माहिती दिली.


Multi Language |Offline reading | PDF