हेमंत करकरे यांना मी ‘तुमचा सर्वनाश होईल’, असा शाप दिला होता ! – साध्वी प्रज्ञासिंह

  • खरे साधू,संत आणि संन्यासी हे विनाकारण कोणालाही शाप देत नाहीत. ते कर्मफलन्यायानुसार प्रत्येक घटनेकडे पहातात; मात्र त्यांच्यावर कोणी अत्याचार केला आणि जर त्यांनी शाप दिला, तर त्या शापाचा परिणाम त्यांची साधना असल्याने होत असतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. तसेच साधू, संत, संन्यासी यांनी सांगितल्यानुसार साधना केली, धर्माचरण केले, तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन व्यक्तीची आध्यात्मिक प्रगतीही होत असते !
  • साध्वी प्रज्ञासिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या भाजपकडून भोपाळ येथून निवडणूक लढवत असल्या, तरी त्या अटकेत असतांना ज्या पोलीस अधिकार्‍यांनी छळ केला, त्यांपैकीच एक अधिकारी असणारे परमबीर सिंह यांना महाराष्ट्रातील भाजप सरकारने राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक बनवले आहे. यावर भाजपने उत्तर दिले पाहिजे !

भोपाळ (मध्यप्रदेश) – माझ्याविरोधात पुरावे नसतांनाही मला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी कारागृहात डांबण्यात आले. आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी ‘साध्वीला सोडणार नाही’, असे म्हटले होते. त्यांनी मला शिवीगाळ केली होती. हा देशद्रोह आणि धर्मद्रोह होता. मी खूप त्रास सहन केला. मी त्यांना शाप दिला होता, ‘तुमचा सर्वनाश होईल.’ मी ज्या दिवशी कारागृहात गेले, त्या दिवशी सुतक चालू झाले आणि २१ दिवसांनी आतंकवाद्यांनी हेमंत करकरे यांना मारले. त्या दिवशी सुतक संपले, असे विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी मांडलेली सूत्रे

१. सुरक्षा आयोगाचा सदस्य असणार्‍या एका अन्वेषण अधिकार्‍याने हेमंत करकरे यांना बोलावले आणि सांगितले, ‘साध्वीला सोडून द्या.’ यावर हेमंत करकरे यांनी सांगितले, ‘मी काहीही करीन; पण साध्वीच्या विरोधात पुरावे सादर करणारच. मी साध्वीला सोडणार नाही.’ (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विशेष न्यायालयात, ‘साध्वी यांच्या विरोधात एकही सबळ पुरावा नाही’, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. यावरून करकरे यांच्या अन्वेषणाविषयी संशय निर्माण झाला आहे. – संपादक)

२. हेमंत करकरे यांनी हा देशद्रोह केला होता. ते मला विचारायचे, ‘खरे जाणून घेण्यासाठी मला देवाकडे जावे लागेल का ?’ यावर मी म्हटले, ‘तुम्हाला आवश्यकता वाटत असेल, तर तुम्ही जाऊ शकता.’

३. वर्ष २००८ मध्ये निरपराध संन्याशाला कारागृहात डांबण्यात आले. यावर मी ‘सर्वनाश होईल’, असा शाप दिला होता आणि त्यानंतर काय झाले, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी देहली – आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्याविषयी विधान केल्याच्या प्रकरणी भाजपच्या भोपाळ येथील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून खेद व्यक्त

मी मांडलेले विचार हे माझे वैयक्तिक विचार आहेत. तो आमच्या परिवाराचा (देशाचा) विषय आहे.  त्यामुळे माझ्या विधानामुळे शत्रू देशाला, विदेशींना लाभ होणार असेल, तर मी याची क्षमा मागते, अशा शब्दांत साध्वी प्रज्ञासिंह यांनी सायंकाळी उशिरा खेद व्यक्त केला.

साध्वी प्रज्ञासिंह यांचे ते वैयक्तिक मत ! – भाजप

साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेली विधाने हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी भाजप सहमत नाही, असे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे. (मते मिळवण्यासाठी साध्वी यांचा वापर करायचा; मात्र त्यांच्यावर अत्याचार करणार्‍यांविषयी मौन बाळगायचे, अत्याचार करणार्‍यांना पदे द्यायची असा दुटप्पीपणा भाजपने केला आहे, हे लक्षात घ्या !  संपादक)


Multi Language |Offline reading | PDF