टिकटॉक : एक चिंतन

अश्‍लीलतेच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये; म्हणून मद्रास उच्च न्यायालयाने ‘टिकटॉक’ या चिनी ‘अ‍ॅप’वर बंदी आणली आणि पुढे सर्वोच्च न्यायालयानेही ती बंदी हटवण्यास नकार दिला. त्यानंतर गूगल आणि अ‍ॅपल यांच्या ‘सिस्टम’वरून हे ‘अ‍ॅप’ बंद करण्यात आले आहे. ‘टिकटॉक’च्या माध्यमातून गाण्यावरील नाचाची अथवा अन्य संभाषणाची (डायलॉग) छोटी छोटी चलचित्रे (व्हिडिओ) बनवून ती ‘पोस्ट’ करण्याची सुविधा होती. यामध्ये नैतिकतेला धरून नसणारी अनेक चलचित्रे सर्रासपणे प्रसारित केली जात होती; किंबहुना अशीच चलचित्रे वापरकर्त्यांची अधिक आवडीची होती. ‘या अ‍ॅपवर मुली नको नको ती चलचित्रे बिनधास्तपणे टाकतात आणि समाजात मुलांनी छेड काढली, तर कांगावा करतात’, अशा अर्थाच्या मुलांच्या प्रतिक्रियांतून याची भयावहता लक्षात येईल. भारतात २० कोटींहून अधिक लोक टिकटॉकचे वापरकर्ते होते, अशी आकडेवारी आहे. ‘टिकटॉक’ हा जणू तरुण पिढीला चंगळवाद, हिंसा अन् अश्‍लीलता यांच्या खाईत सुसाटपणे घेऊन जाणारा रस्ता होता; तो बंद करण्याचा न्यायालयाचा निर्णय स्तुत्य असला, तरी दुर्दैवाने तो पुरेसा नाही; कारण या नकारात्मक रस्त्याला जोडणारे अनेक उपरस्ते आहेत. नव्याने हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करता येणार नसले, तरी ज्यांच्याकडे हे ‘अ‍ॅप’ आधीच आहे, त्यांच्या वापरावर कोणतेही निर्बंध नाही. हे अ‍ॅप ‘शेअरइट’च्या माध्यमातून इतरांना देण्यासही काही अटकाव नाही.

टिकटॉकवरील बंदी म्हणजे ‘मोरीला बोळा आणि दिंडीदरवाजा उघडा’ अशा प्रकारची आहे. आज टिकटॉकवर बंदी आली, तर उद्या दुसर्‍या कुठल्या तरी नावाने अशा प्रकारचे ‘अ‍ॅप’ चालू होऊन अ‍ॅपकर्ते भारतीय व्यवस्थेला ‘टूकटूक’ करतील. याशिवाय हे केवळ एकच ‘अ‍ॅप’ आहे, असे नाही, तर वेब सीरिज, फेसबूक, इन्स्टाग्राम, चित्रपट, मालिका, विज्ञापने आदी अनेकविध माध्यमांतून आज अश्‍लील अन् अनैतिक गोष्टींचा मुक्तपणे संचार चालू आहे. ‘पबजी’, ‘ब्लू व्हेल’, ‘पोकेमॉन गो’ यांसारखे ‘ऑनलाईन’ खेळ जोडीला आहेतच. यामुळे तरुण पिढी वहावत चालली आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७१ वर्षांत जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम ! वाईट सवयी लवकर लागतात; पण चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो. त्यामुळे कोणी कितीही नावे ठेवली आणि आधुनिकतेच्या गप्पा मारल्या, तरी संस्कार आणि धार्मिकता टिकवण्यासाठी घराघरांतूनच प्रयत्न व्हायला हवेत. व्यवस्था सुधारण्यापेक्षा आज व्यक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रोगाची लक्षणे बरी करण्यापेक्षा रोगाचे मूळ कारण शोधून ते दूर करायला हवे. सध्या समाजात वाढलेले रज-तमाचे प्रदूषण आताच्या स्थितीचे मूळ कारण आहे. त्यावर उपाय म्हणून सत्त्वगुणाचे पारडे जड व्हायला हवे अर्थात् युवापिढी आणि समाजच सात्त्विक व्हायला हवा; कारण सात्त्विक व्यक्तीसमोर ‘टिकटॉक’सारखे प्रकार टिकू शकणार नाहीत.

– प्रा.(कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF