एखाद्याला नास्तिक असण्याचा दर्जा का मिळू शकत नाही ? – गुजरात उच्च न्यायालय

कर्णावती (गुजरात) – एखाद्याला हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती असण्याचा दर्जा मिळू शकतो; पण नास्तिक असण्याचा दर्जा का मिळू शकत नाही ?, असा प्रश्‍न गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे. ‘नास्तिकतेला दर्जा देता येईल का?’ याविषयी सरकारचे मत विचारण्यात आले असून ‘धर्मपरिवर्तन कायद्यात काही संशोधन करता येईल का?’, असा प्रश्‍नही न्यायालयाने गुजरात सरकारला विचारला आहे. नास्तिकतेचा दर्जा नाकारल्यामुळे ३५ वर्षांच्या राजीवर उपाध्याय यांनी न्यायालयात याचिका केली आहे.

१. गुजरातच्या ‘धर्मपरिवर्तन कायदा २००३’ नुसार धर्मांतर करायचे असेल, तर राज्याधिकार्‍यांची अनुमती घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राजीवर उपाध्याय यांनी हिंदु धर्म सोडून नास्तिक होण्याचा अर्ज प्रविष्ट केला होता. हा अर्ज कर्णावतीच्या जिल्हाधिकार्‍यांनी २ वर्षे प्रलंबित ठेवून फेटाळला होता. त्यानंतर उपाध्याय यांनी ही याचिका केली.

२. व्यवसायाने रिक्शाचालक असणारे उपाध्याय म्हणाले की, मी अनुसूचित जातीचा असून मला हिंदु धर्म सोडायचा आहे आणि नास्तिक व्हायचे आहे; पण मला तो हक्क का मिळू शकत नाही? कोणी ख्रिस्ती होऊ शकतो, ज्यू होऊ शकतो, मग मी नास्तिक का होऊ शकत नाही?’ (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना स्वधर्माचे महत्त्व लक्षात येत नाही आणि ते अशा प्रकारचा विचार करतात, हे हिंदूंच्या बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लक्षात येऊन ते हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतील तो सुदिन ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF