मुरबाड येथे भीषण पाणीटंचाईमुळे लग्नाच्या दिवशीही वधूला विहिरीवर ताटकळत उभे रहावे लागले !

स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनीही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच ! जीवनावश्यक गोष्टींचे सुनियोजन न करता केवळ विकासाचा आग्रह धरणारे सरकार जनतेला कधीतरी आपले वाटेल का ?

मुरबाड – तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असून अनेक आदिवासी भागांत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ‘पहिले कॅशलेस गाव’ म्हणून शासनाने प्रसिद्धीस आणलेल्या धसई गावाजवळील कळंभाड ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील दुर्गापूर या गावात लग्नाच्या दिवशीही पाण्यासाठी वधूला मुंडावळ्या बांधलेल्या आणि हळद लावलेल्या स्थितीत पाणी भरण्यासाठी जावे लागले.

येथील विहिरीतील पाण्याने तळ गाठला असून झर्‍यातून थोडे थोडे पाणी येते. त्यामुळे पाणी साठेपर्यंत नागरिकांना भर उन्हात ताटकळत उभे रहावे लागते.

‘दुर्गापूर हे गाव कायम पाणीटंचाईग्रस्त असून येथे पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे’, असे मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विश्‍वनाथ केळकर यांनी म्हटले आहे. (उपाययोजना काढली असतांना नागरिकांना पाण्यासाठी वणवण का करावी लागते, हे गटविकास अधिकारी सांगतील का ?- संपादक) पाणीटंचाईमुळे अनेक आदिवासींनी जुन्नर, आळेफाटा, नगर, नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतमजूर म्हणून स्थलांतर केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF