रणांगणावरील आदर्श नेतृत्व असलेले सेनापती तात्या टोपे यांची विविध मान्यवरांनी वर्णिलेली वैशिष्ट्ये !

२० एप्रिल २०१९ या दिवशी सेनापती तात्या टोपे यांचा बलीदानदिन ! त्यानिमित्त…

अनंत काळचे अपराजित तात्या टोपे

‘तात्या टोपे क्षणाचे पराजित आणि अनंत काळचे अपराजित होते ! ते तेव्हाचे बंडखोर आणि आजचे स्वातंत्र्यवीर होते ! ते तेव्हाचे अपराधी; पण आजचे अधिदेव होते ! सत्ताधारी इंग्रजांचा पराजय आणि सेनापती तात्यांचा विजय झाला होता. तात्या टोप्यांचे स्वप्न आज साकार झाले होते ! पूर्णांशाने नव्हे, तरी बव्हंशाने !’

– श्री. पु.भा. भावे (मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी अंक २००६, पृष्ठ ७०)

‘दुसरा शिवाजी’ अशी ओळख निर्माण करणारे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील सेनापती तात्या टोपे !

‘१८५७ च्या युद्धात तात्या टोपे हे एकमेव सेनापती असते आणि ठरलेल्या दिवशी उठाव झाला असता, तर भारताला १५० वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. ‘लंडन टाइम्स’सारख्या शत्रूराष्ट्राच्या वृत्तपत्रानेही तात्यांचे चातुर्य आणि कल्पकता यांचे कौतुक केले होते. त्या वेळी ब्रिटीश वृत्तपत्रे ‘दुसरा शिवाजी’, असा त्यांचा नामोल्लेख करत होती.’

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, डोंबिवली (‘वाचा आणि गप्प बसा’ दैनिक तरुण भारत, बेळगाव आवृत्ती, २९.६.२००८)

विजेते आणि अवतारी तात्या टोपे !

सेनापती तात्याराव सावरकर तात्या टोपे यांच्या आत्म्यास आवाहन करून विनवत होते, ‘आपण अद्यापी या अवकाशात कोठे अस्वस्थ असाल, तर शांत व्हा, शांत व्हा ! तुम्ही पराजित नव्हे, तर विजेते आहात ! अपराधी नव्हे, तर अवतारी आहात !’

– पु.भा. भावे (स्वातंत्र्यवीर, दिवाळी विशेषांक २००८)

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील भारतियांचे सरसेनापती तात्या टोपे यांची पुण्यतिथी साजरी न करणारी नाशिक महानगरपालिका !

‘वर्ष १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सेनापती तात्या टोपे यांची पुण्यतिथी नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या येवला या जन्मगावी २३ एप्रिल २०१० या दिवशी राष्ट्रभक्तांनी उत्साहाने साजरी केली. नाशिक महानगरपालिकेस मात्र तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीचा विसर पडला होता. भारतीय विद्यार्थी सेनेने पूर्वकल्पना देऊनही महानगरपालिकेने तात्या टोपे यांच्या पुतळ्यास रोषणाई करणे वा त्यांचे पूजन करणे, असे काहीच केले नाही.’ (२४.४.२०१०)

तात्या टोपे यांच्यासारख्या क्रांतीकारकाच्या अर्धपुतळ्याची दुरवस्था !

‘तात्या टोपे यांचे जन्मस्थान येवला. तेथे त्यांचे छोटेखानी स्मारक आणि अर्धपुतळा आहे; पण स्मारकाचा उपयोग कुत्र्यांना बसण्यापुरता केला जातो. सभोवताली कचर्‍याचे साम्राज्य. या सर्वांतून पुढे जाऊन मी या पुतळ्याला वंदन करून आलो.’

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (श्रीगजानन आशिष, जानेवारी २०११)


Multi Language |Offline reading | PDF