लोकशाहीला लागलेले काळ्या पैशांचे ग्रहण !

सध्या देशामध्ये जगातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणार्‍या लोकशाहीचा ‘निवडणूक महोत्सव’ चालू आहे. या निवडणुकीत ‘मतदार राजा’ला खूष करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष अटोकाट प्रयत्न करत आहेत. हे करत असतांना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, खालच्या स्तरावर जाऊन टीका करणे आदी उद्योगही काही जाणते राजकारणी करत आहेत. जाहीर सभांतून शासनकर्ते जनतेला विविध आश्‍वासने देत असले, तरी रोख रक्कम, मद्य, सोने, चांदी, कपडे आदींच्या माध्यमांतून मतदार विकत घेण्याचे उद्योगही सध्या तेजीत आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत निवडणूक आयोगाचे भरारी पथक, पोलीस आणि प्राप्तीकर खात्याच्या पथकाकडून देशामध्ये १ सहस्र ८०० कोटी रुपयांची रोख रक्कम, २०० किलो सोने, ८०० कोटी रुपयांचे मद्य आणि ९०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले आहेत. उपरोल्लेखित सर्व रक्कमा, सोने-चांदी, मद्य आदी विविध उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्याशी निगडीत आहेत.

निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे खर्च करण्याचा आभास प्रत्येक उमेदवार आणि पक्ष करत असला, तरी प्रत्यक्षात निवडून येण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. निवडणुकीतील पहिल्याच टप्प्यात एवढा काळा पैसा खर्च केला जात असेल, तर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत सहस्त्रो कोटी रुपयांचा चुराडा होणार, हे नक्की ! कायद्यानुसार निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला या निवडणुकीत ७० लक्ष रुपये खर्च करण्याचे बंधन घातले आहे; मात्र प्रत्यक्षात मर्यादेच्या ५ ते १० पट रक्कम प्रचारासाठी खर्च केली जात आहे. हे वास्तव असले, तरी कोणताही राजकीय पक्ष हे मान्य करायला सिद्ध नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार २ वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा झालेल्यांना निवडणूक लढवता येत नाही; मात्र या निर्णयाला वाटाण्याचा अक्षता लावत ज्यांच्यावर २०-२५ पेक्षा अधिक खुनाचे प्रयत्न, दरोडा, अपहरण, गुंडगिरी असे आरोप आहेत, असे कलंकित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि निवडूनही येतात. ही सर्व स्थिती लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करते. पूर्वीप्रमाणे निवडून येण्याची पात्रता हा निकष आताच्या निवडणुकांमध्ये राहिलेला नाही. श्रीमंत उमेदवारी देणे हा राजकीय पक्षांचा नवीन व्यवसाय होऊन बसला आहे. देशातील गरीब लोकसभाच काय; पण साधी ग्रामपंचायतही लढवू शकत नाही, हे वास्तव आहे. ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्राभिमानी, धर्माभिमानी, सत्त्वशील, चतुर, सर्वगुणसंपन्न पिढी निर्माण होणे आवश्यक आहे. असे झाले तरच जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला लागलेले हे ग्रहण संपुष्टात येईल, यात शंका नाही.

– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा


Multi Language |Offline reading | PDF