टीकाकारांनो, धर्मनिष्ठ ‘सनातन प्रभात’मधून भाजपच्या निर्णयांवर केल्या जाणार्‍या परखड लिखाणामागील हेतू समजून घ्या !

‘सनातन प्रभातमध्ये हिंदुद्वेषी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्यावर परखडपणे लिखाण केले जाते. एवढेच नाही, तर हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे पक्ष आणि संघटना यांनाही त्यांच्या चुका दाखवून दिल्या जातात. बरेच हिंदुत्वनिष्ठ, तसेच भाजपचे समर्थक यांना हे खटकत असल्यामुळे ते सनातन प्रभातवर टीका करतात. त्यांच्याकडून ‘सनातन प्रभातचे संपादक स्वतःला अधिक शहाणे समजतात का ?’, ‘ते सर्वज्ञानी आहेत का ?’, ‘कार्यालयात बसून टिप्पण्ण्या लिहिणे सोपे असते, प्रत्यक्षात काम करणे अवघड असते’, ‘तुम्हाला भाजपला हरवायचे आहे का ?’, ‘तुम्हाला राहुल गांधी यांना निवडून आणायचे आहे का ?’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहेत. सध्या निवडणुकीचा काळ चालू आहे. ‘सनातन प्रभात’मधून भाजपच्या चुका दाखवून देण्यामागील त्याची भूमिका समस्त हिंदुप्रेमींना, तसेच टीकाकारांनाही समजावी, यासाठी विस्ताराने येथे देत आहे.

१. राजाला राजधर्माची आठवण करून देणे, हे मोदी सरकारच्या चुका दाखवून देण्यामागील प्रमुख कारण !

टीका : सनातन प्रभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे का ?

दृष्टीकोन :

 १. सनातन प्रभात व्यक्तीला नव्हे, तर तिच्या चुकीच्या विचारांना विरोध करते. पंतप्रधानपदावर आरूढ झालेल्या व्यक्तीकडून चुकीचे निर्णय घेतले जात असतील, तर ते परखडपणे सांगणे, हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचे कर्तव्य आहे. सनातन प्रभात त्याच कर्तव्याचे पालन करत आहे.

२. कुटुंबप्रमुखाचा निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, त्याचप्रमाणे राष्ट्रप्रमुखाचा निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम पूर्ण राष्ट्राला भोगावे लागतात.

३. पंतप्रधान मोदी हे स्वच्छ चारित्र्याचे, राष्ट्रप्रेमी आणि अखंड कार्यरत असलेले पंतप्रधान आहेत. याविषयी कोणाच्याही मनात संदेह नाही; मात्र देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी काश्मीर समस्या, राममंदिर, ३७० कलम, गोहत्या, समान नागरी कायदा आदी समस्या सुटण्यासाठी त्यांनी धोरणात्मक कृती केली नाही, हेही तितकेच खरे.

४. एवढेच नव्हे, तर काश्मीरमध्ये राष्ट्रद्रोही पीडीपीशी युती करण्यासारखे घोर पाप भाजपने केले. ‘अशी राष्ट्रघातकी कृती करायची आणि कोणी त्यावर भाष्य करायचे नाही’, असे एखाद्याला वाटत असेल, तर ते वैचारिकदृष्ट्या आपले निर्णय योग्यच आहेत या एकांगी दिशेने जात आहेत, असे म्हटले तर वावगे ठरेल का ?

२. भाजपच्या समर्थकांनो, ‘सनातन प्रभात’च्या संपादकांना  नव्हे, तर शासनकर्त्यांना जाब विचारा !

टीका : जर तुम्हाला मोदी यांचे निर्णय आवडत नसतील, तर तुम्ही किंवा तुमचे संपादक यांनी मोदी यांना भेटून किंवा दूरभाष करून त्यांना निवेदन द्यावे. तसेच तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या त्यांना सादर कराव्यात. असे ३-४ वेळा निवेदन देऊनही मोदी यांनी तुमच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेतले नाहीत, तर तुम्ही त्यांच्यावर टीका करावी; पण तुम्ही असे काही केले आहे का ?

दृष्टीकोन :

१. भाजपचे समर्थक किंवा मोदीप्रेमी हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेली ही मागणी ना लोकशाहीला धरून आहे, ना धर्मशास्त्राला धरून ! प्रसारमाध्यमांकडून पंतप्रधानांवर टीका होत असते. त्या वेळी भाजपचे समर्थक त्यांच्या संपादकांना ‘तुम्ही मोदी यांना भेटा’, असा सल्ला देतात का ? वृत्तपत्रांमधील टीकांची नोंद घेऊन त्यावर उपाययोजना काढण्याची पद्धत आणि व्यवस्था प्रचलित प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आहे, हे भाजपच्या समर्थकांनी विसरू नये. (प्रत्यक्षात असे असते, तर सुराज्य आले असते.)

२. रामराज्यात धोब्याने सीतामातेविषयी केवळ शंका उपस्थित केली, तरी प्रभु श्रीरामचंद्रांनी त्याची नोंद घेऊन सीतेला वनात पाठवले. आज ‘भारतात गोहत्याबंदी करा’, ‘३७० कलम रहित करा’, ‘राममंदिर उभारा’ आदी विविध मागण्यांसाठी हिंदू रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. एवढे करूनही हिंदूंच्या भावना सत्ताधार्‍यांपर्यंत का पोचत नाहीत ? कुठे प्रजेतील एका सामान्य नागरिकाच्या मनातील शंकेची नोंद घेणारे प्रभु श्रीरामचंद्र, तर कुठे देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या मागण्यांकडे कानाडोळा करणारे सध्याचे राज्यकर्ते !

३. ‘सनातन प्रभात’ मांडत असलेल्या भूमिका ही संपादकांची एकट्याची भूमिका नसून त्या हिंदूंच्या सार्वत्रिक मागण्या आहेत. त्या सत्ताधार्‍यांनाही ठाऊक आहेत. त्या सोडवण्याची इच्छाशक्ती सत्ताधार्‍यांनी दाखवावी, इतकेच ‘सनातन प्रभात’चे म्हणणे आहे.

३. अडचणींवर मात करण्यासाठी भाजप सरकारने इच्छाशक्ती दाखवणे अपेक्षित !

टीका :  प्रत्येक राजकारण्याला काही मर्यादा असतात. लगेच हिंदु राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. राज्यसभेत भाजपला पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे असे कट्टर निर्णय घेणे शक्य नाही.

दृष्टीकोन :

१. लव्ह जिहादद्वारे हिंदु युवतींना पळवून नेणारे धर्मांध, हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावणारे जिहादी, भारतात विविध ठिकाणी हिंदूंवर आक्रमण करणारे धर्मांध, गोहत्या करणारे इत्यादींवर तरी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणे सरकारला शक्य होते; मात्र ‘मागील ५ वर्षांत हे सर्व समाजकंटक मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर जरब बसलेली नाही’, हे खेदाने म्हणावे लागत आहे. ‘या सर्वांवर कारवाई करण्यासाठी कायदे अस्तित्वात असतांनाही ती का केले नाही’, याचे उत्तर भाजपच्या समर्थकांनी द्यावे.

२. अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती आणि ईश्‍वराचे अधिष्ठान असले की, देव साहाय्य करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य स्थापन केले. ५ पातशाह्यांशी युद्ध केले. हे केवळ साधनेमुळे आणि देव अन् गुरु यांच्या कृपेने साध्य होऊ शकले. ‘असा प्रयत्न भाजप आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ किती करतात’, याचा त्यांनी विचार करणे आवश्यक आहे.

३. भाजप सरकारने भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले नाही, तरी कृतीतून सरकार हिंदु राष्ट्राच्या बाजूने आहे, असे भाजप सरकारने कधीच संकेत दिले नाहीत. याउलट सातत्याने निधर्मीवादाचेच गोडवे गायले. संसदेत बहुमत असतांनाही सरकारने राममंदिर उभारण्याविषयी उदासीनता दर्शवली. भाजपच्या या भूमिकेमुळे हिंदूंच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

 ४. ‘चर्चा नको, कृती हवी’, हे भाजपचे समर्थक लक्षात घेतील का ?

टीका : आम्हाला तुमचे धर्म आणि राष्ट्र यांचे कार्य आवडते अन् तुमचे लिखाण आवडते; परंतु आपण सर्व हिंदुत्वनिष्ठ आहोत. आपण आपल्यामध्ये चर्चा करूनच एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करू शकतो. त्याऐवजी टीका करणे योग्य नाही.

दृष्टीकोन : ‘पीडीपीशी युती करण्याचा निर्णय घेतांना भाजपने कोणाशी चर्चा केली होती ? पूर्ण भारतात गोहत्याबंदी लागू न करण्याविषयी भाजप कोणाशी बोलला होता ? काश्मीरमधील हिंदूंच्या पुनर्वसनाच्या विषयाला हात न घालण्याचा निर्णय कोणाच्या इशार्‍यावरून घेतला ? राममंदिर सूत्र ‘जैस थे’ ठेवायचे, हे कुठल्या चर्चेतून ठरले ? जर या सूत्रांच्या वेळी चर्चा केली नाही, तर ‘सनातन प्रभातने आमच्याशी चर्चा करावी’, अशी अपेक्षा करणे, योग्य आहे का ?

‘भाजपच्या चुका दाखवणे; म्हणजे काँग्रेसला मोठे करणे’, असे भाजपच्या समर्थकांना वाटणे हास्यास्पद !

 टीका : तुम्हाला राहुल गांधींना निवडून द्यायचे आहेत का ? राहुल गांधी पंतप्रधान झाले तर तुम्हाला चालेल का ? किंवा तुम्हाला आवडेल का ?

दृष्टीकोन :

१. सनातन प्रभातने ‘भाजपच्या चुका दाखवून देणे; म्हणजे काँग्रेसला मोठे करणे’, असे भाजपवाल्यांना वाटणे, हेच मुळी अतार्किक आहे.

२. पत्रकारितेचा धर्म म्हणून ‘सनातन प्रभात’ काँग्रेसच्या चुका दाखवते; मात्र गेल्या ७१ वर्षांचा इतिहास पाहिला, तर समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी काँग्रेसने कोणतीही कृती केलेली नाही. ‘ती यापुढे अशी कृती करील’, अशी ‘सनातन प्रभात’ला अपेक्षाही नाही.

३. शिक्षक उनाड मुलाकडे दुर्लक्ष करून हुशार विद्यार्थ्यांच्या चुका सांगतात; कारण ‘तो सुधारावा’, अशी त्यांना अपेक्षा असते. त्याचप्रमाणे भाजपकडून हिंदूंना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. त्याच्या चुका दाखवण्यामागे हा हेतू आहे.

‘चुकांतून शिकणे महत्त्वाचे’ हाच ‘सनातन प्रभात’चा चुका दाखवून देण्यामागील  दृष्टीकोन !

१. चुका या अधोगतीकडे नेणार्‍या असतात. त्यामुळे इतरांच्याच नव्हे, तर सनातन प्रभातमध्ये साधकांच्याही चुका प्रसिद्ध केल्या जातात. एवढेच नव्हे, तर नेमके काय चुकले, त्यामागे कोणता दोष होता, त्यामुळे काय परिणाम झाला, किती हानी झाली, यावर कोणती उपाययोजना करायची, चुका करणार्‍यांनी पापक्षालन करण्यासाठी कोणते प्रायश्‍चित्त घेणे आवश्यक आहे, याचे विश्‍लेषण यात असते.

२. ‘चुकांतून शिकणे’ हे अधिक महत्त्वाचे आहे. कोणतीही व्यक्ती, पक्ष आणि संघटना परिपूर्ण नसते; मात्र ईश्‍वर परिपूर्ण आहे. त्यामुळे साधक साधना म्हणून परिपूर्ण होण्यासाठी चुकांतून शिकतात.

३. राज्यकर्त्यांनीही चुकांतून शिकून परिपूर्ण व्हावे आणि भारत देशाची प्रगती व्हावी, हाच सनातन प्रभातचा चुका दाखवण्यामागील उद्देश आहे.


Multi Language |Offline reading | PDF