कै. शशिकांत राणे यांच्या मृत्यूच्या प्रसंगातून भगवंताने ‘सनातन संस्थेमध्ये चैतन्य एकाच वेळी सर्वत्र कसे कार्य करते ?’ याची दिलेली शिकवण !

सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शशिकांत राणे यांचे २४ एप्रिल या दिवशी वर्षश्राद्ध आहे त्यानिमित्ताने

सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत राणे यांचे चैत्र कृष्ण पक्ष पंचमी (२४.४.२०१९) या दिवशी वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने परात्पर गुरु पांडे महाराज यांनी राणेकाकांच्या मृत्यू आणि त्यानंतरच्या घडामोडी यांतून मिळालेली शिकवण येथे देत आहोत.

परात्पर गुरु पांडे महाराज

जड देह आणि चैतन्य यांमध्ये चैतन्याला महत्त्व द्या !

कै. शशिकांत राणे

‘राणेकाकांच्या मृत्यूच्या प्रसंगात लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे, ‘सत्यवान सावित्री’ यांच्या कथेत सावित्री पतीच्या शवाकडे बघून रडत बसली नाही. ती पतीचा आत्मा (चैतन्य) परत आणण्यासाठी यमदूतासोबत गेली. त्या वेळी तिने पतीच्या मृत शरिराला महत्त्व दिले नव्हते, तर स्वतःच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तिने त्याच्या देहातील आत्मा (चैतन्य) परत आणला आणि पतीला जीवित केले होते.

सती सावित्रीने जड देह आणि चैतन्य यांमध्ये चैतन्याला महत्त्व दिले. सत्यवानचा जड देह तेथे असतांना ती चैतन्याकडे गेली. चैतन्य हे सत्य, शाश्‍वत आणि आनंदमय असल्याने ‘आत्म्याला महत्त्व द्यायला हवे’, हे परात्पर गुुरु डॉ. आठवले यांना या प्रसंगातून शिकवायचे आहे’, हे दिसून येते.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (६.४.२०१८ ते ९.४.२०१८)

१. राणेकाकांच्या मृत्यूनंतर शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. राणेकाकांच्या मृत्यूच्या घटनेतून भगवंताने ‘मंत्राचा प्रभाव’ आणि ‘प्रारब्ध’ अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी दाखवणे

‘सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत राणे यांचे ५.४.२०१८ या दिवशी निधन झाले. त्या दिवशी सकाळी ११.३० वाजता आम्हाला देवद आश्रमात कळले की, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्या दिवशी दिवसभर त्यांच्यासाठी अनेक संतांनी नामजपादी उपाय केले. त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला; मध्येच काही काळ त्यांचा श्‍वासोच्छ्वास बंद झाला. देवद आश्रमात संतांनी त्यांच्यासाठी प्राणशक्तीचा मंत्र म्हटल्यावर त्यांनी त्याला थोडा प्रतिसादही दिला; पण प्रारब्धापुढे कुणाचेच चालत नाही. त्यानुसार सायंकाळी ५.५० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेतून भगवंताने ‘मंत्राचा प्रभाव’ आणि ‘प्रारब्ध’ अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी दाखवल्या. या वेळी श्रीकृष्णानेसुद्धा प्रारब्धाला महत्त्व दिले. सगुण स्वरूप प्राप्त झाल्यावर प्रत्येकाला प्रारब्ध भोगावेच लागते. ही सर्व जरी माया असली, तरी श्रीकृष्णसुद्धा त्याच्या शास्त्रानुसारच वागला होता. गांधारीच्या शापाप्रमाणे त्याने स्वतःच्या यादव कुळाचा स्वतः नाश केला.

१ आ. ‘राणेकाकांचा आकस्मिक मृत्यू’ हे आपत्काळाचे चिन्ह असणे

त्यांच्यासाठी आध्यात्मिक उपाय करतांना मला पुष्कळ जांभया येत होत्या. ‘हा एक नकारात्मक संकेत होता’, असे मला जाणवले. ‘मूत्यू आणि त्याविषयीच्या कार्यात येणारे अशा प्रकारचे अडथळे, हे सर्व आपत्काळाचे चिन्ह आहे’, असे वाटते.

१ इ. ‘जिवंत असतांनाचा प्रत्येक क्षण कसा सदुपयोगात आणावा ?’, हे लक्षात येणे

जेव्हा असे गंभीर प्रसंग समोर येतात, तेव्हा ‘मी या क्षणी जिवंत आहे’, ही आपली केवढी मोठी श्रीमंती आणि भाग्य आहे’, हे लक्षात घेऊन त्याचे मूल्य जाणावे. आपण आपल्या जीवनाचे मूल्य काही काळापुरते लक्षात ठेवून नंतर विसरून जातो. ‘जिवंत असतांनाचा प्रत्येक क्षण कसा सदुपयोगात आणावा ?’, हे यावरून लक्षात येते.

१ ई. ‘मृत्यूच्या वेळी कसे असावे ?’ याविषयी अथर्ववेदात सांगितलेला मंत्र 

उत् त्वा मृत्योर् अपीपरं सं धमन्तु वयोधसः ।
मा त्वा व्यस्तकेश्यो मा त्वाघरुदो रुदन् ॥ – अथर्ववेद, कांड ८, सूक्त १, मंत्र १९

अर्थ : (विद्वान किंवा ईश्‍वर मृत पुरुषाला म्हणतात) हे पुरुषा, मी तुला मृत्यूच्या जवळून वर घेऊन येतो (वरची गती प्रदान करतो). अन्न आणि आयू धारण करणारे लोक (प्राणीमात्र) तुला पुष्ट करोत (तुझ्या सद्गतीसाठी प्रार्थना करावी). स्त्रिया केस मोकळे सोडून तुझ्यासाठी न रडोत (त्यांना अनावर दु:ख न होवो) आणि खूप आक्रस्ताळेपणाने रडणारे तुझे बंधूजनही तुझ्यासाठी न रडोत.

विवरण : वरील श्‍लोकाप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कै. राणेकाकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करून त्यांना जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवले आहे. या दिवशी रामनाथी आश्रमात दुःख व्यक्त न करता हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या एका संन्यासिनीच्या आगमनाचा सोहळा साजरा करत होते. राणेकाकांच्या पत्नी श्रीमती क्षमा राणे यासुद्धा मृतदेह अडीच दिवस शवागारात असतांना स्थिर राहिल्या होत्या.

१ उ. आत्मा हाच शरिराचा कर्ता आणि धर्ता असून ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत जीवात्म्याला विविध अवस्थांमधून जावे लागणे

मृत्यू म्हणजे आत्म्याच्या सगुण रूपाचे होणारे परिवर्तन ! सगुण स्वरूप असतांनाही जीवात्मा तोच असतो. त्याने त्या स्वरूपातूनही आनंद घेणे, महत्त्वाचे आहे; कारण आत्मा हाच त्या शरिराचा कर्ता आणि धर्ता असतो. मृत्यूनंतर त्याच्यातील वासनेप्रमाणे त्याला पुढील शरीर मिळेपर्यंत अशा परिवर्तनाची आवश्यकता असते. जसे परीक्षेत उत्तीर्ण होईपर्यंत त्याला परीक्षा द्यावीच लागते, म्हणजेच भगवंताशी स्वरूपसंधान होईपर्यंत, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत त्याला विविध अवस्थांमधून जावेच लागते. वासनेमुळे जीवात्म्यावर आवरण येते आणि त्यामुळे त्याला भगवंताचे महत्त्व कळत नाही.

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥

– श्रीमद्भगवत्गीता, अध्याय २, श्‍लोक २२

अर्थ : ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुने शरीर टाकून दुसर्‍या नव्या शरिरात जातो.

१ ऊ. मृत्यूला सामर्थ्याने सामोरे जाणे

मनुष्याच्या अस्तित्वाचा शेवट मृत्यू हाच असतो. त्यामुळे तो मृत्यूला घाबरतो आणि मृत्यूला सामर्थ्याने सामोरे जात नाही. जो मृत्यूला घाबरत नाही, तोच त्या क्षणाला सामर्थ्याने सामोरे जाऊ शकतो. शशिकांत राणे यांच्या मृत्यूचे अशा प्रकारे स्वागत होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. मृत्यूनंतर दुसर्‍या दिवशी मी त्यांच्या पत्नीशी बोललो. त्या स्थिर होत्या. सावित्री सत्यवानच्या शवाजवळ रडत न बसता खर्‍या सत्यवानाकडे  (चैतन्याकडे) गेली. या उदाहरणातून अंतिम सत्याची जाणीव होते.

१ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे राणेकाकांचा मृत्यू काही काळ थांबणे

शशिकांत राणे अत्यवस्थ असतांना त्यांच्या पत्नी देवद आश्रमात होत्या. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे राणेकाकांचा मृत्यू पत्नी गोवा येथे पोचेपर्यंत झाला नाही’, असे म्हणावे लागेल, नाहीतर ते केव्हाच गेले असते. ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची त्यांच्यावर असलेली कृपाच दिसून येते.

२. मनुष्याचा देह शरीर नसून जीवात्मा असणे आणि हा जीवात्मा भगवंताचाच अंश असणे

२ अ. संन्यासिनींचे स्वागत उत्साहात केले जाणे

ज्या दिवशी राणेकाकांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी प्रखर हिंदुत्वनिष्ठ संन्यासिनींचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. त्या वेळी त्यांच्या आगमनाचा सोहळा उत्साहात साजरा केला गेला; कारण तेथे शरीर नसून जीवात्मा आहे. तो अमर असून भगवंताचाच अंश आहे. हे स्वागत त्यांच्यातील चैतन्याचे आहे.

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १५, श्‍लोक ७

अर्थ : या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे (टीप) आणि तोच प्रकृतीत मन अन् पाचही इंद्रिये यांना आकर्षित करतो.

टीप : ज्याप्रमाणे महाकाश विभागरहित असूनही निरनिराळ्या घटांतील पाण्यात वेगवेगळे असल्यासारखे दिसते, त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी एकरूपाने स्थित असूनही परमात्मा पृथक् पृथक् असल्यासारखा दिसतो; म्हणून देहांत वसलेल्या जीवात्म्याला भगवंताने आपला ‘सनातन अंश’ म्हटले आहे.

२ आ. चैतन्याचा उत्सव

तो चैतन्याचा उत्सव होता. श्रीविष्णु संन्यासिनींच्या रूपाने चैतन्य घेऊन स्वतः आला होता.

२ इ. शशिकांत राणे यांच्या मृत्यूचे स्वागत अशा प्रकारे चैतन्याने होणे, म्हणजे तो जीव किती भाग्यवान असला पाहिजे !

३. एकीकडे राणेकाकांचे निधन झालेले असतांना त्याच दिवशी संन्यासिनींचेे रामनाथी आश्रमात स्वागत होणे, म्हणजे ‘समत्वम् योग उच्यते ।’

एकीकडे राणेकाकांचे निधन झाले असतांना त्याच दिवशी संन्यासिनींचे रामनाथी आश्रमात स्वागत झाले. राणेंना वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न चालले होते आणि त्याच दिवशी दुपारी संस्था स्तरावरील भाववृद्धी सत्संगही होता. त्या दिवशी देशभर संस्थेचे प्रसारकार्य नेहमीप्रमाणे चालूच होते. या काही साध्या घटना नाहीत. एकाच वेळी कार्य करायचे आणि दुसरीकडे त्याच वेळी स्वस्थही रहायचे; कारण ‘समत्वं योग उच्यतेे ।’ (भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४८), ‘म्हणजे समत्वालाच ‘योग’ असे म्हटले जाते.’ येथे समत्वामध्ये असलेली अगाध शक्ती, म्हणजेच स्थिर राहून केलेल्या कार्यातील शक्ती दिसून येते.

४. सनातन संस्थेमध्ये ‘चैतन्य एकाच वेळी सर्वत्र कसे कार्य करते ?’, हे भगवंताला दाखवायचे असणे

परम पूज्य सतत कार्य करत असतात. सनातन संस्थेमध्ये ‘चैतन्य एकाच वेळी सर्वत्र कसे कार्य करते ?’, हे भगवंताला दाखवायचे आहे. चैतन्य हे सत्य, शाश्‍वत आणि आनंदी असून ते ठासून भरलेले आहे. त्याला समोर आणणे, एवढेच आपले काम आहे.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

साधकाच्या मृत्यूनंतरही त्या जिवाची आत्मोन्नती होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर काळजी घेत असतात. अशा प्रकारे जिवाच्या कल्याणासाठी काळजी घेणार्‍या अवतारी पुरुषाच्या चरणी आम्ही सर्वजण कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.

‘हे श्रीकृष्णा, हे परात्पर गुरु डॉक्टर, आपण आम्हा सर्वांचा उद्धार करण्यासाठी अवतरला आहात, हे आमचे महत् भाग्य आहे. आपली कृपा संपादन होण्यासाठी आमच्याकडून साधना करून घ्यावी, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.४.२०१८ ते ९.४.२०१८)

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘राणेकाकांच्या पार्थिवाला नमस्कार करणे आणि त्यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घालणे’, या कृतींतून शिकायला मिळालेली सूत्रे

१. राणेकाकांच्या पार्थिवाला नमस्कार करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात असलेली अधिकतम नम्रता !

‘दैनिक सनातन प्रभातमधून परात्पर गुरु डॉ. आठवले राणेकाकांच्या मृतदेहाच्या शेजारी नमस्काराच्या मुद्रेत उभे असलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्या छायाचित्राकडे पाहून त्यांच्यात असलेली अधिकतम नम्रता दिसून येते. तसेच ‘ते त्या जिवाकडे भगवंतस्वरूप म्हणून पाहून त्या भगवंतलाच नमस्कार करत आहेत’, असे वाटते.

२. पार्थिवाला प्रदक्षिणा घातल्यावर तेथील चैतन्यात वाढ होणे

त्यांनी पार्थिवाला घातलेल्या प्रदक्षिणेच्या प्रभावाने मृत राणेकाकांच्या सभोवती असलेल्या चैतन्यावर सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या दिसून आले. यावरून परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्य विलसत असल्याचे दिसून येते.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे

श्री. राणेकाका अत्यवस्थ असतांना त्यांच्यासाठी नामजप करणारे परात्पर गुरु पांडे महाराज, देवद आश्रमातील संत आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक यांना झालेले त्रास !

१. झालेले त्रास

अ. ‘राणेकाकांसाठी देवद आश्रमातील ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक आणि काही संत नामजप करत असतांना त्यांना अधिक त्रास झाला.

आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनाही राणेकाकांसाठी नामजप करतांना मोठ्याने ढेकरा आल्या. यापूर्वी कोणतेही उपाय करतांना त्यांना असे झाले नव्हते.

२. विश्‍लेषण

राणेकाकांचा मृत्यूयोग असल्याने असे त्रास झाले.’

– (पू.) सौ. अश्‍विनी पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.४.२०१८)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF