अनेक साधकांच्या जीवनाला दिशा देणार्‍या महान गुरुमाऊलींनी केलेला कृपावर्षाव !

साधकांना तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. देवापेक्षाही मोठे स्थान असलेली महान गुरुमाऊली

‘हिंदु संस्कृतीने गुरूंना देवापेक्षाही मोठे स्थान दिले आहे; कारण देव नाही, तर गुरु साधकाला ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधना शिकवतात. त्याच्याकडून ती करवून घेतात आणि त्याला ईश्‍वरप्राप्तीही करवून देतात.

‘गुरु थोर कि देव थोर म्हणावा ।
नमस्कार आधी कोणा करावा ।
मना माझीया गुरु थोर वाटे ।
जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥

सौ. पुष्पा पराडकर

२. गुरुमाऊलीने त्यांच्या प्रत्येक कृतीतून स्वत:च्या गुरूंची थोरवी दाखवणे

माझी गुरुमाऊली इतकी थोर आहे की, त्यांचेे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांनी माझ्यासारख्या दगडाला नामाची गोडी लावली. त्यांच्या चरणांपाशी जी व्यक्ती आली, तिलाही नामाचा लळा लागून ती पुढे गेली आहे. गुरुमाऊलीने प्रत्येक कृतीतून त्यांच्या गुरूंची थोरवी आम्हाला दाखवली. गुरुमाऊलीचा प्रत्येक क्षण संत भक्तराज महाराज यांच्या स्मरणात जातो. खरेतर त्यांचा प्रत्येक श्‍वास प.पू. बाबांचेच स्मरण करत असतो. आम्हा साधकांना मात्र ‘आपल्या संतांविषयी लिहून पाठवा’, असे सांगावे लागते.

३. गुरुमाऊलीने केलेला कृपावर्षाव !

३ अ. प्रथम दर्शनातच परात्पर गुरुमाऊलींची ओढ लागणे : मला २०.९.१९९२ या दिवशी परात्पर गुरुमाऊलींचे प्रथम दर्शन झाले. त्या वेळी मी मनाशी खूणगाठ बांधली की, मला जे हवेे आहे, ते इथेच मिळणार आहे. त्या दिवसापासून मला सत्संगाची ओढ लागली. गुरुमाऊली प्रतीमास अध्यात्माचे अभ्यासवर्ग घ्यायला पणजीला येत असे. मी त्या दिवसाची चातकासारखी वाट बघत असे. मला ‘केव्हा एकदा अभ्यासवर्गाचा दिवस उजाडतो आणि मी त्या वर्गाला जाते’, असे व्हायचे.

३ आ. गुरुमाऊलींच्या कृपेमुळे कुटुंब आनंदी आणि समाधानी असणे : ‘निरपेक्ष प्रीती काय असते ?’, हे आम्हाला सनातन संस्थेत आल्यावरच समजले. गुरुमाऊलींनी माझ्यासाठी काय काय केले नाही ? आज त्यांच्याच कृपेने माझे कुटुंब आनंदात आहे. माझी आणि त्यांची भेट झाली नसती, तर मी कुठच्या कुठे भरकटत गेले असते. केवळ त्यांच्या कृपेमुळेच आम्ही सर्व जण आनंदी आणि समाधानी आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

३ इ. बालपणचे स्वप्न साकार होणे : माझे लहानपणापासून एक स्वप्न होते, ‘सर्व लोकांचे एक मोठे कुटुंब असावे.’ ‘सनातन संस्थे’च्या रूपाने ते साकार झाले आहे.

३ ई. दोन्ही मुले साधनेत असणे : माझी दोन्ही मुले सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागली, ही गुरुमाऊलींचीच कृपा ! आरंभी आम्ही मुलांनाही सत्संगाला नेत होतो; पण त्यांच्यावर कधी बळजोरी केली नाही. त्यांनी स्वतःहून पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. आमचा मोठा मुलगा ८ – ९ वर्षे आश्रमात होता आणि दुसरा मुलगा (श्री. मेघराज) आता आश्रमात आहे.

३ उ. परात्पर गुरुमाऊलींनी प्रत्येक साधकाला घडवण्यासाठी अपार कष्ट घेणे : परात्पर गुरुमाऊलींनी प्रत्येक साधकाला घडवण्यासाठी एवढे श्रम घेतले आहेत की, याला ब्रह्मांडात तोड नाही. आता समाजातील लोकांचाही सनातनवर विश्‍वास बसला असून त्यांना सनातनचा आधार वाटतो. समाजात किती प्रकारची दुःखे आहेत; मात्र परात्पर गुरुदेवांनी आम्हा सनातनच्या साधकांना ‘तळहातावरील फोडाप्रमाणे’ सांभाळले आहे.

३ ऊ. गुरुमाऊलींनी नामाची गोडी लावल्यामुळे चिंता आणि काळजी न्यून होणे : साधनेत येण्यापूर्वी माझ्यात न्यूनगंड, भीती (गत आयुष्याची तसेच पुढील आयुष्याची), आणि मुलांची चिंता होती. माझ्या यजमानांचा स्वभाव रागीट असल्यामुळे मला त्यांची काळजी वाटत असे; कारण तेव्हा कुणी नामस्मरणाचा उपाय सांगितला नव्हता. ‘ज्या दिवसापासून मला नामाची गोडी लागली, तेव्हापासून ती गोडी वाढतच चालली आहे’, हे गुरुमाऊलींनी माझ्या लक्षात आणून दिले. ‘आमचे स्वभावदोष आणि परिस्थिती यांतून वाट काढत सत् मार्गाकडे कसे जायचे ?’, हे त्यांनीच आम्हाला शिकवले.

माझ्या जन्मदात्या आईनेही मला घडवायला एवढे कष्ट घेतले नसतील, जेवढे माझ्या गुरुमाऊलींनी घेतले आहेत. त्यांनी मला संसार आणि साधना यांत कोणतीच गोष्ट न्यून पडू दिली नाही. मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

– सौ. पुष्पा माधव पराडकर, डिचोली, गोवा. (१३.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF