लाज सोडलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवाले !

लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने…

निरर्थक भारतीय लोकशाही !

सध्या भारतात लोकसभेची निवडणूक चालू आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये या निवडणुका होत आहेत. देशभर सर्वपक्षीय राजकारण्यांच्या प्रचारसभा रंगत आहेत. निवडणुकांच्या या रणांगणात अनेक अपप्रकारांना उधाण आले आहे. ‘जगातील सर्वांत मोठी निवडणूक’ म्हणून बहुमान (?) मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीची ही स्थिती भारतासाठी खरेतर लज्जास्पद आहे. भारतीय राजकारणी आणि जनता यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आणि त्यांना अंतर्मुख करायला लावणारे हे नैमित्तिक सदर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करत आहोत.

‘निर्लज्जम् सदा सुखी ।’ या म्हणीचा प्रत्यय हवा असेल, तर सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून प्रसिद्ध होणार्‍या ‘लाज कशी वाटत नाही ?’ या मथळ्याखाली प्रसिद्ध होणार्‍या विज्ञापनांकडे पहावे. भाजपचे सरकार कसे अपयशी ठरले आहे, याची कथित सूत्रे या विज्ञापनांमध्ये आहेत. एक सर्वसामान्य व्यक्ती त्रस्त आणि उद्विग्न होऊन ‘लाज कशी वाटत नाही ?’, असा प्रश्‍न उपस्थित करत असल्याचे यामध्ये दाखवण्यात आले आहे. तशी होर्डिंग्जही अनेक ठिकाणी लागली आहेत. बेरोजगारी, शेतीचे प्रश्‍न, महागाई आदी विषयांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी भारतीय जनतेला सर्वाधिक लुटले, ७ दशके राज्य करूनही ज्या पक्षाला भारताची प्रगती साध्य करता आली नाही, ज्यांच्या काळात भारताचा भूभाग शत्रूराष्ट्रांच्या कह्यात गेला, ज्यांनी देशातील बहुसंख्यांकांना कायमच अन्यायकारक वागणूक दिली, ज्या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी विदेशी असण्याच्या सूत्रावरून काडीमोड घेऊन काही वर्षांनी त्याच पक्षाशी पुन्हा संसार थाटला, ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या लेखी सालसता असण्याची उदाहरणे असावीत ! चिखलाने बरबटलेल्या मुलाने दुसर्‍या चिखलात बरबटलेल्या मुलाकडे बोट दाखवून हसणे आणि ‘लाज कशी वाटत नाही ?’ ही विज्ञापने यांमध्ये वैचारिक स्तरावरही जराही भेद नाही. सर्वच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल्याने ‘निर्लज्जम् सदा सुखी ।’ याचा पदोपदी प्रत्यय राजकारणाच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठे येऊ शकतो ?


Multi Language |Offline reading | PDF