अयोध्येत राममंदिर होणे, हे राष्ट्रकार्यच ! – मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

  • असे श्री. मोहन भागवत यांना खरेच वाटते, तर त्यांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात विहिंपच्या झालेल्या धर्मसंसदेत राममंदिराच्या प्रश्‍नावरून आंदोलन स्थगित केल्याची घोषणा का केली ? तसेच कुंभमेळ्यात अनेक साधू, संत, महंत यांनी ‘राममंदिर बांधण्याची तिथी घोषित करा’, अशी मागणी केली होती, त्या मागणीकडे दुर्लक्ष का केले ?
  • साधूसंतांसह जगभरातील हिंदूंची ‘अयोध्येत राममंदिर व्हावे’, अशी इच्छा असतांना मोहन भागवत यांनी ‘राममंदिराचे सूत्र बाजूला ठेवून भाजपला निवडून देण्या’चे आवाहन कुंभमेळ्यातील धर्मसंसदेत का केले ? 
  • संघप्रणीत भाजपने राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर भाजपला हिंदूंनी निवडून दिले, तरीही भाजप या आश्‍वासनाची पूर्तता करत नाही, हे दिसत असतांना ५ वर्षांत भागवत यांनी भाजप सरकारवर मंदिर उभारण्याविषयी वारंवार विचारणा का केली नाही ?

नागपूर – प्रभु श्रीरामचंद्रांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे, त्यांचा अंगीकार करणे हे रामकार्य असून तेच राष्ट्रकार्य आहे. आजच्या परिस्थितीत अयोध्येत राममंदिर होणे हेही राष्ट्रकार्य आहे. त्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १९ एप्रिल या दिवशी येथे केले. राजाबाक्षा येथील पुरातन हनुमान मंदिरातील शोभायात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ‘प्रमुख अतिथी’ म्हणून ते बोलत होते.

मोहन भागवत पुढे म्हणाले की,

१. ज्या कोणा भगवंताची तुम्ही भक्ती करत असाल, त्याचे गुण स्वत: अंगीकारायला हवे. जर तुम्ही हनुमंताचे उपासक असाल, तर नियंत्रित जीवन, चारित्र्यसंपन्नता, शील तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसायला हवे.

२. नम्रता, अहंकारशून्यता ही प्रभु हनुमानाच्या स्वभावाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. हनुमान नेतृत्व गुणसंपन्न, चतुर, विवेकी, संघटनकुशल होते. तरीही ते आजीवन श्रीरामाच्या चरणी कुठलाही अहंगंड न बाळगता सेवाधीन राहिले. असाच भाव राष्ट्रकार्य करणार्‍यांमध्ये असायला हवा. राष्ट्रकार्य करतांना ‘ते मी करतोय’, हा अहंभाव दूर सारून कार्यरत रहायला हवे. (संघ स्वयंसेवकांनाही जर अहं-निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली असती, तर त्यांनी ठिकठिकाणी सनातनच्या कार्याला विरोध केला नसता ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF