हिंदूंच्या एका समाजघटकाचे धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न करतांना त्या समाजातील व्यक्ती आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याविषयी आलेले कटू अनुभव !

कधी नव्हे इतकी हिंदूसंघटनाची आवश्यकता असतांना ‘धर्मांतरा’सारख्या गंभीर प्रकरणाच्या विरोधात पुढाकार घेणार्‍या एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या मोहिमेमध्ये अडथळे निर्माण करणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वाला घातकच ! अशाने हिंदूंचे हित कधीतरी साधले जाईल का ? मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना हे लक्षात येत नाही, हे हिंदूंचे दुर्दैवच !

‘एका शहरात हिंदूंच्या एका समाजघटकाचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. त्या जिल्ह्यांत झालेल्या प्रांतीय अधिवेशनांत याविषयी चर्चा झाली. त्यानुसार हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्या समाजातील व्यक्ती, अधिवक्ता, पत्रकार आणि अन्य मान्यवर यांना हिंदु जनजागृती समितीने संपर्क केले. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्या समाजातील नागरिकांच्या बैठका घेऊन ‘धर्मांतरबंदी कायदा व्हावा’, यासाठी आंदोलने आणि मोर्चा यांचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी लक्षात आलेली काही सूत्रे येथे देत आहे.

१. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन, बैठका आणि मोर्चा यांचे आयोजन करतांना आलेले अनुभव

१ अ. अन्य संघटनांनी बैठका घेणे : हिंदु जनजागृती समितीने त्या शहरात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र करून कार्य करायला प्रारंभ केला आहे. त्याच वेळी काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बैठका घेऊन ‘आम्हीही यासाठी कार्यरत आहोत’, असे दाखवणे चालू केले.

१ आ. मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘कार्यात सहभागी होऊ’, असे सांगणे; मात्र नंतर प्रतिसाद न देणे : ‘धर्मांतरबंदी कायदा व्हावा’ या मागणीसाठी काढण्यात येणार्‍या मोर्च्याच्या नियोजन बैठकीत एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही सहभागी होऊ, साहाय्य करू’, असे सांगितले; परंतु त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा प्रतिसाद नव्हता.

१ इ. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘मोर्च्यात ध्वज घेऊन सहभागी होऊ’, असे सांगणे; मात्र मोच्यार्र्त सहभागी न होणे : एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही मोर्च्याच्या वेळी ५० जणांना सुरक्षा व्यवस्थेसाठी घेऊन येतो’, ‘१०० भगवे ध्वज घेऊन येतो’, असे सांगितले. मोर्च्याच्या आदल्या दिवशी ते ‘ध्वज सिद्ध आहेत. आम्ही घेऊन येत आहोत’, असे सांगत होते; मात्र मोर्च्याच्या दिवशी समितीच्या कार्यकर्त्यांनी भ्रमणभाष केल्यानंतर त्यांनी उचलला नाही आणि त्यांच्याकडचे कोणीही आले नाही.

१ ई. एका संघटनेच्या एका शहरप्रमुखांनी ‘आंदोलनासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि ३० भगवे ध्वज देतो’, असे सांगितले. त्यांना अनेक वेळा संपर्क केल्यावर आंदोलनाच्या एक दिवस आधी ‘साहित्य देऊ शकत नाही’, असे त्यांनी सांगितले.

१ उ. आंदोलनाच्या वेळी ‘अन्य कार्यकर्त्यांनाही बोलायला दिले पाहिजे’, असा आग्रह धरणारे एका संघटनेचे प्रतिनिधी : आंदोलनात काही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (‘या संघटनांचे अनेक कार्यकर्ते येणार’, असे आधी सांगितले होते.) या तीनही संघटनांच्या एकेका प्रतिनिधीला विषय मांडण्याची संधी दिली होती, तरीही त्यांचा ‘अन्य कार्यकर्त्यांनाही बोलू दिले पाहिजे’, असा आग्रह होता. त्या वेळी अधिक वक्ते असल्याने ‘सगळ्यांना विषय सांगण्याची संधी देणे शक्य नाही’, ही अडचण सांगूनही ते आग्रह करत होते. एका संघटनेच्या अधिवक्त्यांनी प्रक्षोभक विषय मांडला. समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगूनही ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

१ ऊ. संयुक्त कार्य करत असतांनाही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेकडून ‘धर्मांतर’ याच विषयावर स्वतंत्र बैठकीचे आयोजन

१ ऊ १. स्वतंत्र बैठकीचे नियोजन मुख्य कार्यालयातून केले जाणे आणि त्या समाजातील अधिवक्त्यांना बैठक घेण्यासाठी पाठवणे : ‘दोन मासांपासून हिंदु जनजागृती समिती, मोठी हिंदुत्वनिष्ठ संघटना, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदूंचा तो समाजघटक यांचे संयुक्तरित्या जनजागृतीचे कार्य चालू आहे, तरीही मोर्चा झाल्यानंतर एका संघटनेने ‘धर्मांतर’ याच विषयावर एका बैठकीचे आयोजन केले. ही बैठक त्या संघटनेचे मुख्य कार्यालय असलेल्या शहरातून ठरली होती. त्याच समाजाच्या अधिवक्त्यांना बैठक घेण्यासाठी त्या शहरातून पाठवले होते.

१ ऊ २. ‘कार्यकर्त्यांचा समितीविषयी नकारात्मक दृष्टीकोन व्हावा’, या रितीने बैठकीत सूत्रे सांगणे : ‘असा मोर्चा काढून काही होत नाही. वृत्तपत्रांत अयोग्य संख्या छापून येते. ‘१.५ लक्ष लोकांचे धर्मांतर झाले आहे’, हे खोटे आहे. धर्मांतरबंदी कायदा करून काही होत नाही, तसेच कायद्याचे पालन कोण करत नाही’, असे त्या बैठकीत सांगण्यात आले. ‘कार्यकर्त्यांचा समितीविषयी नकारात्मक दृष्टीकोन व्हावा’, अशा रितीने बैठकीत सूत्रे सांगण्यात आली.

१ ए. एका संघटनेने त्यांच्या कार्यकर्त्यांना ‘समितीच्या कोणत्याही मोहिमेत सहभागी व्हायचे नाही’, असे सांगणे आणि त्या संघटनेचे जिल्हा संयोजक भेटण्यास इच्छुक नसणे : आंदोलन आणि मोर्च्याच्या कालावधीत एका संघटनेच्या कार्यकर्त्याने ‘समितीच्या कोणत्याही मोहिमेत सहभागी व्हायचे नाही’, असे आम्हाला सांगितले आहे. आम्हाला सहभागी करून घ्यायचे असल्यास तुम्ही आमच्या जिल्हा संयोजकाशी बोला’, असे सांगितले. त्यानुसार हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांनी त्या संघटनेच्या जिल्हा संयोजकांना भ्रमणभाष करून आता चालू असलेल्या मोहिमेची माहिती दिली. तेव्हा ‘तुम्ही आताच आला आहात. आम्ही पुष्कळ वर्षांपासून कार्य करत आहोत’, अशा अविर्भावात ते बोलत होते. त्यांना भेटण्यासाठी वेळ विचारली, तेव्हा त्यांनी ‘मी व्यस्त आहे. नंतर भेटूया’, असे सांगितले.

१ ऐ. ‘काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी साहाय्य करणार’, असे सांगणे; मात्र नंतर त्यांचे साहाय्य न मिळणे : काही संघटनांनी कार्यक्रमाच्या आयोजन बैठकीत ‘संख्यात्मक आणि वस्तू रूपात साहाय्य करणार’, असे सांगितल्याने अन्य संघटना किंवा धर्मप्रेमी अन्य गोष्टींचे नियोजन करायचे. प्रत्यक्षात ‘त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत कोणतेच साहाय्य मिळायचे नाही. त्यामुळे आयोजनात पुष्कळ अडचणी आल्या.

२. त्या समाजाची स्थिती

२ अ. सदर समाजाचे लोक ‘धर्मांतर होऊ नये’, यासाठी पाकिस्तानातून भारतामध्ये आले; परंतु याचे त्या लोकांना विस्मरण झाले आहे.

२ आ. त्या समाजघटकाच्या अनेक संघटना एका शहरात कार्यरत आहेत; मात्र केवळ प्रसिद्धी मिळण्यासाठी त्यांची धडपड चालू असते.

२ इ. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘धर्मांतरबंदी कायदा व्हावा’, यासाठी मोर्च्याचे आयोजन केले होते; परंतु त्या समाजाच्या लोकांनी ‘या मोर्च्याचे आयोजन आम्ही केले आहे’, असे वृत्त छायाचित्रासहित अन्य वृत्तपत्रांना दिले. या समाजघटकाचा मोर्चा किंवा अन्य कोणत्याही सेवा यांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नव्हता. असे अन्य संघटनांंचेही मत होते.

२ ई. काही जण थोडे साहाय्य करत असल्यासारखे दाखवायचे; मात्र ‘आयोजक तेच आहेत’, असे भासवून फेसबूक आणि अन्य प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवत होते. आंदोलनाच्या ठिकाणी छायाचित्रकार आल्यावर ते छायाचित्रात येण्यासाठी पुढे येत.

२ उ. मोर्च्यात एका संघटनेचा सहभाग होणार होता. या संघटनेच्या एका शाळेत पूर्वी धर्मांतराचा कार्यक्रम होणार होता. हे त्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांना लक्षात आल्यावर त्यांनी तो कार्यक्रम रहित केला, तरी ‘या संघटनेचा मोर्च्यात सहभाग नको’, अशी मागणी अन्य व्यक्ती करत होत्या. ‘हिंदु जनजागृती समिती त्या संघटनेकडून पैसे घेऊन त्या संघटनेची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचे काम करत आहे’, असे आरोप करून ‘ती संघटना असेल, तर आम्ही मोर्च्यात सहभागी होणार नाही’, असा पवित्रा इतरांनी घेतला.

२ ऊ. या लहान शहरात पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते संख्येने अधिक आहेत. याचा अभ्यास केल्यावर पैसे कमावण्यासाठीच हे सर्व चालू असल्याचे लक्षात आले. ‘सर्व क्षेत्रांतील समस्यांवर काम केले’, असे दाखवून प्रसिद्धी मिळवणे किंवा ‘ब्लॅकमेल’ करून पैसा कमावणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण आहे’, असे समजले जाते. त्यांना कोणीही विरोध करत नाही.

२ ए. त्या समाजातील काही कार्यकर्ते आम्हाला भ्रमणभाष करून ‘तुम्ही अन्य व्यक्तीचे नाव वृत्तात लिहिले; पण आमचे नाव वृत्तात का घेतले नाही ?’, अशी विचारणा करून वाद घालत असत. ते ‘धर्मांतर’ या विषयावरील चर्चेचा स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी अपलाभ करून घेत आहेत’, असे लक्षात येत असे. काही जण आंदोलन किंवा मोर्च्याच्या ठिकाणी उपस्थित नसायचे, तरी ‘त्यांचे नाव छापावे’, यासाठी ते आग्रही असायचे.

२ ऐ. एका समाजातील लोक व्यापारी वर्गातील आहेत. त्यांना ‘धर्मांतर बंदी झाली पाहिजे; परंतु स्वतःचे नाव कुठेही यायला नको’, असे वाटत असे.’

– एक धर्मप्रसारक, सनातन संस्था


Multi Language |Offline reading | PDF