श्रीलंकेत ८ बॉम्बस्फोटांमध्ये २०७ जण ठार, तर ४०० हून अधिक घायाळ

  • ३ मोठी चर्च, ३ हॉटेल्स आणि अन्य २ ठिकाणी बॉम्बस्फोट

  • स्फोटांचे दायित्व कोणत्याही संघटनेने स्वीकारले नाही इस्लामिक स्टेटवर संशय

(चित्र सौजन्य : इंडियाटीवी)

कोलंबो – ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे सकाळी साडेआठच्या सुमारास एकापाठोपाठ झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २०७ जणांचा मृत्यू झाला, तर ४०० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांमध्ये एका भारतियाचा समावेश आहे. ३ हॉटेल्स, ३ चर्च आणि अन्य २ ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले. पहिले ६ स्फोट झाल्यानंतर ५ घंट्यांनंतर आणखी २ ठिकाणी स्फोट झाले. यांतील मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये ३५ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. स्फोटांनंतर राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी जनतेला शांत रहाण्याचे आवाहन केले आहे. या स्फोटांनंतर श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर भारतातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली. या स्फोटांचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतले नसले, तरी इस्लामिक स्टेटकडून ते करण्यात आल्याचे प्राथामिक अन्वेषणातून समोर येत आहे.

१. पहिला स्फोट कोलंबो येथील सेंट अ‍ॅण्टनी चर्चमध्ये, दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर असलेल्या नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये, तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रॅ्रण्ड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.

२. साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंका सरकारने उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, अशा दुःखद प्रसंगी एकजूट दाखवा आणि कणखर रहा, असे आवाहन मी देशातील जनतेला करतो. या घटनेनंतर पसरवण्यात येणार्‍या अफवांवर विश्‍वास ठेवू नका.

३. बॉम्बस्फोटांविषयी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करत भारतीय उच्चायुक्तांशी सतत संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून ‘हेल्पलाइन’ क्रमांक जारी करण्यात आला आहे.

४. स्फोटानंतर श्रीलंका सरकारने फेसबूक, ट्विटर आदी सामाजिक माध्यमे काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त ‘रॉयटर्स इंडिया’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

  • भारतीय दूतावासावरही आक्रमणाची शक्यता • पोलिसांनी आधीच सतर्क केले होते !

भारतात जसे घडते, तसे श्रीलंकेतही घडते, हे यातून दिसते !

श्रीलंकेच्या पोलीस प्रमुखांनी १० दिवसांपूर्वीच अशा प्रकारची आत्मघाती आक्रमणे होण्याची शक्यता वर्तवली होती. विदेशी गुप्तचर यंत्रणांनी यापूर्वीच माहिती दिली होती की, नॅशनल तौहीद जमात (एन्टीजी) या आतंकवादी संघटनेकडून आत्मघाती आक्रमण करण्याचे कट रचण्यात येत आहेत. या संघटनेच्या निशाण्यावर कोलंबोमधील चर्च आणि भारतीय दूतावास आहे, असे म्हटले होते.

नॅशनल तौहीद जमात (एन्टीजी) ही श्रीलंकेतील जिहादी संघटना आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेतील बौद्ध मूर्तींच्या तोडफोडीच्या संदर्भात या संघटनेचे नाव पुढे आले होते.


Multi Language |Offline reading | PDF