मुसलमानांमधील जातीव्यवस्था !

‘इस्लाममध्ये जातीवर आधारित भेदभावाला थारा नसतो, असे म्हटले जाते; परंतु हिंदुस्थानी मुसलमानांमध्ये जातीव्यवस्था पहायला मिळते. मुसलमानांमधील जातीव्यवस्थेचे सूत्र वर्ष १९३६ मध्ये इंग्रजांसमोर आले होते. त्यानंतर ‘काका कालेलकर समिती’, ‘मंडल आयोग’ आणि ‘सच्चर समिती’ यांच्या अहवालांमध्ये त्यावर विस्तृतपणे चर्चा झाली होती.

मुसलमानांच्या जातीव्यवस्थेवर वर्ष १९६० मध्ये गोस अन्सारी यांनी ‘मुस्लिम सोशल डिविजन इन इंडिया’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते. यामध्ये त्यांनी उत्तर भारतात मुसलमानांची चार जातींमध्ये विभागणी केली होती – सैय्यद, शेख, मुघल आणि पठाण. या व्यवस्थेमध्ये सैय्यद स्वत:ला सर्वांत उच्च समजत असून ते स्वत:ला महंमद पैगंबर यांचे वंशज मानतात. दुसर्‍या क्रमांकावर शेख ! ते स्वत:ला महंमद पैगंबराचा कबिला ‘कुरेश’शी संबंधित असल्याचा दावा करतात. यामध्ये ‘सिद्दीकी’, ‘फारुखी’ आणि ‘अब्बास’ या आडनावांचा वापर करणारे लोक आहेत. तिसर्‍या स्थानी मुघल आहेत. ते बाबरच्या नेतृत्वाखाली भारतात आले होते. चौथ्या क्रमांकावर पठाण आहेत. ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून आले आहेत. ते ‘पश्तो’ ही भाषा बोलतात. याशिवाय मुसलमानांमध्ये इतर जातीही आहेत. त्यामध्ये ‘अशराफ’, ‘अजलाफ’ आणि ‘अरजाल’ नावाच्या तीन जाती आहेत.

१. अशराफ : हे स्वत:ला भारताबाहेरील अफगाण, अरब, पर्शियन किंवा तुर्क असल्याचे सांगतात. यामध्ये उच्च जातीतील धर्मांतरित भारतीय, विशेषकरून मुसलमान राजपूत यांचाही समावेश आहे.

२. अजलाफ : सवर्णेतर जातीतील धर्मांतरित मुसलमान या जातीचे असतात. यामध्ये दर्जी, धोबी, धुनिया, गद्दी, फाकिर, हज्जाम (न्हावी), जुलाहा, कबाडिया, कुंभार, कंजरा, मिरासी, मनिहार, तेली इत्यादी जातींचा समावेश होतो.

३. अरजाल : भारतातील दलित जातीतून धर्मांतरित झालेले मुसलमानांच्या या जातीमध्ये मोडतात. यामध्ये हलालखोर, हसनती, लाल बेगी, मेहतर, नट, गधेरी यांचा समावेश आहे.

इम्तियाज अहमद यांनी वर्ष १९७८ मध्ये ‘कास्ट अ‍ॅण्ड सोशल स्टार्टिफिकेशन अमंग द मुस्लिम्स’ या पुस्तकामध्ये सांगितले होते की, इस्लाममध्ये धर्मांतरित झाल्यानंतरही हिंदूंना मुसलमान समाजामध्ये जातीव्यवस्थेला सामोरे जावे लागते.

मुसलमानांमधील अन्य काही जाती  !

आतिशबाज, बई, भांड, भातिहारा, भिश्ती, धोबी, मनिहार, दर्जी या जाती हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये एक समान आहेत. सैय्यद आणि शेख सर्वांत उच्च जातीतील मानले जातात. धर्माशी संबंधित कामांचे दायित्व त्यांच्याकडे असते. मुघल आणि पठाण यांना हिंदूंमधील क्षत्रीय जातीप्रमाणे समजले जाते. हिंदु धर्मातील धर्मांतरित इतर मागास वर्गातील लोकांना इस्लाममध्ये ‘क्लीन ऑक्युपेशनल कास्ट’ संबोधले जाते, तर धर्मांतरित मागासवर्गीयांना ‘नॉन-क्लीन ऑक्युपेशनल कास्ट’ असे संबोधले जाते.

काका कालेलकर आयोग (वर्ष १९५५) : या आयोगाने २ सहस्र ३९९ मागास जातींची एक सूची बनवली होती. यामधील ८३७ जातींना ‘अती मागास’ श्रेणीत अंतर्भूत केले होते. या यादीमध्ये ‘हिंदु ओबीसीं’सह ‘मुस्लीम ओबीसी’लाही समाविष्ट करण्यात आले होते.

मंडल आयोग (वर्ष १९८०) : या आयोगाने आपल्या अहवालात देशातील ३ सहस्र ७४३ जातींना ‘ओबीसी’च्या यादीत समाविष्ट केले होते. देशात जातीनिहाय भेदभाव केवळ हिंदूंपुरता मर्यादित नाही, तर मुसलमान, शीख आणि ख्रिस्ती यांच्यामध्येही आहे, असे मंडल आयोगाने मान्य केले होते.

संदर्भ : वृत्त संकेतस्थळ


Multi Language |Offline reading | PDF