साधकांशी मित्रत्वाचे नाते जोडतांना त्यांचा पित्याप्रमाणे सांभाळही करणारे शशिकांत राणेकाका!

श्री. अविनाश जाधव

१. राणेकाकांनी छोटे-मोठे दायित्व देऊन दैनिक कार्यालयातील विविध सेवा शिकवणे आणि ‘आम्हाला घडवण्यासाठी देवानेच राणेकाकांना माध्यम बनवले’, असे वाटणे

‘मी मिरज दैनिकातून गोवा येथील दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात सेवेसाठी आलो. त्या वेळी पहिली ओळख झाली, ती राणेकाकांची ! त्या वेळी आम्हाला ‘संकेतस्थळांवरून येणार्‍या बातम्यांचे भाषांतर करण्यापासून ई-मेल पहाणे, पानांची संरचना करणे, पानांची प्रत पडताळणे, विविध विषयांवर लिखाण करणे आदी सेवा कशा करायच्या ?’, हे त्यांनी शिकवले. दैनिकाच्या अनुषंगाने असलेल्या छोट्या-मोठ्या सेवांचे दायित्व देऊन त्यांनी त्या सेवा आम्हा साधकांकडून करून घेतल्या. दैनिकाची सेवा करतांना आम्हाला घडवण्यासाठी देवानेच राणेकाकांना माध्यम बनवले होते.

२. काकांनी सर्व साधकांचा पित्याप्रमाणे सांभाळ करणे

आरंभीच्या काळात दैनिक कार्यालयात सेवा करणार्‍या सर्व साधकांमध्ये राणेकाका वयाने ज्येष्ठ होते. त्यामुळे सनातन प्रभातमध्ये एखाद्या साधकाला स्वतःच्या विवाहाचे विज्ञापन द्यायचे असल्यास विज्ञापनाच्या खाली संपर्क म्हणून काकांचा भ्रमणभाष क्रमांक दिला जायचा. काकांनी अशा प्रसंगांत कधीही नकार दिला नाही. बरेच साधक त्यांच्याकडे येऊन मन मोकळे करायचे. काका आमच्याबरोबर मित्राप्रमाणे रहात आणि पिता म्हणून आम्हा सर्वांचे दायित्वही घेत. आम्हा सर्वांसाठी ‘पिता’ म्हणून देवानेच त्यांची निवड केली होती.

३. वयाने अधिक असूनही काकांनी सेवेच्या अनुषंगाने स्वतःत पालट करून संपादकीय विभागाची धुरा सांभाळणे

सेवा करतांना चूक झाल्यावर काका रागवायचे; मात्र तेवढ्याच प्रेमाने आम्हाला खाऊ देऊन रागावर पांघरूणही घालायचे. कै. राजूदादांच्या (कै. राजू चौगुले यांच्या) नंतर दैनिकाच्या संपादकीय विभागाची धुरा राणेकाकांनी सांभाळली होती. मनुष्याला वयाच्या ५५ वर्षांनंतर जीवनात स्वतःवर झालेले संस्कार पालटणे कठीण जाते; मात्र काकांनी स्वतःत पालट करून तळमळीने सेवा केली.

४. कार्यालयात साधकसंख्या अल्प असतांनाही सर्व सेवा पूर्ण करण्याचा हातखंडा असणे

काकांनी दैनिक सनातन प्रभातची सेवा करतांना परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चढ-उतारांमध्ये स्थिर राहून सेवा केली. वर्षभर येणार्‍या सणांच्या काळात कार्यालयात साधक संख्या अल्प असली, तरी सर्व सेवा पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा होता. कार्याच्या अनुषंगाने पहाता ते सर्वगुणसंपन्न असे संपादक होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर माझा कंठ दाटून आला. देवाने त्यांच्या माध्यमातून आम्हाला घडवले आणि साधनेच्या एका टप्प्यापर्यंत आणून ठेवले. त्यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

५. राणेकाकांना स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास लागणे आणि देवाने जीवनातून मुक्त करतांना त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनही मुक्त करणे

या वर्षभरात ‘स्वतःची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के व्हावी’, याचा राणेकाकांना ध्यास लागला होता. त्यानुसार त्यांनी स्वतःच्या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वभावदोषांच्या निर्मूलनाची प्रक्रियाही राबवली. स्वतःचे मन देवाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयत्नांत वाढही केली. देवाने त्यांची हाक ऐकली आणि त्यांना जीवनातून मुक्त करतांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनही मुक्त केले.

‘हे देवा, तू राणेकाकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवले आहेसच ! त्यांचा यापुढचा ‘संतत्वाचा प्रवास’ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे !’

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF