प्रयागराज येथील कुंभपर्वात सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी संत अन् मान्यवर यांनी काढलेले गौरवोद्गार, साधकांचे केलेले स्वागत अन् आलेले अनुभव

श्री. अरविंद पानसरे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणाचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीमध्ये लिहून ठेवले आहे. याविषयी अनेक संत आणि साधक यांना अनेक अनुभूती आलेल्या आहेत. अनेक प्रसंगांतून त्यांच्या अवतारत्वाची प्रचीतीही साधकांना येत असते. प्रयागराज येथील वर्ष २०१९ च्या कुंभपर्वामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेले चित्रप्रदर्शन, तसेच वैयक्तिक संपर्काच्या वेळी संस्थेची माहितीपत्रके पाहिल्यावर संतांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे निघालेली वक्तव्ये पहाता परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणाचा अवतार असल्याचे पुन्हा अधोरेखित होते. एकूणच ‘गुरुदेवांचे किती मोठे अन् महान ईश्‍वरी कार्य चालू आहे !’, याची पुसटशी कल्पनाही आपल्याला आलेली नाही’, हे लक्षात येते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाला भेट देणारे संत अन् मान्यवर यांनी सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.                       (पूर्वार्ध)

१. सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार !

१ अ. सनातन संस्थेच्या प्रदर्शनामुळे अध्यात्मप्रसार होऊन समाजात जागृती होईल ! – श्री महंत कृष्णदास महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा 

‘अखिल भारतीय श्री पंच दिगंबर अग्नि आखाडा’ हा १३ आखाड्यांतील एक प्रमुख आणि सर्वांत मोठा आखाडा असून त्यांच्या अंतर्गत ४०० खालसे येतात. प्रदर्शन पाहिल्यावर आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महंत कृष्णदास महाराज म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन अतिशय चांगले आहे. असे प्रदर्शन लावल्यामुळे अध्यात्मप्रसार होऊन देशात हळूहळू सर्वत्र जागृती होईल. विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी असे प्रदर्शन लावून तुम्ही हिंदूंना जागृत करत आहात. हे चांगले आहे. या कार्यात मीही तुम्हाला सहकार्य करीन.’’

१ आ. संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे ! – आचार्य नित्यानंद गिरी महाराज, वृंदावन, उत्तरप्रदेश.

‘भारतीय संस्कृतीमधील ‘पारंपरिक खाणे-पिणे, कपडे परिधान करणे, मर्यादा पाळणे, बोलणे’, अशा सर्व गोष्टी मनुष्य विसरत आहे. या पारंपरिक गोष्टींचे जे पुनर्जागरण सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे, त्याला ‘अद्वितीय प्रयत्न’ असेच म्हणू शकतो. या गोष्टीला वेळ लागेल; मात्र यश नक्कीच मिळेल. संपूर्ण विश्‍वात सनातनसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे; कारण विश्‍वाची युद्धाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. शांतीच्या दिशेने कोणतीही वाटचाल नसून उत्पाताचा प्रयत्न केला जात आहे. अशा स्थितीत द्वेष, मत्सर आणि पूर्वग्रह या स्वभावदोषांनी पीडित असणार्‍यांना समाधान मिळण्यासाठी सनातन संस्थेचा आधार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अतिशय उत्कृष्ट अन् सुंदर पद्धतीने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन पाहून आचरण केल्यास सुख, शांती आणि समृद्धी यांची प्राप्ती होऊ शकते.’

१ इ. ‘अध्यात्म हे केवळ ग्रंथ वाचून अथवा प्रवचन ऐकून शिकता येत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते’, ही महत्त्वपूर्ण गोष्ट सनातन संस्थेच्या चित्रप्रदर्शनातून सांगण्यात आली आहे ! – सुनील ठाकूर आणि राजन बोडेकर, स्वीय साहाय्यक, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज, रत्नागिरी.

‘अध्यात्म हे केवळ ग्रंथ वाचून अथवा प्रवचन ऐकून शिकता येत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते’, ही महत्त्वपूर्ण गोष्ट या प्रदर्शनातून सांगण्यात आली आहे. ‘अध्यात्माचा प्रारंभ कुठून व्हायला हवा ?’, याचे शिक्षण सनातन संस्थेतून दिले जाते. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. जे लोक ईश्‍वरी शक्ती आणि अध्यात्म यांवर विश्‍वास ठेवतात, ज्यांना अध्यात्मात पुढे जाण्याची इच्छा आहे, त्यांनी प्रथम या संस्थेत येऊन येथे दिलेले शिक्षण घेऊन ते समजून घ्यावे आणि त्याचा अनुभव घ्यावा. त्यानंतर साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील.’

१ ई. सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात ज्ञानरूपी साक्षात् सरस्वती वहात आहे ! – डॉ. प्रभु नारायण करपात्री, काशी 

प्रदर्शनाला भेट दिल्यावर काशी येथील रहिवासी आणि १० वर्षांपासून ईशान्येकडील राज्यांत एकटे राहून धर्मांतर रोखण्याचे कार्य करणारे डॉ. प्रभु नारायण करपात्री म्हणाले, ‘‘प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावर गंगा आणि यमुना नदी दिसते; मात्र त्या ठिकाणी लुप्त असणारी सरस्वती नदी दिसत नाही. सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर येथे लुप्त सरस्वती वहात असल्याचे दिसते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. असे भव्य आणि ज्ञान देणारे चांगले प्रदर्शन संपूर्ण कुंभमेळ्यात पाहिलेले नाही. या कुंभपर्वामध्ये पैसे मिळवण्यासाठी अनेक जण भगवा वेश परिधान करून साधू झालेले आहेत. ते खरे साधू नसून भिक्षेकरी आहेत. त्यांना धर्माशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे ते सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात असलेल्या सरस्वतीकडून ज्ञान घेण्यासाठी येत नाहीत. कुंभपर्वात तर अनेक जणांनी भव्य राजवाड्यांप्रमाणे तंबू बांधून लोकांना लुबाडण्याचे काम चालू केलेले आहे. ते खरे साधू नाहीत. ते दरोडेखोर आहेत. पैसे देऊन अनेक जण महामंडलेश्‍वर झालेले आहेत. त्यांना खरे धर्मरक्षणाचे कार्य करायचे असेल, तर त्यांनी ईशान्येकडील राज्यांत येऊन कार्य करावे.’’ (उत्तरार्ध वाचा पुढील रविवारी)

– श्री. अरविंद पानसरे, राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र.

 परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मरक्षणासाठी उचललेले पाऊल योग्य !महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज, अखिल भारतीय श्रीपंचबारामाई दाडीया खालसा, गोरियापूर गाव, कानपूर जिल्हा.

महंत श्री देवनारायणदास वेदांताचार्य महाराज प्रयागराज येथील सनातन संस्थेचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. संस्थेचे प्रदर्शन पाहिल्यावर ते म्हणाले, ‘‘मला आतून एवढा आनंद झाला आहे की, मला येथून जावेसे वाटत नाही. तुमच्या गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) धर्मरक्षणासाठी जे पाऊल उचलले आहे, ते चांगले आहे. गीता, भागवत, गंगा, गो, सरस्वती, हिंदुत्व आणि शिष्टाचार समाप्त होत असून ते वाचवण्यासाठी सनातन संस्था प्रयत्न करत आहे. या ठिकाणी मला पुष्कळ प्रसन्नता वाटली. तुम्ही एवढा प्रचार करत आहात, तर विश्‍वात तुमच्या कार्याला यश मिळेल.’’

२. परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या साहित्याद्वारे सनातन धर्माला विश्‍वात पुढे घेऊन जात आहेत ! – जगद्गुरु विश्‍वकर्मा स्वामी दिलीप योगीराज महाराज

‘सनातनचा कधीही नाश होत नाही. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले सनातन धर्माला भारतासह विश्‍वात पुढे नेण्यासाठी त्यांच्या साहित्याद्वारे कार्य करत आहेत. हे साहित्य वाचून ‘काय करायला हवे ? काय करायला नको ?’, हे लोकांच्या लक्षात येईल. ‘या साहित्यात वैदिक परंपरा काय आहेत ?’, हे सांगितले आहे. भारतात आणि विश्‍वात सनातन धर्माचा ध्वज फडकला पाहिजे आणि सनातन संस्था या साहित्याचा असाच प्रचार करत राहो.’

३. तुमचे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) मोठे कार्य करत आहेत ! – स्वामी आेंकार अग्निवंशी, नागा साधू, श्री पंच दशनाम जुना आखाडा

स्वामींना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे पत्रक दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. तुम्ही सर्व जण समर्पित होऊन मोठे कार्य करत आहात. तुमचे गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) तर मोठे कार्य करत आहेत. तुम्ही येऊन मला जागृत केले आहे. तुम्हाला काही साहाय्य लागले, तर मला सांगा.’’

४. शास्त्र आणि परंपरा यांना लोकांमध्ये पोचवणार्‍या आदरणीय आठवलेगुरुजींना माझा कोटी-कोटी प्रणाम ! – पंडित विनय मालवीय, खंडवा, मध्यप्रदेश.

‘भारत हा देश नेहमीच सनातन धर्माचाच राहिला आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीपेक्षा केवळ शास्त्राला प्रमाण मानले गेले आहे. हे शास्त्र आणि परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणारे आदरणीय आठवलेगुरुजी (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो.’


Multi Language |Offline reading | PDF