परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अर्पण न घेता ‘आता तुमच्याकडेच राहू दे. ते पैसे तुम्हालाच लागतील’, असे सांगणे आणि पुढे प्रत्यक्षातही तसे अनुभवणे

साधकांच्या साधनेविषयी दूरदृष्टीने पहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्री. देवदत्त कुलकर्णी

‘मला निवृत्ती मिळाली आणि काही मासांतच माझी जी काही येणे रक्कम होती, ती गुरुकृपेमुळे संपूर्ण मिळाली. त्या वेळी गुरुपौर्णिमा जवळ आली होती. माझ्या मनात विचार आला, ‘आपल्याला गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मुदतपूर्व निवृत्ती मिळाली, तसेच पस्तीस सहस्र रुपयांचा लाभ झाला आहे. ते या गुरुपौर्णिमेला अर्पण करूया.’ आणि त्याप्रमाणे मी केलेही; परंतु काही दिवसांनी मला निरोप आला, ‘हे अर्पण आम्ही घेणार नाही. ते तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. ते तुम्हालाच कधीतरी लागेल.’ संस्थेने ते सर्व पैसे मला परत दिले. त्यानंतर काही मासांनी माझी पत्नी सत्संग घेण्यासाठी जात असतांना पडली आणि तिचा मोठा अपघात झाला. नंतर तिला कमरेपासून तळपायापर्यंत प्लास्टर घालून ६ मास तसे ठेवले होते. त्या वेळी गुरुमाऊलीने परत केलेले पैसे उपयोगात आले. तेव्हा गुरुमाऊलीची दूरदृष्टी लक्षात येऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली; परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडील शब्द अपुरे आहेत, तरी कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ !’

– श्री. देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF