लाचार नेत्यांचे ‘म्हातारहट्ट’ !

निरर्थक भारतीय लोकशाही !

सध्या भारतात लोकसभेची निवडणूक चालू आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये या निवडणुका होत आहे. देशभर सर्वपक्षीय राजकारण्यांच्या प्रचारसभा रंगत आहेत. निवडणुकांच्या या रणागणांत अनेक अपप्रकारांना उधाण आले आहे. ‘जगातील सर्वांत मोठी निवडणूक’ म्हणून बहुमान (?) मिरवणार्‍या भारतीय लोकशाहीची ही स्थिती भारतासाठी खरेतर लज्जास्पद आहे. भारतीय राजकारणी आणि जनता यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आणि त्यांना अंतर्मुख करायला लावणारे हे नैमित्तिक सदर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करत आहोत.

सोलापूर येथून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे (वय ७८ वर्षे) निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वर्ष २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांनी वैचारिक आणि राष्ट्रहिताच्या सूत्रांवर निवडणूक लढवण्याऐवजी पत्रकार परिषदेमध्ये एक लाचार आवाहन केले. ‘ही माझी शेवटची निवडणूक असल्याने पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी द्यावी’, असे आवाहन त्यांनी केले. तेही दोन्ही हात जोडून ! ‘वयामुळे म्हणा अथवा कार्यक्षमतेमुळे म्हणा, परत निवडणूक लढवायला मिळणार नाही; म्हणून आता संधी द्या’, असे म्हणत मतांचा ‘जोगवा मागवा’ मागण्याच्या वृत्तीतून सुशीलकुमार शिंदे यांची खासदारपदाची अगतिकताच दिसून येते; मात्र असले ‘म्हातारहट्ट’ पूर्ण करायला ‘निवडणूक म्हणजे काही जत्रा नाही’, असेच जनतेच्या मनात असणार. वास्तविक वय, वैचारिक दृष्टीकोन आणि कार्यक्षमता यांचा विचार करून शिंदे यांनी यंदाचीही निवडणूक लढवायला नको होती; पण सत्तेचा मोह सुटतो कोणाला ? अशा लाचार नेत्यांमुळेच लोकशाहीची निरर्थकता अधोरेखित होते. कुठे जनतेमधील स्वाभिमान चेतवून स्वराज्य निर्मितीचे आणि विस्ताराचे कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज अन् बाजीराव पेशवे यांच्यासारखे वीर, तर कुठे ‘परत निवडणूक लढवणार नसल्याने आता संधी द्या’, असे म्हणणारे सध्याचे लाचार नेते !


Multi Language |Offline reading | PDF