पायाभूत सुविधांच्या गैरसोयींमुळे अनसुले आणि मार्ली येथील ४३० जणांचा मतदानावर बहिष्कार कायम

लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका !

वाळपई -पायाभूत सुविधांपासून आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ पर्ये,सत्तरी येथील अनसुलेवासीय आणि पैंगीण पंचायत क्षेत्रातील मार्ली-रिवाळवासियांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा सामूहिक ठाम निर्णय घेतला आहे.अनसुलेमध्ये २०० मतदार,तर मार्लीमध्ये २३० मतदार आहेत.रस्ता,खंडित वीजपुरवठा,आरोग्य सेवा,रानटी प्राण्यांचा उपद्रव आदी समस्या स्थानिकांना भेडसावत आहेत.शासकीय पातळीवर ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रयत्न होत असले,तरी या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी आता नाही,तर पुढे कधीच नाही,असा निर्धार करून मतदान न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले आहे.यामुळे प्रशासनाची आणि निवडणूक आयोगाची तारांबळ उडाली आहे.

अनसुले आणि बंदीरवाडा गावांतील  लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालू  नये ! -गोवा सुरक्षा मंचचे आवाहन

पणजी – सत्तरी तालुक्यातील अनसुले आणि बंदिरवाडा गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार घालू नये,असे आवाहन गोवा सुरक्षा मंचने केले आहे.येथील एका पत्रकार परिषदेत गोवा सुरक्षा मंचचे श्री.सुभाष वेलींगकर यांनी सांगितले की,या लोकांना आम्ही आश्‍वासन दिले आहे की,त्यांच्या गावात रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा पोचाव्यात यासाठी निवडणुकीनंतर कार्यरत असलेल्या सरकारकडे आम्ही निदर्शने,आंदोलने या मार्गाने आवाज उठवू.मतदानाचा अधिकार ५ वर्षांतून एकदाच मिळतो,तो त्यांनी वाया घालवू नये आणि मतदान करावे.पणजीतील पोटनिवडणुकीविषयी बोलतांना श्री.वेलींगकर म्हणाले,मंचने पणजी मतदारसंघासाठी उमेदवार निश्‍चित केला आहे;परंतु इतर पक्षांनी त्यांचा उमेदवार घोषित केल्यानंतर आम्ही आमच्या उमेदवाराचे नाव घोषित करू. मंचने या वेळी भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी ५ कोटी रुपये वाटले आहेत,असा आरोप केला.


Multi Language |Offline reading | PDF