सूक्ष्मातून दिसणे आणि जाणवणे यांसंदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. लवनिता डूर् यांना आलेल्या अनुभूती

‘मागील काही आठवड्यांपासून मला सूक्ष्मातून लोकांभोवती, तसेच सभोवतालच्या वातावरणात घडत असलेल्या गोष्टी दिसतात; मात्र त्याच्या सत्यतेविषयी मी साशंक आहे.

सौ. लवनिता डूर्
चि. नारायण डूर्
श्री. अद्रियन डूर्

१. चि. नारायणभोवती पिवळे संरक्षककवच, तर पतीच्या भोवती संरक्षक कवचाच्या समवेत राखाडी आवरण दिसणे आणि नारायणभोवती  असणार्‍या पिवळ्या कवचामुळे चैतन्य मिळणे

१६.६.२०१७ या दिवशी आम्ही रेल्वेने प्रवास करत होतो. त्या वेळी मला माझे (साधक) पती श्री. अद्रियन यांच्याभोवती पिवळ्या रंगाचे एक संरक्षककवच, तसेच त्याभोवती राखाडी रंगाची छटा दिसली. काही वेळाने ‘पिवळ्या रंगाचे संरक्षककवच वाढत जाऊन राखाडी रंगाचे आवरण न्यून होत आहे’, असेही मला जाणवले. त्यानंतर मी आमचे ७ मासांचे बाळ चि. नारायणकडे पाहिले, तेव्हा मला त्याच्याभोवती केवळ पिवळ्या रंगाची आभा दिसली. ती अद्रियनभोवती असलेल्या संरक्षककवचापेक्षा तीन पटींनी अधिक होती. त्या वेळी ‘ईश्‍वर सतत आपल्या समवेत असून तोच साधकांचे रक्षण करत आहे’, असे मला वाटले.

नारायणभोवती असलेलेे पिवळे कवच मला यापूर्वीही काही वेळा दिसले होते. ‘मी त्याकडे खेचली जात असून त्यामुळे मला चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवत असे. ‘ईश्‍वर नारायणचे संगोपन पुष्कळ चांगल्याप्रकारे करत आहे’, असे मला बर्‍याचदा वाटते.

२. इतर माणसे, रस्ते अन् इमारती यांच्याभोवतीही नकारात्मक स्पंदने जाणवणे,काळे आणि धुरकट आवरण दिसणे अन् ‘पॉप’ संगीत म्हणणार्‍या किशोरवयीन मुलांकडून सर्व दिशांकडे गडद त्रासदायक शक्ती जात आहे’, असे दिसणे

रेल्वेमधील इतर लोकांकडे मी पाहिले, तेव्हा त्यांच्याभोवती मला मोठे काळे आणि धुरकट आवरण दिसले. काही जणांभोवती ते आवरण १ – २ मीटर एवढे मोठे होते. काही लोकांभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण मला स्पष्टपणे दिसते. काही वेळा मोठे आणि काळसर आवरण असलेले लोक माझ्या जवळून जात, तेव्हा ‘ते काळे आवरण मला मागे ढकलत आहे’, असे वाटत होतेे अन् त्या वेळी मला चांगले वाटत नव्हते. रस्त्यावर अन् इमारतींभोवतीही मला नकारात्मक स्पंदने जाणवतात. रेल्वेमधील काही किशोरवयीन मुले मोठ्या आवाजात ‘पॉप’ संगीत म्हणत अन् ओरडत होती, तेव्हा मला ‘त्यांच्याकडून सर्व दिशांकडे गडद त्रासदायक शक्ती जात आहे’, असे दिसले.

३. रेल्वेमध्ये नामजप आणि प्रार्थना करतांना ‘माझ्या सहस्रारचक्रात प्रखर प्रकाश येऊन तो मला शुद्ध करत आहे, तसेच सहस्रारचक्राच्या माध्यमातून मी देवाच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवणे

रेल्वेमध्ये मी नामजप आणि प्रार्थना करतांना ‘माझ्या सहस्रारचक्रात प्रखर प्रकाश येऊन तो मला शुद्ध करत आहे, तसेच सहस्रारचक्राच्या माध्यमातून मी देवाच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवले. अद्रियनच्या संदर्भातही मला तसेच जाणवले. आमच्या शेजारच्या व्यक्तीकडे पाहिले, तेव्हा तिच्या सहस्रारचक्रातून ईश्‍वराशी काही प्रमाणात अनुसंधान साधलेले दिसले; परंतु ते विरळ अन् अस्थिर होते. तेव्हा मला असे वाटले की, ईश्‍वर प्रत्येकाशी जोडला गेेला आहे. सर्वसाधारण व्यक्तींशी तो अल्प प्रमाणात, तर साधकांशी अधिक प्रमाणात जोडला गेेला आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले आपली किती काळजी घेत आहेत, तसेच नामजप आणि प्रार्थना देवाच्या अनुसंधानात रहाण्यास कसे साहाय्यभूत ठरते’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

जेव्हा मी नामजप करायला बसते, तेव्हा मला बर्‍याच वेळा वर उल्लेख केल्यापेक्षा पुष्कळ अधिक प्रमाणात पिवळा प्रकाश देवाकडून येतांना दिसतो. तो माझ्या संपूर्ण शरिरात पसरून माझ्यात उत्साह निर्माण करतो.

४. अद्रियन प्रार्थना करतांना त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी प्रकाश दिसणे

एकदा अद्रियन प्रार्थना करत होते. त्या वेळी मला त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी प्रकाश दिसला. त्यांचे ईश्‍वराशी असलेले अनुसंधान, तसेच त्यांची तळमळही मला जाणवली. त्याचसमवेत मला त्यांच्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरणही दिसले. त्या वेळी ‘सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती यांच्यात युद्ध चालू आहे’, असे मला जाणवले.

५. अद्रियन यांना आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यांच्या डोक्याभोवती त्रासदायक शक्ती दिसणे आणि त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी डोक्याभोवती त्रास होत असल्याचे सांगणे

एक दिवस मला अद्रियन यांच्या डोक्याभोवती त्रासदायक अन् अस्वस्थ करणारी शक्ती दिसली. त्यांच्या डोक्याभोवती त्रासदायक शक्ती असल्याचे अन् नामजपादी उपाय केल्यानंतर तो त्रास उणावणार असल्याचे मला जाणवले. त्या वेळी अद्रियन संगणकावर काही तरी काम करत होते. ‘मला जे दिसत होते, ते सत्य आहे कि भासमान’, ते मला ठाऊक नसल्यामुळे मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या मनात पुष्कळ विचार असून डोक्याच्या ठिकाणी त्रास जाणवतो.’’ मी त्यांना नामजप करायला सुचवले. त्यांनी नामजप केल्यानंतर त्यांना बरे वाटले.

६. पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यावर संपूर्ण खोली त्रासदायक शक्तीच्या आवरणाने व्यापली जाणे; परंतु मुलाभोवती पिवळे कवच असल्याने त्याच्यावर या आवरणाचा परिणाम न होणे

एकदा माझ्यात आणि अद्रियन यांच्यामधे भांडण झाले. त्या वेळी आम्हा दोघांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींची शक्ती वाढली होती, असे मला वाटले. तेव्हा मला आम्हा दोघांभोवती मोठे त्रासदायक शक्तीचे आवरण दिसले. तसेच आम्ही रहातो ती खोली त्या त्रासदायक शक्तीने पूर्णपणे व्यापलेली होती. नारायणच्या भोवती मात्र एक पिवळे कवच होते. त्यामुळे ‘त्याच्यावर खोलीतील त्रासदायक शक्तीचा काहीच परिणाम होत नव्हता’, असे मला जाणवले.

७. घरात श्रीकृष्णाचे मोठे रूप दिसून तो रक्षण करत असल्याचे जाणवणे आणि बाहेरून घरी आल्यावर अंगावर विभूतीचे पाणी शिंपडल्यावर आवरण लवकर न्यून होणे

मागील दोन आठवड्यांपासून मला घरात श्रीकृष्णाचे मोठे रूप दिसते. ‘तो सतत आमच्या समवेत असून आमचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवते. मी बाहेरून घरात आल्यानंतर मला शांत वाटते आणि मला चैतन्य मिळते. आज मी बाहेरून घरात आले, तेव्हा माझ्याभोवती जमा झालेले आवरण काही प्रमाणात निघून जात असल्याचे मला दिसले. मी विभूतीचे पाणी अंगावर शिंपडल्यानंतर ते आवरण अधिक प्रभावीपणे निघून गेले. घरात होत असलेले सत्संग, नामजपादी उपाय आणि सेवा यांमुळे ही सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) आहे’, असे मला वाटते. संतांच्या सत्संगानंतर घरात काही काळापर्यंत अधिक चैतन्य जाणवते.

आमच्या शेजारी असलेल्या काही घरांकडे पहातांना, घरांजवळून जातांना किंवा शेजारी रहाणार्‍यांकडे पहातांना मला पुष्कळ त्रासदायक जाणवते. असे असले, तरी त्याचा आमच्यावर फारसा परिणाम होत नाही. त्या त्रासदायक शक्तीपेक्षा आमच्या घरातील श्रीकृष्णाची शक्ती अधिक आहे. ‘श्रीकृष्ण सर्व ठिकाणी असून तो साधकांचे रक्षण करतो अन् त्यांना जोडूनही ठेवतो’, असे मला वाटते.

साधनेमुळे होणारे लाभ मला अनुभवायला दिल्याबद्दल, तसेच ‘तो साधकांचे सतत रक्षण करतो ’, ही श्रद्धा दृढ केल्याबद्दल मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. लवनिता डूर्, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. (१६.६.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF