कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी ठाणे येथील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अतुल देव यांची पोलीस हवालदार भांबरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह ७ पोलिसांकडून चौकशी

कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा वाढता ससेमिरा !

ठाणे – कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी १६ एप्रिल २०१९ या दिवशी येथील पोलीस ठाण्याचे हवालदार भांबरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्यासह एकूण ७ पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अतुल देव यांची चौकशी केली.

१५ एप्रिल या दिवशी पोलिसांनी श्री. देव यांना सकाळी ११ वाजता भेटण्यास सांगितले होते; परंतु पोलिसांनी ‘नंतर भेटू’, असे कळवले. १६ एप्रिल या दिवशी परत दूरभाष करून ‘सकाळी ११ नंतर कोर्ट नाका अथवा अन्य सोयीस्कर ठिकाणी भेटायला या’, असे सांगितले. नंतर त्यांनी ‘वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या उपाहारगृहामध्ये भेटायला या’, असे सांगितले. त्याच वेळी त्यांनी अन्य एक साधक श्री. अभिजीत भोजणे यांनाही भेटण्यास बोलावले.

‘ठाणे आणि डोंबिवली येथील काही साधकांची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करा’, असा वरिष्ठांकडून आदेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी श्री. देव यांचे नाव, वय, पत्ता, नोकरी, परिवार आदींविषयी माहिती घेतली. तसेच ‘श्री. सारंग अकोलकर आणि श्री. विनय पवार यांना ओळखता का ?’, असे विचारले. हवालदार भांबरे यांनी जबाब लिहून घेतला. त्यात श्री. देव यांचा वैयक्तिक तपशील आणि ‘मी वरील आरोपींना ओळखत नसून त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यास पोलिसांना सूचित करीन’, असेे लिहिले.

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांकडून वारंवार साधक आणि कार्यकर्ते यांची चौकशी करण्यात येत आहे अन् चौकशीच्या नावाखाली त्यांचा नाहक छळ केला जात आहे. साधक आणि कार्यकर्ते यांनी हा चौकशीचा वृत्तांत त्वरित ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयात पाठवावा.’

पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. ‘कर नाही, त्याला डर कशाला’ या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.


Multi Language |Offline reading | PDF