विमान आस्थापनांनी प्रवाशांना प्रवास नाकारल्यास लेखी कळवणे बंधनकारक ! – मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक मंच

मुंबई – प्रवाशाला कोणत्याही कारणास्तव प्रवास नाकारला गेला, तर त्याविषयी विमान आस्थापनांनी संबंधित प्रवाशाला लेखी कळवणे बंधनकारक आहे, असा आदेश मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. ‘जेट एअरवेज’ या आस्थापनाकडून एका प्रवाशाच्या संदर्भात असा प्रकार घडल्यानंतर भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्राहक मंचाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी ग्राहक मंचाने ‘जेट एअरवेज’ आस्थापनाला दोषी ठरवून संबंधित महिला प्रवाशाला हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.

सायली धुमक या अमेरिकेत त्यांच्या बहिणीकडे जाण्यासाठी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या होत्या. या वेळी ‘जेट एअरवेज’च्या ‘चेक इन बूथ’वर त्यांचे पारपत्र आणि व्हिसा यांवर चरे पडले असल्यामुळे ते ‘स्कॅन’ होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. या वेळी पारपत्र आणि व्हिसा बनावट असल्याचे सांगून त्यांना ‘बोर्डिंग पास’ नाकारण्यात आला. सायली या मुंबई ते लंडन असा प्रवास ‘जेट एअरवेज’ने, तर पुढील प्रवास ‘कॉन्टिनेंटल एअरलाइन्स’ने करणार होत्या. व्हिसामध्ये नेमका दोष कोणता आहे, याची माहिती घेण्यासाठी दुसर्‍या दिवशी त्या ‘जेट एअरवेज’ आस्थापनाकडे गेल्या असता त्यांच्या व्हिसामध्ये दोष नाही, असे सांगण्यात आले. त्यावर सायली धुमक यांनी पुन्हा प्रवासाविषयी विचारणा केली असता आस्थापनाकडून त्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. याविषयी सायली धुमक यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. यावर ग्राहक न्यायालयाने ‘जेट एअरवेज’ आस्थापनाची वर्तणूक आणि हेतू यांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. ग्राहक न्यायालयाने ‘जेट एअरवेज’ आस्थापनावर निकृष्ट दर्जाची सेवा पुरवल्याचा ठपका ठेवला.


Multi Language |Offline reading | PDF