गुढीपाडव्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या गुढीपूजनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘६.४.२०१९ या दिवशी हिंदूंच्या नववर्षारंभानिमित्त (गुढीपाडव्यानिमित्त) सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात विधीवत् गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सनातनचे साधक-पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित यांनी गुढीचे पूजन केले आणि श्री. ईशान जोशी यांनी पौरोहित्य केले. देवाच्या कृपेने गुढीपूजनाच्या वेळी माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण आणि आलेल्या अनुभूती लेखबद्ध केल्या आहेत.

गुढीपूजन करतांना डावीकडून श्री. चैतन्य दीक्षित आणि पौरोहित्य करतांना श्री. ईशान जोशी

१. गुढी उभारण्यापूर्वीची सूक्ष्मातील स्थिती

अ. पृथ्वीभोवती केशरी रंगाचा दैवी प्रकाश पसरलेला दिसत होता; परंतु वातावरण शांत आणि स्तब्ध झाले होते.

आ. पृथ्वीच्या गतीवर काळाचे नियंत्रण वाढल्याचे जाणवले.

इ. काळावरील कलीचा प्रभाव न्यून होऊन प्रजापति आणि ब्रह्मदेव यांच्या तत्त्वांचा (ईश्‍वराचा) प्रभाव वाढल्याचे जाणवले. त्यामुळे काळावरील तमोगुणाचा प्रभाव न्यून होऊन सात्त्विकतेचा प्रभाव वाढू लागला.

२. गुढीचे पूजन चालू होण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे

अ. शंखनाद केल्यावर भूलोकाला सत्यलोकाशी जोडणारा सूक्ष्म मार्ग मोकळा झाला. त्यामुळे सत्यलोकातील सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरींना थेट पृथ्वीपर्यंत येता आले.

आ. पुरोहित साधकांसह पूजनाला उपस्थित असणारे संत आणि साधक यांनी देवतांचा भावपूर्ण जयघोष केल्यामुळे वातावरणात देवतांच्या तारक लहरी कार्यरत होऊन वातावरण भावमय झाले.

इ. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत झालेले ब्रह्मतत्त्व, धर्मशक्ती आणि श्रीविष्णूचे चैतन्य प्रथम पृथ्वीच्या वायूमंडलात कार्यरत झाले.

ई. श्रीगणपतीचे पूजन केल्यावर पृथ्वीच्या वायूमंडलात कार्यरत झालेले ब्रह्मतत्त्व, धर्मशक्ती आणि श्रीविष्णूचे चैतन्य गुढीच्या दिशेने येण्यासाठी दशदिशा मोकळ्या झाल्या.

उ. ‘नवीन वर्ष मंगलमय जाऊ दे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अन् सर्वांची साधना चांगली होऊ दे’, असा संकल्प पुरोहितांनी केल्यावर ब्रह्मदेवाने ‘तथाऽस्तु’ म्हटल्याचे जाणवले.

३. गुढीचे पूजन चालू झाल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. गुढीचे पूजन चालू झाल्यावर पृथ्वीच्या वायूमंडलात असलेले ब्रह्मतत्त्व, धर्मशक्ती आणि श्रीविष्णूचे चैतन्य गुढीकडे आकृष्ट होऊ लागले.

आ. गुढीच्या केशरी रंगाच्या वस्त्राकडे धर्मशक्ती, पालथ्या ठेवलेल्या तांब्याच्या गडूकडे ब्रह्मतत्त्व आणि गुढीच्या बांबूकडे श्रीविष्णूचे चैतन्य आकृष्ट होऊ लागले.

इ. गुढीमध्ये ब्रह्मतत्त्व आणि चैतन्य व्यापून ते गुढीच्या अग्रभागातून वातावरणात प्रक्षेपित होऊ लागले. तेव्हा सूक्ष्मातून गुढी सोनेरी रंगाची दिसत होती.

ई. गुढीमध्ये कार्यरत झालेले विष्णुतत्त्व, चैतन्य आणि धर्मशक्ती गुढीच्या बांबूचे टोक जेथे भूमीला टेकले होते तेथून पाताळाच्या दिशेने प्रक्षेपित होऊ लागले अन् पाताळातील वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध चालू झाले. तेव्हा चंदन आणि मोगरा यांचा संमिश्र सुगंध आला. ‘दैवी सुगंध येणे’, हे देवतेचे तत्त्व कार्यरत झाल्याचे द्योतक आहे.

उ. पुरोहितांनी स्थानशुद्धीसाठी गुढीच्या भोवती पंचगव्य प्रोक्षण केले, तेव्हा गुढीच्या भोवतीचा आणि गुढीच्या बांबूतील पोकळीमध्ये असणारा वायू शुद्ध झाला. त्यामुळे गुढीच्या अग्रभागावर लावलेल्या तांब्याच्या गडुतून ग्रहण होणारे चैतन्य गुढीतील बांबूमध्ये अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट होऊन कार्यरत झाले.

ऊ. गुढीच्या केशरी रंगाच्या वस्त्रातून संपूर्ण वातावरणात केशरी आणि सोनेरी रंगाचे प्रकाशकिरण प्रक्षेपित झाले.

ए. ब्रह्मांडात ब्रह्मतत्त्व, विष्णुतत्त्व, चैतन्य आणि धर्मशक्ती कार्यरत झाल्यामुळे अंतरिक्षरूपी पोकळीची शुद्धी झाली. गुढीमध्ये ब्रह्मतत्त्व, विष्णुतत्त्व, चैतन्य आणि धर्मशक्ती प्रवाहित झाल्यामुळे पृथ्वीवरील वायूमंडलाची शुद्धी झाली. गुढीच्या बांबूच्या खालच्या टोकातून पाताळाच्या दिशेने ब्रह्मतत्त्व, विष्णुतत्त्व, चैतन्य आणि धर्मशक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे पाताळाची शुद्धी झाली.

ऐ. आश्रमातील भूमीमध्ये निर्गुण चैतन्य कार्यरत होऊन भूमीतून पांढर्‍या रंगाची वलये कार्यरत होऊन वातावरणात प्रक्षेपित होऊ लागली. त्यामुळे गुढी भूमीपासून सूक्ष्मातून ३ फूट उंच उचलली गेली. गुढी निर्गुण चैतन्याने भारित झाल्यामुळे तिच्याकडे ब्रह्मलोकातील चैतन्य आणि निर्गुण शक्ती अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट झाले.

ओ. पूजेचे उपचार स्थुलातून चालू असतांना गुढीमध्ये देवतांचे सगुण चैतन्य आकृष्ट झाले.

औ. पूजेचे उपचार सूक्ष्मातून ब्रह्मा आणि विष्णु या देवतांच्या चरणी अर्पण होऊन साधकांना त्यांचे कृपाशीर्वाद मिळाले.

अं. पुरोहितांनी पूजेच्या शेवटी स्वत:भोवती ३ प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा पूजेला उपस्थित असणारे संत आणि साधक यांनी सूक्ष्मातून गुढीभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. ३ प्रदक्षिणांचे भावपूर्ण कर्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांपर्यंत; सत्य, त्रेता आणि द्वापर या ३ युगांपर्यंत आणि सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांपर्यंत पोचले. सनातनचे संत आणि साधक यांच्या मनातील भाव त्रिदेव, तीन युग आणि त्रिगुण यांच्यामध्ये विलीन झाला.

क. त्यानंतर पुरोहितांनी यजुर्वेदीय मंत्रपुष्पांजली म्हटली, तेव्हा मंत्राचे रूपांतर सोनेरी, चंदेरी,  केशरी, निळसर आणि पांढर्‍या रंगाच्या फुलांमध्ये होऊन त्यांतील काही फुले प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी (गुरुचरणी) आणि नंतर उर्वरित फुले त्रिदेवांच्या चरणी अर्पण झाली. यावरून ‘गुरुदेव हे त्रिदेवांपेक्षाही श्रेष्ठ आणि प्रथम वंदनीय असतात’, हे सूत्र शिकायला मिळाले.

ख. गुढीपूजनाच्या वेळी कार्यरत झालेले ब्रह्मतत्त्व हे वायूमंडलाची शुद्धी करत होते, तर विष्णुतत्त्व धर्मसंस्थापनेचे कार्य करत होते. ही दोन्ही कार्ये एकाच वेळी चालू असतांना वातावरणात चैतन्य आणि आनंद जाणवत होता.

ग. गुढीपूजनानंतर संवत्सरफलश्रवण करण्यात आले. तेव्हा कालचक्र घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे सकारात्मक फिरतांना दिसले. तेव्हा कालदेवाने साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना निर्विघ्नपणे होण्यासाठी आशीर्वाद दिले. तेव्हा पूजेला उपस्थित असणार्‍या साधकांचे मन स्थिर झाल्याचे जाणवले.

घ. गुढीपूजनाच्या वेळी पूर्व दिशेकडून सूर्योदय होतांना दिसला. तेव्हा सूर्यदेवाचे तांबूस बिंब पहातांना पुष्कळ प्राणशक्ती मिळून आनंद झाला. सूर्यदेवाच्या साक्षीने गुढीपूजन झाल्याचे जाणवले. सूर्यदेवानेही गुढीकडे दैवी शक्ती आणि दैवी तेज संक्रमित करून साधकांना चांगले आरोग्य प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद दिले.

कृतज्ञता

‘हे देवा, तू आम्हाला गुढीपूजनाचे आध्यात्मिक महत्त्व सांगितलेस आणि माझ्याकडून सूक्ष्म परीक्षणाची सेवा करवून घेतलीस. यासाठी मी तुझ्या चरणी अन्यय भावाची सुमने अर्पित करत आहे. ती फुले तू स्वीकारून आमच्यावर कृपावर्षाव कर’, अशी तुझ्या चरणी नम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF