दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय कारागृहात आहे, हे त्यांनी विसरू नये ! – उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख

रत्नागिरी – ६० वर्षे भ्रष्टाचार करून ज्यांची पोटे भरली नाहीत त्यांनी या देशावर केवळ दरोडे टाकण्याचेच काम केले आहे. त्यांनी अनेक घोटाळे केले. स्वतः दरोडेखोर असतांना दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय कारागृहात आहे, हे त्यांनी विसरू नये, अशी खणखणीत चेतावणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देवरुख (रत्नागिरी) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील भव्य पटांगणात सभा झाली. या वेळी व्यासपिठावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत आदी उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले,

१. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रत्नागिरीचे एक नाते होते. सावरकर मृत्यूंजय होते. राहुल गांधींनी त्यांना डरपोक म्हटले. सावरकरांना वीर नाही म्हणायचे मग काय नेभळट राहुलला वीर म्हणायचे का? यांना सावरकर कळणारच नाहीत. सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींचे नेतृत्व आजच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य आहे का ?

२. कोकण आणि कोकणी माणूस हा शिवसेनेचा कणा आहे. मला कोणत्याही खुर्चीचा मोह नाही. धनुष्य बाण आणि कमळाला मत म्हणजे तुमचे तुम्हाला दिलेले मत. तुमच्या भविष्यासाठी, सुरक्षेसाठी हे मतदान आहे. देश सुरक्षित रहायला हवा असेल, तर विनायक राऊत निवडून आले पाहिजेत; कारण आम्हाला मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करायचे आहेे.

नारायण राणे आणि नीलेश राणे यांच्यावर टीका

काम करणारे करतात, तर न करणारे ओरड मारतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचे दुकान काढले आहे. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा, भावाकडे एक झेंडा, पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय. इथल्या प्रचारात कुणीतरी शिक्षणाचा विषय काढतो; पण शिक्षणासमवेत संस्कार हा भाग असतो. तुम्ही परदेशात डिग्री घेतली असाल; पण संस्कार कुठे आहेत? आमचा उमेदवार तुमच्यापेक्षा अल्प शिकला असेल; पण तो तुमच्यापेक्षा सुसंस्कारी आणि सुशिक्षित आहे. ज्यांच्या घरात निष्ठाच नाही, ते जनतेसमवेत काय निष्ठावंत रहाणार, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि या मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार नीलेश राणे यांचे नाव न घेता केली.


Multi Language |Offline reading | PDF