जनतेला मूर्ख समजू नका !

संपादकीय

बिहारमध्ये बेगुसराय येथे भाकपचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांना स्थानिक ग्रामस्थांनी अडवून ‘तुम्हाला कोणापासून ‘आझादी’ हवी आहे ?’, असा प्रश्‍न विचारला. ग्रामस्थांनी कन्हैय्या कुमार यांना ‘गरिबांना कोणतीही आझादी नको आहे. तुम्ही जेएन्यूमध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशी घोषणाबाजी का केली ?’ असाही जाब विचारला, तर गुजरात येथील घटनेत काँग्रेसचे उमेदवार हार्दिक पटेल यांना एका स्थानिक व्यक्तीने कानशिलात लगावली. ‘गुजरात बंद पुकारून जनतेला त्रास दिल्यामुळे पटेल यांना धडा शिकवला’, असे संबंधित व्यक्तीचे म्हणणे होते. तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते राव यांच्यावर ते नवी देहली येथे पत्रकार परिषद घेत असतांना एका व्यक्तीने त्यांच्यावर बूट भिरकावण्याची घटना घडली.

निवडणुकांच्या वेळी ‘मतदार राजा’ अशी जनतेला विशेषणे लावणारे राजकारणी एरव्ही तिला गृहीत धरत असतात. ‘आपण काहीही केले अथवा बोललो, तरी जनता आपल्यालाच मत देते’, असा राजकारण्यांनी अपसमज करून घेतलेला आहे. त्याला कारणही तसेच आहे. ज्या काँग्रेसने देशाची तिच्या सत्ताकाळाच्या प्रारंभापासून हानीच केली, तिलाच लोकांनी गेली ५५ हून अधिक वर्षे पुन:पुन्हा सत्तेवर बसण्याची संधी दिली; मात्र तेव्हाच्या काळातील एक महत्त्वाची अडचण अथवा मर्यादा म्हणजे काँग्रेसचा खरा तोंडवळा लोकांना ओळखता आला नाही. दोन दशकांपूर्वी मतदान म्हणजे ‘हातावर शिक्का’ एवढेच ग्रामीण भागातील लोकांना ठाऊक होते. त्यामुळे लोक ‘हातावर शिक्का मारला म्हणजे मतदानाचा हक्क बजावला’, असे मानत होते; मात्र ‘हाच हात आमचा गळा घोटत आहे आणि हातचलाखी करून आम्हाला फसवत आहे’, हे त्यांना काही दशकांनंतर उमगले अन् नंतर अन्य पक्षांची सत्ता केंद्रस्थानी येऊ लागली. सत्तेवर आलेल्या अन्य पक्षांनी काही अंशी काँग्रेसचा कित्ता गिरवण्यास प्रारंभ केल्यावर त्यांनाही लोकांनी सत्ताच्युत केले.

… तर ‘चलती’ही बंद होईल !

‘जनतेच्या सेवेसाठी, जनहितासाठी अथवा विकासासाठी आम्हाला सत्ता हवी’, असे निवडणुकांच्या वेळी सांगितले जाते. त्यासाठी विरोधकांकडून झालेल्या चुकांचा पाढा वाचला जातो. काही वेळा वैयक्तिक टीका केली जाते, कधीतरी अवास्तव आश्‍वासनेही दिली जातात आणि भाषण संपते. वरील उदाहरणांपैकी कन्हैय्या कुमार यांचे उदाहरण घेतले, तर त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत. ‘भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला, इन्शा अल्ला’ या घोषणा देणार्‍यांपैकी ते आहेत. कन्हैय्या कुमार प्रत्येक भाषणात मोठ्या आवेशात ‘हमे आझादी चाहिए’चे नारे देतात. ‘मोठ मोठे शब्द वापरून लोकांना भ्रमित करू’, असे त्यांना वाटत असावे. तरीही भारतातील खेडूतही सुजाण असल्यामुळे त्यांनी थेटच प्रश्‍न विचारून कन्हैय्या कुमार यांची बोलती बंद केली आणि नंतर निवडणुकीच्या माध्यमांतून त्यांची बिहारमधील ‘चलती’ही बंद करतील अशी अपेक्षा आहे. या वेळी कन्हैय्या कुमार यांचा क्रमांक लागला, तर अन्य नेत्यांनी ‘जनता त्यांना जाब विचारणार नाही’, असे समजू नये.

बंदचे राजकारण !

बंद आणि राजकारणी यांचे समीकरण समजून घेण्यासारखे आहे. एखादी गोष्ट सत्ताधारी पक्षाकडून होत नसेल, तर बंद करून ती साध्य करून घेणे हा राजकारण्यांचा उद्योग आहे. बंदच्या आडून शक्तीप्रदर्शन करण्याचा हेतूही पूर्ण करण्यात येतो. बंदचा त्रास ना होतो सत्ताधारी पक्षाला ना विरोधकांना. होतो तो केवळ जनतेला. बंदच्या काळात निरपराध जनतेच्या गाड्या, दुकाने, घरे-दारे यांची मोठ्या प्रमाणात हानी केली जाते. कोरेगाव-भीमा येथील दंगलीत शेकडो कोटी रुपयांची हानी झाली. मुंबईसारख्या शहरात तर हानीची तीव्रता पुष्कळ होती. कोरेगाव-भीमाच्या दंगलीनंतर पुकारलेल्या बंदच्या काळात मध्यमवर्गीय लोकवस्तीच्या घाटकोपरसारख्या ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी गाड्या फोडून उलट्या केल्या. काही किलोमीटर अंतरापर्यंत हेच दृष्य होते. या हानीचे दायित्व बंद करणार्‍यांनी घेतलेच नाही. उलट काही झालेले नाही, अशाच आविर्भावात ते होते. सरकारने नंतर ‘हानी भरून देऊ’, असे सांगितले, तरी तो शेवटी जनतेचाच पैसा. काही मासांनी आंदोलकांवरील गुन्हे सरकारकडून मागे घेण्याची घोषणाही करण्यात आली. त्यामुळे शिक्षा कोणाला, तर पुन्हा जनतेलाच. ही आग जनतेच्या मनात धुमसणार नाही तर काय !  गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाच्या वेळी समाजकंटकांनी गुजरात पेटवले होते. असे अनेक वेळा झाल्यानंतरच सामान्यांच्या मनात प्रत्युत्तर देण्याची भावना मूळ धरू लागते.

काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत असतांना तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या कृषीविषयक चुकीच्या धोरणांना विरोध म्हणून पंजाबच्या एका व्यक्तीने कानशिलात लगावली होती. हे उदाहरणही बोलके होते. राजकारण्यांनी त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या घोडचुकांना अन्य कोणी नाही तर जनता साक्षी असते. राजकारणी भलेही त्यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपांतून पुराव्यांअभावी निर्दोष सुटतीलही; मात्र जनतेच्या आणि ईश्‍वरी न्यायाच्या दृष्टीने ते गुन्हेगार ठरतात. ‘आपण सदासर्वकाळ लोकांना मूर्ख बनवू शकत नाही’ अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. देशातील सर्वच जनतेला नाही, तरी काही अंशी लोकांना तरी ‘आपली पिळवणूक होते’, ‘फसवणूक होते’ हे लक्षात आले आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक गावांमध्ये निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालून रोष व्यक्त केला आहे. यातून सावध होऊन राजकारण्यांनी त्यांची कथनी आणि करणी सुधारणे आवश्यक आहे. अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घालणारी जनता कधी घरापर्यंत येईल, याचा नेम नाही !


Multi Language |Offline reading | PDF