बाबूश मोन्सेरात यांची ‘गोवा फॉरवर्ड’ला सोडचिठ्ठी, काँग्रेसमध्ये प्रवेश

पणजी (गोवा), १९ एप्रिल (वार्ता.) – पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्या कारणावरून ४ वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले बाबूश मोन्सेरात यांनी १८ एप्रिल या दिवशी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी या वेळी घोषित केले. बाबूश मोन्सेरात यांनी १७ एप्रिल या दिवशी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचे आणि प्राथमिक सदस्यत्वाचे, तसेच ‘ग्रेटर पणजी पीडीए’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले होते.

याप्रसंगी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत बाबूश मोन्सेरात म्हणाले, ‘‘पणजी मतदारसंघाच्या विकासासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पणजी मतदारसंघाचे माजी आमदार तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचा अपेक्षित विकास केलेला नाही, तसेच रोजगार उपलब्ध करण्यासंबंधीही त्यांनी विशेष प्रयत्न केलेले नाहीत.’’

बाबूश मोन्सेरात यांचा तिसर्‍यांदा काँग्रेसमध्ये प्रवेश

बाबूश मोन्सेरात वर्ष २००२ मध्ये युनायटेड डेमॉक्रेटीक पक्षाच्या तिकिटावर प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये ते शहर आणि नगर नियोजनमंत्री झाले होते. वर्ष २००५ मध्ये बाबूश मोन्सेरात आणि अन्य २ मंत्र्यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र देऊन पर्रीकर सरकार पाडले अन् प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला सत्तेवर आणले होते. या वेळी त्यांनी वर्ष

२००५ मध्ये ताळगाव पोटनिवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवून जिंकली. या वेळी प्रतापसिंह राणे सरकारमध्ये ते मंत्री होते. वर्ष २००७ मध्ये काँग्रेस तिकिटावर ताळगाव मतदारसंघात निवडणूक जिंकली; मात्र वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ही जागा त्यांची पत्नी जॅनिफर मोन्सेरात यांच्यासाठी रिक्त केली आणि जॅनिफर मोन्सेरात काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून आमदार झाल्या. या निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांनी सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढवून ते जिंकले. ११ मार्च २०१५ या दिवशी पक्षविरोधी कारवाया करत असल्याच्या कारणावरून काँग्रेस पक्षाने बाबूश मोन्सेरात यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर वर्ष २०१७ मध्ये पणजी मतदारसंघातून ‘युनायटेड गोवन्स पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढवली; परंतु ते ही निवडणूक हरले. यानंतर त्यांनी वर्ष २०१७ मध्ये ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षात प्रवेश केला.

वादग्रस्त बाबूश मोन्सेरात

फेब्रुवारी २००८ मध्ये मोन्सेरात यांच्या एका कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीमुळे ते आपल्या समर्थकांसह पणजी पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेले होते. तेथे समर्थक आणि पोलीस यांच्यात झालेल्या वादात पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर आणि मुलगा अमित यांना अटक झाली होती.


Multi Language |Offline reading | PDF