कोरड्या पाषाणांची पोपटपंची निरर्थक भारतीय लोकशाही !

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने…

‘निवडणुका आणि मतदारांच्या नावांमध्ये घोळ’, हे समीकरणच झाले आहे. वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही सहस्रो मतदारांची नावे मतदारयादीतून गायब होण्याच्या घटना घडल्या होत्या. अशा वेळी मतदार निवडणूक आयोगाच्या नावाने ओरड करतात, तर निवडणूक आयोग ‘मतदार निर्धारित समयमर्यादेत योग्य ती प्रक्रिया पूर्ण करत नाहीत’; म्हणून नाके मुरडतात. दोन्ही बाजूंमध्ये तथ्य आहे; पण त्यावर परिणामकारक उपाययोजना आजतागायत निघाली नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे.

कर्नाटकमध्ये १८ एप्रिलला झालेल्या निवडणुकीच्या वेळीही असाच एक हास्यास्पद प्रकार पहायला मिळाला. क्रिकेटपटू राहुल द्रविड हे कर्नाटकच्या निवडणुकीचे राजदूत (ब्रँड अ‍ॅम्बेसिडर) होते. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन करणारे राहुल द्रविड यांचे फलक ठिकठिकाणी लागले होते; पण स्वतः राहुल द्रविड यांचेच नाव मतदारसूचीत नव्हते. राहुल द्रविड यांचे वास्तव्याचे ठिकाण पालटल्याने त्यांच्या भावाने आधीच्या मतदारसूचीतून नाव वगळण्याचा अर्ज केला होता; पण नवीन ठिकाणी नाव समाविष्ट करण्यासाठी राहुल द्रविड यांनी निर्धारित वेळेत अर्ज केला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’वरच मतदानापासून वंचित रहाण्याची वेळ आली. असाच प्रकार महाराष्ट्रात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संदर्भात घडला होता. ‘लोकशाही’, ‘तरुणांनी मतदान करावे’ यांविषयी लक्ष्मीकांत देशमुख यांनी अनेक लेख लिहले होते. युवकांचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला होता. ‘घटनेवर आणि तिच्या तत्त्वज्ञानावर अढळ विश्‍वास असणारा एक जागरुक भारतीय नागरिक म्हणून केवळ मत देणे एवढेच माझे काम आहे, असे मी मानत नाही, तर लोकशाही बळकट होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे, असे मानणारा नागरिक आहे’, अशी त्यांची वाक्ये एका लेखामध्ये होती; पण देशमुख यांच्या मतदानाच्या वेळी मात्र ते युरोपमध्ये सहलीला गेले होते. त्यामुळे देशमुख यांची भाषणे म्हणजे तोंडपाटीलकीच म्हणायला हवीत. असे हास्यास्पद विरोधाभास अनेक ठिकाणी सापडतात.

‘निवडणूक महत्त्वाची आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक मत अमूल्य आहे’, अशा प्रकारे निवडणुकीचे आणि लोकशाहीचे कितीही गुणगान केले, तरी प्रत्यक्षात तसे अनुभवायला येत नसल्याने हे वर्णन म्हणजे शाब्दिक फुगाच ठरतो. त्यामुळेच मतदानाविषयी जागृती करणारे कोरडे पाषाण अनेक ठिकाणी सापडतात. हे लोकशाहीचे अपयशच नाही का ?


Multi Language |Offline reading | PDF