डोंबिवलीच्या ‘लोकमान्य गुरुकुल’ शाळेचा आदर्श अन्य शाळा घेतील का ?

१. शाळेत प्रवेश करताच समोर विद्येची देवता सरस्वतीदेवीची मूर्ती ठेवलेली असून नवीन आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे नमस्कार करण्यास सांगण्यासाठी मुख्याध्यापक बाई उभ्या असणे, त्यानंतर शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना ओवाळणे

‘सांस्कृतिक नगर म्हटल्या जाणार्‍या डोंबिवलीच्या (जि. ठाणे) प्रसिद्ध टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाची ‘लोकमान्य गुरुकुल’ शाळा आरंभ झाली आहे. नव्यानेच प्रवेश घेतलेल्या पाल्यासहित आम्ही पालकही सकाळी शाळेमध्ये उपस्थित झालो. शाळा म्हणजे आधीच्या शाळेसारखीच असेल, असे समजून आत गेलो; पण आतील वातावरण भारावून टाकणारे होते. आत प्रवेश करताच समोर विद्येची देवता सरस्वतीदेवीची मूर्ती ठेवलेली होती. नवीन आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिला नमस्कार करण्यास सांगण्यासाठी प्रत्यक्ष मुख्याध्यापिका उभ्या होत्या. नमस्कार केल्यानंतर तिथेच उभ्या असलेल्या शिक्षिका विद्यार्थ्यांना ओवाळत होत्या. सगळंच भारावून टाकणारे होते.

२. प्रत्येक शाळेने आपली गुरुकुल पद्धत आणि परंपरा यांचे पालन केले, तर एक ‘आदर्श पिढी’ घडू शकेल अन् तीच पिढी एक ‘आदर्श देश’ बनवू शकेल !

आज अनेक वर्षांत शिक्षण हे केवळ चढाओढीचे क्षेत्र बनत असतांना या शाळेने केलेला हा उपक्रम फारच स्तुत्य होता. शाळेत प्रवेश घेतांना शाळेने आम्हाला जी आश्‍वासने दिली होती, ती नक्कीच पूर्ण होतील, याची निश्‍चिती झाली. ‘आपली मुले ही चढाओढीच्या शर्यतीतील घोडे न बनता व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास झालेले, देशहित आणि धर्महित जपणारे सुजाण अन् सशक्त नागरिक बनतील’, या विचारांनी मन आनंदित झाले.

प्रत्येक शाळेने अशा प्रकारे आपली गुरुकुल पद्धत आणि परंपरा यांचे पालन केले, तर एक ‘आदर्श पिढी’ घडू शकेल अन् तीच पिढी एक ‘आदर्श देश’ बनवू शकेल आणि ते जगासमोर उदाहरण असेल. आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण देऊया. तेसुद्धा अशा गुरुकुल पद्धतीने झाले, तर आपलाही एक आदर्श पिढी घडवण्यात हातभार लागेल.’

– सौ. नेहाली शिंपी, डोंबिवली (११.६.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF