सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेही जामिनावर आहेत ! – नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांच्याकडून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन

नवी देहली – अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवार (राहुल गांधी आणि सोनिया गांधी) जामिनावर आहेत; पण त्याविषयी चर्चा होत नाही; पण भोपाळमधील उमेदवार (साध्वी प्रज्ञासिंह) जामिनावर बाहेर असण्याच्या सूत्रावरून वाद निर्माण केला जातो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञासिंह यांना दिलेल्या उमेदवारीचे समर्थन केले. ते इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’च्या मुलाखतीत बोलत होते.

मुलाखतीत मोदी यांनी मांडलेली सूत्रे

१. जगात गेल्या ५ सहस्र वर्षांपासून ज्या महान संस्कृती आणि परंपरा यांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हा संदेश दिला. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्‍चिद् दुःखमाप्नुयात्’ (अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्व जण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.) हा संदेश दिला. ज्या संस्कृतीने ‘एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति ।’(अर्थ : एक सत्य ऋषी वेगवेगळ्या प्रकारे सांगतात.)चा संदेश दिला. त्या संस्कृतीला तुम्ही (काँग्रेस नेते) आतंकवाद ठरवून मोकळे झालात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतीक आहे. काँग्रेसला हे आरोप महागात पडणार आहेत.

२. वर्ष १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्या वेळी त्यांच्या मुलाने (राजीव गांधी यांनी) म्हटले होते, ‘जेव्हा मोठे झाड पडते, त्या वेळी भूमीही हादरते.’ यानंतर देशभरात शिखांवर आक्रमणे चालू झाली. हा आतंकवाद नव्हता का ? यानंतर त्याच व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवण्यात आले, त्या वेळी माध्यमांनी प्रश्‍न उपस्थित केले नाहीत. (काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाल्यामुळेच प्रसारमाध्यमे अशा वेळी तोंड बंद करून बसतात; मात्र साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ, हिंदूंचे संत यांची अपकीर्ती करतात ! – संपादक)

३. अनेक शिखांना जाळण्यात आले आणि या घटनांचे साक्षीदारही आहेत; मात्र या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना खासदारकी (काँग्रेस नेते जगदीश टायटलर, कमलनाथ आणि सज्जनकुमार) देण्यात आली आणि यांतील एकाला तर आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपदी (कमलनाथ यांना) बसवण्यात आले.

४. ज्या लोकांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे, त्यांना लोक कारागृहात जाऊन भेटतात. रुग्णालयात जाऊन भेटतात. अशा लोकांना तत्त्वांविषयी बोलण्याचा अधिकार नाही.


Multi Language |Offline reading | PDF